RCB बिघडवणार 'या' टीम्सचं गणित; पाहा प्लेऑफ गाठण्यासाठी कशी बनतायत समीकरणं?

IPL 2024 RCB : आयपीएलमध्ये आतापर्यंत आरसीबीने फक्त एकच सामना जिंकला आहे. यावेळी टीमचे एकूण दोन पॉईंट्स आहेत. ही टीम अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेली. 

सुरभि जगदीश | Updated: Apr 24, 2024, 11:35 AM IST
RCB बिघडवणार 'या' टीम्सचं गणित; पाहा प्लेऑफ गाठण्यासाठी कशी बनतायत समीकरणं? title=

IPL 2024 RCB : यंदाची आयपीएल आरसीबीच्या टीमसाठी काही फारशी चांगली गेलेली नाही. यावेळी फाफ ड्यू प्सेसिसच्या नेतृत्वाखाली टीमला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. आरसीबीचे यावेळी 8 सामने झाले असून त्यांना 7 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागला आहे. 7 पराभावांमुळे आरसीबी प्लेऑफ गाठणार का यावर प्रश्चचिन्ह उपस्थित होतंय. मात्र समीकरण पाहिल्यास अजूनही आरसीबीसाठी प्लेऑफचे दरवाजे बंद झालेले नाहीत. 

आयपीएलमध्ये आतापर्यंत आरसीबीने फक्त एकच सामना जिंकला आहे. यावेळी टीमचे एकूण दोन पॉईंट्स आहेत. ही टीम अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेली. दरम्यान, आरसीबीची टीम उर्वरित ज्या टीमशी स्पर्धा करणार आहे त्यांचा प्लेऑफचा खेळ नक्कीच बिघडवू शकते. 

हैदराबाद आणि गुजरातशी मुकाबला बाकी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टीमचा पुढचा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 25 एप्रिल रोजी हैदराबादमध्ये होणार आहे. हैदराबादच्या टीमची कामगिरी पाहता हा संघ प्लेऑफमध्ये जाईल असं वाटतंय. असं असलं तरीही त्यांना यासाठी हा सामना जिंकावा लागेल. 

दुसरीकडे गुजरात टायटन्स आणि आरसीबी यांच्यात अजून दोन सामने बाकी आहेत. हे बॅक टू बॅक खेळले जातील. या दोन्ही टीम 28 एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये आमनेसामने येणार आहेत. तर हा सामना 4 मे रोजी पुन्हा होणार आहे, परंतु यावेळी सामना बेंगळुरूमध्ये होणार असून गुजरात टायटन्सची अवस्थाही बिकट आहे. आरसीबीने त्यांना हरवलं तर शुभमन गिलच्या टीमच्या अडचणी वाढण्याची शक्यता अधिक आहे.

यानंतर आरसीबी टीमचा सामना पंजाब, दिल्ली आणि चेन्नई यांच्याशीही होणार आहे. आरसीबीचा पंजाब किंग्ज विरुद्धचा सामना 9 मे रोजी धर्मशाला होणार असून 12 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना होणार आहे. RCB चा शेवटचा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 18 मे रोजी बेंगळुरूत खेळवला जाईल. एकंदरीत पाहिलं तर आरसीबीचे सर्व सामने हे त्या टीम विरूद्ध आहेत जे प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठीच्या दावेदार मानल्या जातायत. अशातच आरसीबीने जर या टीमचा पराभव केला तर त्यांचं प्लेऑफ गाठण्याचं स्वप्न अपूर्ण राहू शकतं.

कसं आहे आरसीबीसाठी क्वालिफिकेशनचं समीकरण?

प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी आरसीबीला आता इतर टीम्सच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे. आरसीबीकडे या सिझनमध्ये अजून 6 सामने खेळायचे आहेत. जर टीमने सर्व सामने जिंकले तर त्यांचे एकूण 14 पॉईंट्स होतील. प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी कोणत्याही टीमला किमान 16 पॉईंट्सची आवश्यकता असते.

यंदाच्या आयपीएलच्या सिझनमध्ये प्लेऑफ गाठण्यासाठी आरसीबीला आधी उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहे. जर टीमने उर्वरित सामन्यांपैकी एकही गमावला तर त्यांना पात्रता मिळणं अशक्य होईल. सर्व सामने जिंकल्यानंतर, टीमला आशा करावी लागेल की, इतर टीमचे निकाल आपल्या बाजूने लागणार आहे. जेणेकरून ते 14 गुणांसह टॉप-4 मध्ये स्थान मिळवू शकतील.