दिल्ली कॅपिटल्सच्या माजी खेळाडूची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता, थेट टी-20 वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता

Sandeep Lamichhane Acquitted by Court : दिल्ली कॅपिटल्सचा माजी खेळाडू आणि नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याला काठमांडू जिल्हा न्यायालयाने 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. अशातच आता संदीप लामिछाने याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

सौरभ तळेकर | Updated: May 15, 2024, 05:23 PM IST
दिल्ली कॅपिटल्सच्या माजी खेळाडूची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता, थेट टी-20 वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता title=
Sandeep Lamichhane Acquitted by Nepal High Court

Sandeep Lamichhane Rape Case : आत्ताची दिल्ली कॅपिटल्स म्हणजेच पूर्वीची दिल्ली डेअरडेव्हिलचा माजी खेळाडू आणि नेपाळ राष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) याला पाटण उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. मंगळवार आणि बुधवारी सुनावणी घेतल्यानंतर पाटण उच्च न्यायालयाने काठमांडू जिल्हा न्यायालयाने (Nepal News) दिलेला पूर्वीचा निकाल रद्द करून क्रिकेटपटू संदीप लामिछानेला बलात्कार प्रकरणात निर्दोष मुक्तता केली, अशी माहिती काठमांडू पोस्टने दिली आहे. नेपाळचे ज्येष्ठ वकील राम नारायण बिदरी, रमण श्रेष्ठ, शंभू थापा, मुरारी सपकोटा आणि कृष्णा सपकोटा यांनी क्रिकेटपटू लामिछानेच्या वतीने युक्तिवाद सादर केला. त्यानंतर कोर्टाने निकाल नोंदवला आहे.

काठमांडू न्यायालयाने संदीप लामिछाने याला आठ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर संदीपला अटक देखील करण्यात आली होती. अशातच आता संदीपची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे आता नेपाळमध्ये एकच चर्चा होताना दिसते. लामिछाने याने 21 ऑगस्टच्या रात्री 17 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर होता. मात्र, न्यायालयाने त्याची सुटका केल्याने आता त्याला राष्ट्रीय संघात पुन्हा स्थान मिळेल का? असा प्रश्न विचारला जातोय. तसेच टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी त्याच्या नावाची चर्चा देखील होण्याची शक्यता वर्तविली जातीये. 

संदीपवर आरोप काय आहेत ?

संदीप लामिछाने (Sandeep Lamichhane) एका 17 वर्षाच्या मुलीला काठमांडू आणि भक्तीपूरमध्ये घेऊन गेला. त्यावेळी त्यानं काठमांडूतील सिनामंगल येथील हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर प्रकरण आणखीन चिघळल्यानंतर संदीपला नेपाळ क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं. यावेळी लामिछाने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळत होता. या लीगमध्येही तो त्याच्या संघातून बाहेर काढण्यात आलंय. वॉरंट बजावल्यानंतर संदीप लामिछाने फरार झाला होता, त्याचे लोकेशन मिळत नव्हते. यानंतर नेपाळ पोलिसांनी संदीपला अटक करण्यासाठी इंटरपोलची मदत घेतली. त्यानंतर इंटरपोलने संदीपविरोधात ‘डिफ्यूजन’ नोटीस जारी केली होती. 

दरम्यान, संदीप लामिछाने हा जगभरातील क्रिकेट लीगमध्ये खेळणारा एकमेव नेपाळी खेळाडू आहे. आयपीएलमध्ये खेळणारा संदीप नेपाळचा पहिला क्रिकेटपटूही ठरला आहे. यासह, तो ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमियर लीग आणि लंकन प्रीमियर लीगसह अनेक लीगमध्ये खेळला आहे. 2018 मध्ये संदीपला पहिल्यांदा ओळख मिळाली, जेव्हा तो पहिल्यांदा IPL खेळला होता. संदीपला दिल्ली डेअरडेव्हिल्सने (DD) 20 लाख रुपयांना विकत घेतलं होतं.