'तुम्ही मला फार काळ...', विराट कोहलीने निवृत्तीवर पहिल्यांदाच केलं भाष्य, 'एकदा मी...'

Virat Kohli Retirement Latest News: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीची (Virat Kohli) निवृत्ती आता जवळ येऊ लागल्याची चर्चा सुरु झाली आहे. याचं कारण विराटने केलेल एक विधान कारणीभूत ठरत आहे. विराटने आपल्या निवृत्तीची वेळ ठरवली असल्याचं त्याच्या विधानातून दिसत आहे.   

शिवराज यादव | Updated: May 16, 2024, 03:54 PM IST
'तुम्ही मला फार काळ...', विराट कोहलीने निवृत्तीवर पहिल्यांदाच केलं भाष्य, 'एकदा मी...' title=

Virat Kohli Retirement Latest News: भारताचा महान खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या 5 ते 6 वर्षांमध्ये निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला होता. याचं कारण सचिनच्या वयाने परफॉर्मन्स आणि फिटनेसला मागे टाकलं होतं. प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत ही वेळ कधी ना कधीतरी येत असते. पण भारतीय क्रिकेटमध्ये याला भावनात्मक जोड देऊन पाहिलं जातं. ज्याप्रमाणे सचिनची निवृत्ती चाहत्यांना भावूक करणारी होती, त्याचप्रमाणे जेव्हा कधी विराट कोहली हा निर्णय जाहीर करेल तेव्हाही सारखीच स्थिती असेल.

सध्या विराट कोहली ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता तो लवकर निवृत्ती घेईल असं दिसत नाही. विराटने आपल्या फलंदाजीने आणि फिटनेसने टीकाकारांना चोख उत्तर दिलं असल्याने त्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित कऱण्याची हिंमत कोणीही करणार नाही. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा मात्र विराट कोहलीला या प्रश्नांचा सामना करावा लागणार आहे. 

विराटलाही याची जाणीव असून नुकतंच त्याने निवृत्तीवर भाष्य केलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या एका कार्यक्रमात बोलताना विराट कोहलीने सांगितलं की, "एक खेळाडू या नात्याने आपल्या करिअरची शेवटची तारीख असते. मी फक्त उलट्या क्रमाने काम करत आहे". कामं अर्धवट सोडून मला माझं करिअर संपवायचं नाही आहे असंही विराटने म्हटलं. 

विराट कोहलीचं करिअर आता संपण्याकडे आलं आहे का? त्याने करिअरसाठी वेळ ठरवली आहे का? असे प्रश्न आता चाहत्यांना सतावत आहेत. पण विराटने स्पष्ट सांगितलं आहे की, त्याला फक्त एकच गोष्ट माहिती आहे की, जेव्हा कधी ते वेळ येईल तेव्हा मनात क्रिकेटर म्हणून कोणतीही खंत नसेल. 

"मी त्या विशिष्ट दिवशी हे केलं असतं तर काय झालं असतं असा विचार करत मला करिअर संपवायचं नाही आहे. मी कायम असाच खेळू शकणार नाही. मला कोणतंही काम अर्धवट ठेवण्याची इच्छा नाही. तसंच नंतर खंत वाटेल असंही काही ठेवायचं नाही आहे. जे राहणार नाी याची मला खात्री आहे," असं विराट कोहली म्हणाला आहे. विराटच्या या विधानाने त्याच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या असून काहीसे भावूक झाले आहेत. 

यावेळी विराट कोहलीने चाहत्यांना आणखी एक आश्वासन दिलं आहे. "एकदा माझं काम झालं, की मी जाणार. तुम्ही मला बराच वेळ पाहू शकणार नाही. त्यामुळे जोपर्यंत मी खेळत आहे मला माझं सर्वस्व द्यायचं आहे. ही एकच गोष्ट मला पुढे जाण्यात मदत करत आहे".

विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल बोलायचं गेल्यास आयपीएलमध्ये त्याने 155 च्या स्ट्राइक रेटने 661 धावा केल्या आहेत. त्यामुळे अद्याप तरी टीकाकारांना त्याच्या फॉर्म, फिटनेसवर टीका करण्याची संधी मिळालेली नाही.