पहिल्या सामन्याआधी द. आफ्रिकेनं वाढवलं भारताचं टेन्शन! World Cup चं Points Table पहिलं का?

World Cup 2023 Ind vs Aus Points Table: दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मोठा विजय मिळवत मोठी मजल मारली आहे. आज भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 8, 2023, 10:12 AM IST
पहिल्या सामन्याआधी द. आफ्रिकेनं वाढवलं भारताचं टेन्शन! World Cup चं Points Table पहिलं का? title=
आज भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना चेन्नईमध्ये होणार आहे

World Cup 2023 Ind vs Aus Points Table: वर्ल्डकप 2023 च्या चौथ्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर मोठा विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने तब्बल 428 धावांचा डोंगर उभा केला. दिल्लीतील अरुण जेटली मैदानात झालेल्या या सामन्यामध्ये एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेनेही सर्व ताकद पणाला लावत 326 धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेने 102 धावांनी हा सामना जिंकत पॉइण्ट्स टेबलमध्ये मोठी उडी घेतली आहे. पहिल्याच सामन्यात माजी विजेत्या इंग्लंडला मोठा फरकाने धूळ चारत नेट रन रेटच्या जोरावर मिळवलेलं पहिलं स्थान अबाधित आहे. दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवल्याने आज भारताला ऑस्ट्रेलियावरुद्धच्या सामन्यामध्ये मोठा विजय मिळवावा लागणार आहे. असं झालं तरच भारताला टॉप 3 मध्ये स्थान मिळवता येईल. सध्याचा पॉइण्ट्स टेबल कसा आहे पाहूयात...

दोन्ही संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये कुठे?

वर्ल्डकप खेळत असलेल्या संघांपैकी केवळ भारत आणि ऑस्ट्रेलियाने अद्याप एकही सामना खेळलेले नाही. आज म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया चेन्नईमध्ये पहिला सामना खेळणार आहेत. या सामन्यापूर्वीचं पॉइण्ट्स टेबल पाहिलं तर दोन्ही संघ एकही सामना न खेळल्याने शून्य सामने, शून्य विजय पराभवासहीत मधल्या स्थानी आहे. 

तळाशी कोण?

पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा मोठा पराभव झाल्याने ते उणे 2.149 रन रेटसहीत पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने 100 हून अधिक धावांनी पराभूत केलेला संघ श्रीलंकन संघ 9 व्या स्थानी आहे. तर पाकिस्तानला कडवी झुंज देणारा नेदरलँडचा संघ पराभूत झाल्याने तो 8 व्या स्थानी आहे. अफगाणिस्तानच्या संघाला बांगलादेशने पराभूत केलं आहे. त्याप्रमाणे अफगाणिस्तानचा संघ 7 व्या स्थानी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचं स्थान सध्या तरी या पॉइण्ट्स टेबलमध्ये अल्फाबेटीकली असल्याने भारत 6 व्या आणि ऑस्ट्रेलिया 5 व्या स्थानी आहे. 

टॉपला कोण?

पहिल्या 4 सामन्यांमध्ये विजय मिळवणारे चारही संघ अव्वल स्थानी आहेत. चौथ्या स्थानावर बांगला देश आहे. बांगलादेशचा नेट रन रेट +1.438 इतका आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा संघ आहे. पाकिस्तानचा नेट रन रेट +1.620 इतका आहे. श्रीलंकेवर मोठा विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेने थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेट रन रेट +2.040 इतका आहे. पहिल्या स्थानी न्यूझीलंडचा संघ असून त्यांचा नेट रन रेट हा +2.149 इतका आहे.

आज भारत आणि ऑस्ट्रेलियापैकी कोण ठरणार सरस?

आजच्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो किमान पाचव्या स्थानी झेप घेईल. मात्र मोठ्या फरकाने सामन्याचा निकाल लागला तरी अगदी तिसऱ्या स्थानापर्यंत झेप घेण्याची संधी भारताबरोबरच ऑस्ट्रेलियालाही आहे. पराभूत संघ तळाच्या संघांमध्ये सहभागी होईल.