विमान 16 हजार फुटांवर असताना उडाली खिडकी; शेजारी बसलेल्या मुलाचा शर्ट फाटला अन्...

अमेरिकेतील अलास्का एअरलाइन्सच्या विमानाचा मोठा अपघात टळला आहे. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाची खिडकी तुटली आणि 16.32 हजार फूट उंचीवर हवेत उडाली होती. त्यामुळे विमानाचे लगेचच इमरजन्सी लॅंडिंग करावे लागलं.

आकाश नेटके | Updated: Jan 6, 2024, 01:48 PM IST
विमान 16 हजार फुटांवर असताना उडाली खिडकी; शेजारी बसलेल्या मुलाचा शर्ट फाटला अन्... title=

Alaska Airlines : गेल्या काही दिवसांपासून विमानातील अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसतेय. अशातच आणखी एक विमान अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील अलास्का एअरलाइन्सच्या विमानात ही भयानक घटना घडली आहे. विमान उड्डाण घेत असतानाच त्याच्या खिडकीचा काही भाग आकाशात तुटून हवेत उडाला. यानंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली आणि त्यानंतर अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या सगळ्या प्रकारामुळे  विमानातील 174 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. हे विमान अमेरिकेतील ओरेगॉन राज्यातील पोर्टलँड येथून ओंटारियो, कॅलिफोर्नियाला जात होते. या विमानाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

शनिवारी अमेरिकेतील अलास्का एअरलाइन्सच्या बोईंग 737-9 मॅक्स विमानाचा मोठा अपघात टळला. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाची खिडकी तुटली आणि खाली पडली. विमान 16.32 हजार फूट उंचीवर असताना हा सगळा प्रकार घडला आहे. यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. हे विमान पोर्टलँडहून ओंटारियो, कॅलिफोर्नियाला जात होते. स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. खिडकी उडल्यानंतर पुढच्या सीटवर बसलेल्या मुलाचा शर्टही फाटला. यावेळी काही प्रवाशांचे फोनही हवेत उडून गेले. उड्डाण केल्यानंतर अर्ध्या तासातच विमानाने इमर्जन्सी लँडिंग केले. 

अलास्का एअरलाइन्सने आपल्या सोशल मीडिया पेजवर या घटनेची माहिती दिली आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, खिडकी वेगळी होताच विमानाच्या पायलटने आपत्कालीन स्थितीची घोषणा केली. अलास्का 1282 मध्ये आपत्कालीन परिस्थिती आहे. आम्ही पोर्टलँडला परतत आहोत. आता आम्ही 12 हजार फूट उंचीवर पोहोचलो आहोत. विमानात आपत्कालीन परिस्थिती असून 177 लोक येथे उपस्थित आहेत. आम्हाला लगेच उतरायचे आहे, असे पायलटने प्रवाशांना सांगितले.

हे विमान कॅनडातील ओंटारियोला जाणार होते पण पोर्टलँडमध्येच त्याचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. बोईंग एअरप्लेन्सने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. "आम्हाला अलास्का एअरलाइन्सच्या फ्लाइट AS1282 च्या घटनेची माहिती मिळाली आहे. आम्ही अधिक माहिती गोळा करण्याचे काम करत आहोत. बोईंगचे एक तांत्रिक पथक तपासात मदत करण्यास तयार आहे," असे बोईंग एअरप्लेन्सने म्हटलं आहे.

विमानातील सर्वजण सुरक्षित असून पोर्टलँडला पोहोचले आहेत. सध्या अमेरिकेचे नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड या प्रकरणाची चौकशी करत आहे. विमानात बसताना जेवढा आवाज ऐकू येतो त्यापेक्षा 10 पट मोठा आवाज होता. आमचे कान फुटतील असे वाटत होते. या घटनेनंतर विमानात शांतता होती. भीतीने कोणी काही बोलत नव्हते. विमानात गडबड होताच ऑक्सिजन मास्क बाहेर आले, असे प्रवाशांनी सांगितले.