आश्चर्यकारक! साबणाचा वापर करुन हलवली 220 टन वजनाची संपूर्ण इमारत, पाहा VIDEO

Viral Video : कॅनडातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक 220 टन वजनाची इमारत फक्त साबणाचा वापर करुन एका जागेवरुन दुसऱ्या जागी हलवण्यात आली आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 12, 2023, 04:18 PM IST
आश्चर्यकारक! साबणाचा वापर करुन हलवली 220 टन वजनाची संपूर्ण इमारत, पाहा VIDEO title=

Viral Video : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही धक्कादायक तर काही आश्चर्यकारक व्हिडीओ देखील असतात. एखादी गोष्ट करायची जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही याचाच प्रत्यय आणणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. कॅनडामध्ये एक अख्ख हॉटेल एका जागेवरुन दुसऱ्या जागी हलवण्यात आलं आहे. असा प्रकार तु्म्ही याआधीही पाहिले असतील पण कॅनडाच्या नोव्हा स्कॉशिया या शहरात एक अशी घटना घडली आहे ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.

कॅनडाच्या नोव्हा स्कॉशिया शहरात एका रिअल इस्टेट कंपनीने 197 वर्षे जुनी इमारत पाडण्यापासून वाचवली आणि तिला दुसऱ्या जागी स्थलांतरीत केले. महत्त्वाची बाब म्हणजे पण 700 साबणांच्या मदतीने रिअल इस्टेट कंपनीच्या कामगारांनी तब्बल 220 टन वजनाची संपूर्ण इमारत एका जागेवरुन दुसऱ्या जागी हलवली आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून लोक ही अश्यकप्राय गोष्ट असल्याचे म्हणत आहेत.

कॅनडाच्या स्कॉशिया शहरात असलेली ही इमारत 1826 मध्ये बांधली गेली होती. त्यानंतर ती व्हिक्टोरियन एल्मवुड हॉटेलमध्ये बदलली गेली. 2018 पासून ही इमारत पाडण्याची योजना सुरू होती. बऱ्याच प्रयत्नानंतर कोणताही पर्याय शिल्लक नसल्यामुळे शेवटी हे हॉटेल दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. गॅलेक्सी प्रॉपर्टीज या रिअल इस्टेट कंपनीने हॉटेल विकत घेतले आणि ते नवीन ठिकाणी हलवले.

काय म्हटलंय पोस्टमध्ये?

साउथ एंड हॅलिफॅक्स मधील ऐतिहासिक एल्मवुड हॉटेलने जवळजवळ 200 वर्षांमध्ये पहिला प्रवास केला, पण हा शेवटचा प्रवास नव्हता. अंदाजे 30 फूटांपर्यंत ही इमारत सहजरित्या हलवण्यात आली आहे. आयव्हरी साबण, दोन मोठे जेसीबी आणि एक हेवी ड्युटी रेकर यांच्याद्वारे अगदी सुरळीतपणे आणि हळूहळू 220 टन इमारतीला हलवण्यात आले. आम्ही ती पुढच्या बॅरिंग्टन रस्त्यावर हलवू, असे या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

220 टन वजनाची ही भव्य इमारत 700 साबणांच्या मदतीने 30 फूट हलवण्यात आली. एस रश्टन कस्ट्रक्शनच्या टीमने हे अशक्य काम शक्य करून दाखवले आहे. एस रश्टन कस्ट्रक्शनच्या टीमने त्याचा व्हिडिओही फेसबुकवर शेअर केला आहे. साबणाच्या मदतीने इमारत सहजपणे 30 फूट हलवली गेली. नवीन पाया तयार झाल्यानंतर भविष्यात इमारत दुसऱ्या ठिकाणी हलवली जाईल. भविष्यासाठी ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे, असे कंपनीचे मालक शेल्डन रश्टन यांनी सांगितले.