'हे दुर्दैवी असून, तुम्ही शहराला अत्याधुनिक करताना...,' घाटकोपर दुर्घटनेमुळे आनंद महिंद्रा संतापले, 'CM शिंदेंनी...'

Anand Mahindra on Ghatkopar Hoarding Collapse: मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग (Ghatkopar Billboard Collapse) अंगावर कोसळल्याने 14 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून या दुर्घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीही एक्सवर पोस्ट शेअर करताना संतापाला मोकळी वाट करुन दिली.   

शिवराज यादव | Updated: May 14, 2024, 04:56 PM IST
'हे दुर्दैवी असून, तुम्ही शहराला अत्याधुनिक करताना...,' घाटकोपर दुर्घटनेमुळे आनंद महिंद्रा संतापले, 'CM शिंदेंनी...' title=

Anand Mahindra on Ghatkopar Hoarding Collapse: मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग (Ghatkopar Billboard Collapse) अंगावर कोसळल्याने 14 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून या दुर्घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे 120 बाय 120 स्वेअर फूट आकाराचं हे होर्डिंग पेट्रोल पंपावर पडून शेकडो वाहनं होर्डिंगच्या मलब्याखाली अडकली. एकूण 74 जणांना या मलब्यातून सुखरुपणे बाहेर काढण्यात आलं असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीही एक्सवर पोस्ट शेअर करत संतापाला मोकळी वाट करुन दिली आहे. 

होर्डिंग दुर्घटनेनंतर आरोप प्रत्यारोप केले जात असून जबाबदारी झटकल्या जात आहेत. दुर्घटनेसाठी जबाबदार ठरलेलं एवढं मोठं होर्डिंग उभं करण्यासाठी कोणी परवानगी दिली आणि यामागे कोणते राजकीय कनेक्शन आहेत यासंदर्भात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यादरम्यान आनंद महिंद्रा यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. शहर म्हणून स्वतःला आधुनिक महानगरात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करत असताना हे अस्विकारार्ह असल्याचं आनंद महिंद्रा म्हणाले आहेत.

आनंद महिंद्रा यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 ठार आणि 60 जखमी. ओम शांती! हे स्विकारलं जाऊ शकत नाही. आपण एक शहर म्हणून अत्याधुनिक महानगर होण्याचा प्रयत्न सुरु असताना हे अस्विकारार्ह आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. नियमांचं कठोरपणे पालन केलं पाहिजे".

भावेश भिंडे फरार

हे होर्डिंग ज्या कंपनीच्या मालकीचं आहे त्या कंपनीचा मालक भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) असल्याची माहिती समोर आली आहे. हे होर्डिंग बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट झालं असून दुर्घटनेनंतर भावेश भिंडे फरार आहे. 

भुजबळांनी घेतली उद्धव ठाकरेंची बाजू

भाजपाचे आमदार राम कदम यांनी या प्रकरणावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप केला आहे. अपघातग्रस्त होर्डिंग ज्या 'इगो मिडीया प्रायव्हेट लिमिडेट' कंपनीच्या मालकीचं आहे त्या कंपनीचा मालक भावेश भिंडेबरोबरचा उद्धव ठाकरेंचा एक फोटो पोस्ट करत राम कदम यांनी 'अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते हे या चित्रावरून स्पष्ट होते' असं म्हटलं. पण छगन भुजबळांनी मात्र उद्धव ठाकरेंची पाठराखण केली आहे. 

"सरकार आमचं आहे. महानगर पालिका सुद्धा सध्या आमचीच आहे. उद्धव ठाकरेंचा काय संबंध?" असा प्रतिप्रश्न छगन भुजबळ यांनी केला. "असे अनेक लोक असतात. व्यापारी सगळ्यांकडे येतात. मिठाई घेऊन येतात आणि फोटो काढतात. राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये," असं आवाहन छगन भुजबळांनी केलं आहे.