RCB विरोधातील पराभव धोनीच्या जिव्हारी, निवृत्तीच्या घोषणेची तयारी? CSK च्या कर्मचाऱ्याचा मोठा खुलासा

MS Dhoni Retirement from IPL: महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) अद्याप जाहीरपणे आपल्या निवृत्तीबद्दल काहीही घोषणा केलेली नाही. मात्र चेन्नईच्या (CSK) अधिकाऱ्याने धोनीने दिलेल्या संदेशाचा खुलासा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: May 20, 2024, 03:20 PM IST
RCB विरोधातील पराभव धोनीच्या जिव्हारी, निवृत्तीच्या घोषणेची तयारी? CSK च्या कर्मचाऱ्याचा मोठा खुलासा title=

MS Dhoni Retirement from IPL: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) केलेल्या पराभवामुळे चेन्नई संघ (CSK) प्लेऑफमध्ये दाखल होण्याआधीच बाहेर पडला आहे. शेवटच्या लीग सामन्यात बंगळुरुने चेन्नईचा पराभव करत थाटात प्लेऑफमध्ये प्रवेश केला. दोन्गी संघांची गुणसंख्या 14 असतानाही चेन्नईचा रन रेट बंगळुरुपेक्षा थोडा कमी राहिल्याने त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. चेन्नईच्या चाहत्यांना संघ स्पर्धेतून बाहेर पडण्यापेक्षाही महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) हा कदाचित अखेरचा सामना होता याचं जास्त वाईट वाटत आहे. पण धोनीने अद्याप संघ व्यवस्थापनाला निवृत्तीसंबंधी काहीच सांगितलं नसल्याची माहिती चेन्नईच्या अधिकाऱ्याने दिली आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत चेन्नईच्या वरिष्ठ कर्मचाऱ्याने कशाप्रकारे धोनीने 110 मीटर लांब षटकार लगावल्याने चेंडू बदलण्यात आला आणि त्यामुळे सामन्याचं चित्र पालटलं हे समजावून सांगितलं. यामुळे धोनीचं पुन्हा एकदा आयपीएल स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न भंगलं. 'चेडू हरवला असल्याने आम्हाला तो बदलावा लागला. यश दयालला कोरडा चेंडू मिळाला आणि त्यानंतर फटके लगावणं कठीण झालं,' असं चेन्नईच्या कर्मचाऱ्याने सांगितलं.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, हा पराभव धोनीच्या फार जिव्हारी लागला असून सामन्यानंतर चेन्नईच्या कॅम्पमधून घऱी परतणारा तो पहिला खेळाडू होता. धोनी रविवारीच आपल्या रांचीमधील घरी दाखल झाला. या सर्व घडामोडींदरम्यान धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. त्यावर सूत्राने सांगितलं आहे की, धोनीने अद्याप संघाला आपल्या निवृत्तीच्या योजनासंबंधी काही सांगितलेलं नाही. त्याने संघ व्यवस्थापनाला अंतिम निर्णय़ घेण्यासाठी काही महिने वाट पाहायला सांगितलं आहे. 

"धोनीने अद्याप कोणालाही आपण निवृत्ती घेणार असल्याचं सांगितलं नाही आहे. त्याने संघ व्यवस्थापनाला अंतिम निर्णय घेण्याआधी काही महिने आपण वाट पाहणार असल्याचं सांगितलं आहे," असं सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलं आहे. त्याला धावताना कोणतीही समस्या जाणवत नसून, ही जमेची बाजू आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

'इम्पॅक्ट प्लेयर' नियमावर काही क्रिकेटर्सकडून फार टीका केली जात आहे. धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयात हा नियम महत्वाची भूमिका निभावू शकतो. हा नियम कायम राहिल्यास, धोनी संघासाठी विशिष्ट जबाबदारी पार पाडण्याच्या हेतूने पुढे खेळू शकतो.  कारण हा नियम त्याला संघासाठी विशिष्ट कामगिरी पूर्ण करण्याचं स्वातंत्र्य देतो. पण हा नियम रद्द केल्यास, धोनीचं पुनरागमन कठीण होऊ शकते. चेन्नईच्या कर्मचाऱ्याने सांगितलं आहे की, 'आम्ही धोनीसह संवाद साधण्यासाठी वाट पाहत आहोत. तो नेहमीच संघाच्या हिताचा विचार करतो. काय होतं ते पाहूयात'.