मी एक सामान्य कलाकार आणि सर्वसामान्य घरातील माणूस आहे. परिवर्तनाच्या चळवळीत मी कायम असतो आणि राहीन. आज समाजातील वातावरण गढूळ झालेलं आहे, संविधान धोक्यात आहे, असे किरण माने म्हणाले.
अशावेळी उद्धव ठाकरे हे एकमेव नेता आहेत जे या विरोधात लढा देत आहेत. या लढाईत त्यांच्या पाठीशी उभं राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे खूप विचार करून मी ही राजकीय भूमिका घेतली आहे, असे माने यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरेंची वैचारिक नाळ प्रबोधनकार ठाकरेंशी जोडली गेली आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता जर एक झाल्या तर या प्रजेचे हाल कुत्रंही खाणार नाही हे प्रबोधनकारांचं वाक्य आज कुठेतरी खरं होऊ पाहतंय, असेही किरण माने म्हणाले.
एक संवेदनशील कलाकार तसेच भारताचा सजग नागरिक म्हणून मी गप्प बसू शकत नाही. त्यामुळेच हा निर्णय घेतला. आज पक्ष देईल ती जबाबदारी मी मनापासून पार पाडेन, असे आश्वासन किरण मानेंनी दिलं.
'शिव'बंधन आधीपासून मनाशी बांधलेलंच होतं घट्ट. आज मातोश्रीवर बोलावून ते हातात बांधलं.. ते ही प्रबोधनकार ठाकरेंच्या तिसर्या पिढीतल्या शिलेदारानं... उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी! परिवर्तनाच्या चळवळीला आणखी बळ मिळेल याची खात्री देतो, अशी पोस्ट माने यांनी केलीय.
किरण माने हे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. 'सिंधुताई माझी माई', 'मुलगी झाली हो' आणि 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमामुळे किरण माने घराघरांत पोहोचले. मात्र 'मुलगी झाली हो' या मालिकेत असताना राजकीय पोस्ट केल्याने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.