टीव्हीवरील आनंदी म्हणजेच अविका गौरने छोट्या वयातच खूप नाव कमावलं आहे. 'बालिका वधू' कार्यक्रमातून त्यांना घऱाघरात ओळख मिळाली आहे.
हिट शोमध्ये काम केल्यानंतर अविका गौर 'ससुराल सिमर का' कार्यक्रमात दिसली होती. टीव्हीच्या काही प्रसिद्ध कार्यक्रमांपैकी हा एक आहे. पण या कार्यक्रमात काम करताना अविका गौरला काही धक्कादायक अनुभव आले.
सिद्धार्थ कन्नला दिलेल्या मुलाखतीत अविकाला तिची कोणती भूमिका तिला जास्त भीतीदायक वाटते असं विचारण्यात आलं असता तिने 'ससुराल सिमर का' मधील रोलीची भूमिका असं सांगितलं.
अविकाने कार्यक्रमातील आपल्याला आलेले अजब अनुभव सांगितले.
"मला कार्यक्रमात भूताला कायदा हातात घेऊ नकोस असं सांगावं लागलं होतं", अशी आठवण तिने सांगितली.
"मला तीनवेळा त्रिशूळने मारण्यात आलं होतं. मी कार्यक्रमात अनेक अशक्य गोष्टी केल्या आहेत. मी तीन वेळा मरुन परत आली आहे. 50 वेळा माझं अपहरण झालं. 6 ते 7 वेळा माझं लग्न झालं"
अविकाने पुढे सांगितलं की, "कार्यक्रमात एकाच व्यक्तीशी माझं तीन वेळा लग्न झालं. ससुराल सिमर का पाहिल्यानंतर माझ्या आयुष्यात किती समस्या आहेत असं वाटतं".
अविका जे सांगत होती ते ऐकून सिद्धार्थ कन्नही आश्चर्याने पाहत होता.
अविकाने आपल्या एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की, 14 व्या वर्षी एका विवाहित महिलेची भूमिका निभावल्याने आपल्याला अभिनयातील अनेक छोट्या गोष्टी शिकण्यास मिळाल्या होत्या.
टीव्हीनंतर अविका आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याची तयारी करत आहे. '1920 - हॉरर्स ऑफ द हार्ट' चित्रपटात ती दिसणार आहे.