अल्कोहोलचे सेवन करत असाल तर त्यामुळे नसा खराब होऊ शकतात. महिलांनी एका दिवसात एकापेक्षा जास्त पेये आणि पुरुषांनी दोनपेक्षा जास्त पेये घेतल्यास या समस्येला सामोरे जावे लागते. हातपाय अशक्त दिसणे, हात, बोटे, पाय आणि बोटांमधील संवेदना कमी होणे, चालताना संतुलन गमावणे यामुळेही मुंग्या येऊ शकतात.
गरोदरपणात गर्भाशयाचा आकार वाढल्यामुळे पायांच्या नसांवर दाब येतो यामुळे हाता-पायांना मुंग्या येऊ शकतात. बाळंतपणानंतर या समस्येपासून सुटका होऊ शकते, मात्र मुंग्या आल्यामुळे थकवा किंवा पायांना सूज येत आल्यास डॉक्टरांकडून उपचार करून घेणे आवश्यक आहे.
एकाच जागी खूप वेळ बसल्यावर पायाच्या शीरेवर दाब येऊन तो पाय सुन्न होतो. यामुळे पायाला मुंग्या येतात. बऱ्याचदा मांडी घालून बसल्याने पायाच्या शीरेवर दाब आल्यामुळे मुंग्या येऊ शकतात.
आपल्या शरीराला कॅल्शिअम, पोटॅशिअम, सोडिअम, व्हिटॅमिन बी अशा पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. शरीरात या तत्त्वांची कमतरता निर्माण झाल्यास हातापायांना मुंग्या येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
ल्युपस आणि संधिवात यांसारख्या ऑटोइम्यून आजारांमुळे, आपली प्रतिकारशक्ती शरीराच्या काही भागांवरच आक्रमण करू लागते. यामुळे हातापायांना मुंग्या येण्याची समस्या उद्भवू शकते.
जर तुम्हाला एखादा मोठा आजार असेल आणि यासाठी तुम्ही केमोथेरपी, रेडिएशन थेरपी घेत असाल तर तुम्हाला शरीरात मुंग्या येण्याची समस्या जास्त असते..
पाठीच्या मणक्यावर दबाव पडल्यास शरीरात मुंग्या येऊ शकतात. जेव्हा तुम्ही खूप वजन उचलता किंवा बराच वेळ एकाच स्थितीत राहता तेव्हा मणक्यावर दाब पडू लागतो, यामुळे मुंग्या येण्याची समस्या उद्भवू शकते.
जेव्हा रक्तामधील साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा शरीरात मुंग्या येण्याची समस्या सुरु होते. रक्तातील साखर वाढल्याने नसांना नुकसान पोहोचते, यामुळे हातापायांना मुंग्या येऊ शकतात.