विविध क्षेत्रांच्या माध्यमातून आपल्या कार्यानं देशासाठी महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या आणि एका अर्थी देशसेवेत योगदान देणाऱ्या अद्वितीय व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
केंद्राकडून हा पुरस्कार कला, क्रीडा, राजकारण, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा या आणि अशा काही विभागांसाठी दिला जातो. 2 जानेवारी 1954 मध्ये देशाचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यामार्फत या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली होती.
सर्वप्रथम या पुरस्कारानं गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकटरमण यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
वर्षभरात हा पुरस्कार तीन वेळा दिला जातो. पण, तो प्रत्येकवर्षी दिला जावा अशी बंधनं नाहीत. हा पुरस्कार मिळणाऱ्यांना पदक आणि एक प्रमाणपत्र देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते दिलं जातं.
पुरस्कारासोबतच या पुरस्कारासाठीची धनराशी मात्र दिली जात नाही. हा पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीला भारतीय रेल्वेकडून मोफत प्रवासाची सुविधा मिळते.
केंद्र शासनाच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचं निमंत्रण भारतरत्न पुरस्कार विजेत्यांना प्राधान्यानं दिलं जातं. वॉरंट ऑफ़ प्रेसिडेंसमध्ये त्यांना स्थान मिळतं.
भारतरत्न प्राप्त व्यक्तींना त्या त्या राज्याकडूनही विशेष सुविधा दिल्या जातात.
विशेष म्हणजे भारतरत्न पुरस्कार विजेते त्यांचा बायोडेटा, लेटरहेड विंवा विजिटींग कार्डवर 'राष्ट्रपतींकडून भारत रत्न पुरस्कारानं सन्मानित' किंवा 'भारत रत्न प्राप्तकर्ता' अशा शब्दांत पुरस्काराचा उल्लेख करू शकतात. पण, नावाच्या आधी किंवा नंतर हा बहुमान जोडू शकत नाहीत.