शनिवारपासून नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जी-20 शिखर परिषदेचा रविवारी सायंकाळी समारोप झाला.
रविवारी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढील पर्वासाठी अध्यक्षपद ब्राझीलकडे सोपवलं.
'जी-20' परिषदेचा मानदंड आणि अध्यक्षपदाची सूत्रं पंतप्रधान मोदींनी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुइज इन्सियो लुला दा सिल्वा यांच्याकडे सोपवली.
'जी-20' च्या समारोपामध्ये पंतप्रधान मोदींनी 'स्वस्ति अस्तु विश्व' असा संदेश देत परिषदेची सांगता केली.
पण मोदींनी जगभरातील मोठ्या नेत्यांसमोर उच्चारलेल्या या 'स्वस्ति अस्तु विश्व' वाक्याचा नेमका अर्थ काय याबद्दल सध्या गुगलवर माहिती शोधली जात आहे.
मोदींनी आपल्या भाषणात उच्चारलेल्या या 3 शब्दांचा म्हणजेच 'स्वस्ति अस्तु विश्व'चा अर्थ जगभरामध्ये शांतता नांदो असा होतो.
भारतात आयोजित करण्यात आलेल्या या जी-20 परिषदेचं ब्रीद वाक्य "एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य..." असा होता.
हाच हेतू लक्षात घेत युक्रेन आणि रशिया युद्धाच्या संदर्भातून मोदींनी आपल्या निरोपाच्या भाषणामध्ये 'स्वस्ति अस्तु विश्व' असा उल्लेख केला.