भारताच्या उत्तराखंड राज्यातील पिथौरागढ भागात निसर्गाची अशी अगाध लीला पाहायला मिळते की नकळत भारावून जायला होतं. हे ठिकाण म्हणजे ओम पर्वत.
पिथौरागढपासून साधारण 170 किमी अंतरावर असणाऱ्या नाभीढांग इथं हा पर्वत उभा असून हिंदू धर्मात या पर्वताला अनन्यसाधारण महत्त्वं आहे. या पर्वताच्या अस्तित्वाचा संबंध थेट प्रभू शंकराशी जोडला जातो.
ओम पर्वताचा उल्लेख महाभारत, रामायणासारख्या महाकाव्यांमध्ये पाहायला मिळतो. इथपर्यंत आणणारी यात्रा अनेकांसाठी आयुष्य पालटणारा प्रवास ठरते असं जाणकारांचं मत.
स्कंदपुराणातील मानस खंडानुसार कैलास यात्रेइतकंच या यात्रेलाही महत्त्वं आहे. इथं पोहोचल्यानंतर मनुष्य नश्वर जगापासून दूर जाऊन त्याला शिव-शक्तीची जाणीव होते असं इथं आलेल्य़ांचं म्हणणं असल्याचं सांगितलं जातं.
भारत आणि तिबेटच्या सीमेवर असणाऱ्या या पर्वतावर दरवर्षी बर्फामुळं ओम हा आकार साकारल्याचं पाहायला मिळतं. हिमालयात ओम पर्वताचं विशेष स्थान असून ते प्रती कैलास म्हणून ओळखलं जातं.
समुद्रसपाटीपासून या पर्वताची उंची 6,191 मीटर म्हणजेच 20,312 फूट इतकी आहे. जेव्हा या पर्वतावर सूर्यकिरणं पडतात तेव्हा ओम आकारातील हा शब्द प्रकाशमान झाल्याचं जाणवतं आणि अदभूत दृश्य समोर येतं.