नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीला जाताय? कोरोनाच्या धर्तीवर लागू झालाय नवा नियम, तुम्ही पाहिला?
Shirdi Saibaba Darshan : सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या धर्तीवर राज्य शासन, आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून, त्या अनुषंगानं काही नियमही आखले जात आहेत.
येत्या काळात किंवा नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तुम्हीही शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार असाल तर एका नव्या नियमासाठी तयार राहा.
शिर्डीमध्ये सरकारकडून मास्क सक्ती लागू करण्याच्या सूचना अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्या आहेत.
शिर्डी येथे देशातूनच नाही तर परदेशातून देखील मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचं वक्तव्य भाजप खासदार सुजय विखे यांनी केलं. मास्क नसणाऱ्या भाविकांना दर्शन नाकारलं जाईल अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.
सध्या नागरिकांनी नियमांचं पालन करत इतरांनी देखील या धर्तीवर काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.
कोरोनाची प्राथमिक लक्षणं जाणवत असल्यास तातडीनं चाचणी करून घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. त्यामुळं आता शिर्डीला जाणार असाल, तर मास्कचा वापर नक्की करा आणि कोरोनाला दूर ठेवा.