मुंबईला मलेरिया, डेंग्युचा विळखा; आरोग्य विभागाच्या माहितीनं चिंता वाढली
राज्याच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार सध्या मुंबई आणि गडचिरोलीमध्ये मलेरिया आणि डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
मुंबईसह पुणे, कोल्हापूर, उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये चिकनगुनियाचे रुग्ण आढळून आले आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाकडून नुकतीच मागील वर्षभारातील कीटकजन्य आजाराची माहिती देत हे स्पष्ट करण्यात आलं.
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रक कार्यक्रमांतर्गत राज्यातील मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया या तीन आजारांच्या रुग्णांच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली.
कीटकजन्य आजारांची रुग्णसंख्या वाढत असल्याचं पाहून राज्याच्या आरोग्य विभागाकडून या ठिकाणांवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे.
इतकंच नव्हे, तर राज्यातील प्रतिबंधासाठी अतिसंवेदनशील निवडक व सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱ्या सिंथेटिक प्रायरेथ्राईड गटातील कीटकनाशकाची फवारणीही करण्यात येत आहे.
डेंग्यूला रोखण्यासाठी घरासह आजुबाजूच्या परिसरातील डास अळ्या आढळून आलेले पाण्याच्या साठ्यांमध्ये अळीनाशक टेमिफॉस वापरलं जातं. तर, कायमी पाणीसाठ्यात गप्पी मासे सोडले जातात. हे सर्व उपाय सध्या योजले जात असून, नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहनही केलं जात आहे.