बाबर आझमशी जवळीक पाकिस्तान संघातील सहा खेळाडूंना चांगलीच महागात पडू शकते. टी20 वर्ल्ड कपनंतर संघातून या खेळाडूंची सुट्टी होण्याची शक्यता आहे.
'क्रिकेट पाकिस्तान डॉट कॉम' या वेबसाईटने केलेल्या दाव्यानुसार पीसीबी अध्यक्ष मोहसीन नकवी 'ऑपरेशन क्लीन अप' सुरु करणार आहेत.
टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाला अमेरिका आणि भारताकडून लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला.
आधी एकदिवसीय वर्ल्ड कप आणि आता टी20 वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीमुळे बाबार आझमच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पाकिस्तान क्रिकेट संघातील अनेक खेळाडू हे केवळ बाबर आझमच्या जवळचे असल्यामुळे आहेत, असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. जवळपास 6 खेळाडूंची पाकिस्तान संघातून उचलबांगडी होऊ शकते.
वेबसाईटच्या रिपोर्टनुसार पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी पीसीबीने फारच गांभीर्याने घेतली आहे. लवकरच पीसीबीकडून एक पत्रकार परिषदही घेतली जाण्याची शक्यता आहे.
पीसीबीचे अध्यक्ष नकवी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत पाकिस्तान क्रिकेट संघाला एका मोठ्या सर्जरीची गरज असल्याचं म्हटलं होतं. यावर अनेक खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.