रविवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये एक ऐतिहासिक क्रिकेट सामना पाहायला मिळाला. अफगाणिस्तानने वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडला धुळ चारली.
या सामन्यात अफगाण संघाचा 22 वर्षीय खेळाडू संपूर्ण इंग्लिश संघावर वर्चस्व गाजवताना दिसला.
या खेळाडूने प्रथम फलंदाजीने वादळ निर्माण केले आणि नंतर गोलंदाजी करताना इंग्लंडकडून वेगवान फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंच्या विकेट्स घेत संघाला विजयाचा उंबरठा ओलांडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
22 वर्षीय मुजीब उर रहमानने विश्वचषक 2023 मध्ये अफगाणिस्तानकडून खेळताना आपल्या घातक कामगिरीमुळे इंग्लंडला पराभूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना रहमानउल्ला गुरबाजने उत्कृष्ट फटकेबाजी करत 80 धावा जोडल्या.यानंतर इक्रम अलीखिलने 58 धावा केल्या. अखेरीस, मुजीबने अवघ्या 16 चेंडूंत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 28 धावा जोडल्या.
फलंदाजीनंतर मुजीबने गोलंदाजीतही कमाल दाखवली. त्याचा सहकारी राशिद खानसोबत त्याने इंग्लंड संघाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
इंग्लंडसाठी घातक फलंदाजी करणाऱ्या हॅरी ब्रूकला (66) मुजीबनेच पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. याशिवाय जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला जो रूट (11) हाही मुजीबने क्लीन बोल्ड केला. त्याची तिसरी विकेट ख्रिस वोक्सच्या (9) रूपाने आली.
या अष्टपैलू कामगिरीमुळे मुजीब उर रहमानला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.