भारतीय वंशाचे सुंदर पिचाई हे गेल्या नऊ वर्षांपासून गुगलचे सीईओ म्हणून काम करत आहेत. ऑगस्ट 2015 मध्ये त्यांनी पदभार सांभाळला होता.
सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या शेअर्समध्ये 400 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. याचा फायदा पिचाई यांना होत आहे.
अशातच आता सुंदर पिचाई यांच्याबद्दल एक गुड न्यूज समोर आलीये. सुंदर पिचाई लवकर बिलिनियर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शेअर्समधील प्रचंड वाढीमुळे सुंदर पिचाई हे जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सीईओंपैकी एक बनलेत. त्यांची संपत्ती जवळपास एक अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.
सुंदर पिचाई यांच्या नेट वर्थमध्ये $424 दशलक्ष किमतीचे विद्यमान शेअर्स आहेत. तर सीईओ झाल्यानंतर विकल्या गेलेल्या शेअर्समधून सुमारे $600 दशलक्षचा फायदा त्यांना झाला आहे.
गुगल कंपनीला त्याच्या क्लाउड कॉम्प्युटिंग युनिटमध्ये AI-चालित वाढीमुळे चालना मिळली. त्यामुळे कंपनीने इतिहासात प्रथमच इतका नफा कमावला आहे.
दरम्यान, सुंदर पिचाई यांच्या नेटवर्थविषयी सर्वांना उत्सुकता असते. भारतातील अनेक तरुण सुंदर पिचाई यांच्याकडून प्रेरणा घेत आहे.