मुंबई इंडियन्सचे वरिष्ठ खेळाडू हार्दिक पांड्यावर प्रचंड नाराज; कोचिंग स्टाफकडे केली तक्रार

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या आयपीएलमधील (IPL) लाजिरवाण्या कामगिरीमुळे कर्णधार हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) टीका होत आहे. त्यातच मुंबई इंडियन्स संघातील अनेक वरिष्ठ खेळाडू हार्दिक पांड्यावर नाराज असून त्यांनी कोचिंग स्टाफकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे.   

शिवराज यादव | Updated: May 9, 2024, 03:43 PM IST
मुंबई इंडियन्सचे वरिष्ठ खेळाडू हार्दिक पांड्यावर प्रचंड नाराज; कोचिंग स्टाफकडे केली तक्रार title=

IPL 2024: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या आयपीएलमधील (IPL) लाजिरवाण्या कामगिरीमुळे कर्णधार हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) टीका होत आहे. त्यातच मुंबई इंडियन्स संघातील अनेक वरिष्ठ खेळाडू हार्दिक पांड्यावर नाराज असल्याचं समजत आहे. मुंबई इंडियन्स संघाने स्पर्धेच्या आधी आतापर्यंत पाचवेळा आयपीएल जिंकवून देणाऱ्या रोहित शर्माला हटवत हार्दिक पांड्याला कर्णधार केलं होतं. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना हा निर्णय आवडला नव्हता. याचा परिणाम मुंबई इंडियन्सच्या सामन्यांमध्येही पाहायला मिळाला होता. अनेक सामन्यात हार्दिक पांड्याला चाहत्यांनी ट्रोल केलं होतं. 

दरम्यान इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्सच्या अनेक महत्त्वाच्या खेळाडूंनी कोचिंग स्टाफकडे तक्रार केली आहे. ड्रेसिंग रुममध्ये अपेक्षित वातावरण नसून, यासाठी हार्दिक पांड्याचं नेतृत्व जबाददार असल्याचं त्याचं म्हणणं आहे. 

मुंबई इंडियन्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे की, ही नेतृत्वामुळे निर्माण झालेली समस्या नाही तर जो संघ गेल्या 10 वर्षांपासून रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळला आहे त्याला हा बदल लगेच आत्मसात झालेला नाही. "नेतृत्वात बदल झाल्यानंतर प्रत्येक संघात अशा समस्या निर्माण होत असतात. खेळात असं नेहमीच होत असतं," असं त्यांनी म्हटलं आहे.

ज्यांना या घडामोडींबद्दल माहिती आहे त्यांनी सामन्यानंतर खेळाडू आणि कोचिंग स्टाफमध्ये बैठक झाल्याचं सांगितलं आहे. या बैठकीत रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह हजर होते. यावेळी त्यांनी संघ चांगली कामगिरी करण्यात अपयशी का ठरत आहे याबद्दल विश्लेषण केलं. त्यांनी आपले विचार आणि कारणं सांगितली. यानंतर संघ व्यवस्थापनाचे प्रतिनिधी आणि काही वरिष्ठ खेळाडूंमध्ये प्रत्येकी चर्चा झाली. 

तिलक वर्माबाबातचं विधान भोवलं

दिल्लीविरोधातील सामन्यात पराभव झाल्यानंतर हार्दिक पांड्याने सर्वाधिक धावा कऱणाऱ्या तिलक वर्माकडे बोट दाखवलं होतं. तिलक वर्मा सामन्याबद्दल जास्त जागरुक नसल्याने पराभव झाल्याचं हार्दिक पांड्या म्हणाला होता. "जेव्हा अक्षर पटेल डावखुऱ्या फलंदाजला गोलंदाजी करत होता, तेव्हा त्याच्यावर आक्रमण करणं गरजेचं होतं," असं हार्दिकने सामन्यानंतर म्हटलं होतं. त्याने पुढे म्हटलं होतं की, "मला वाटतं सामन्याबद्दलची जागरुकता नसण्याचा फटका आम्हाला बसला. दिवसाच्या शेवटी अखेर आम्हाला सामना गमावत किंमत मोजावी लागली आहे".

हार्दिक पांड्याने संघाच्या पराभवासाठी एका खेळाडूला जबाबदार धरणं ड्रेसिंग रुममधील अनेकांना रुचलं नाही अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान अनेक तज्ज्ञांनी मुंबई इंडियन्स संघात सगळं काही आलबेल वाटत नसल्याचं जाहीरपणे म्हटलं आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने तर मुंबई इंडियन्स संघात दोन गट पडले असावेत असं दिसत असल्याचं जाहीरपणे म्हटलं होतं. 

"मला वाटतंय की ड्रेसिंग रुममध्ये वेगवेगळे गट पडले आहेत आणि त्यामुळे सर्व काही नीट होत नाही आहे. ते मैदानात संघ म्हणून खेळताना दिसत नाहीत," असं क्लार्कने म्हटलं आहे. मुंबई इंडियन्सच्या प्रतिनिधीने यावर्षीही संघ व्यवस्थापन परिस्थितीचा आढावा घेईल आणि गरज लागल्यास भविष्यासाठी निर्णय घेतला जाईल असं सांगितलं आहे.