'आम्ही घर, पक्ष फोडत नाही फक्त संधी मिळाली तर...' फोडाफोडीच्या राजकारणावर काय म्हणाले फडणवीस?

Devendra Fadanvis On BJP Break Party:  शाश्वत शहर होण्याच्या दृष्टीने पुण्याची वाटचाल सुरू आहे. हा मोदींच्या दूरदृष्टीचा परिणाम असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Pravin Dabholkar | Updated: May 11, 2024, 04:34 PM IST
'आम्ही घर, पक्ष फोडत नाही फक्त संधी मिळाली तर...' फोडाफोडीच्या राजकारणावर काय म्हणाले फडणवीस? title=
Devendra Fadanvis on Bjp Break Party

Devendra Fadanvis On BJP Break Party: भारतीय जनता पार्टीने सत्तेत राहण्यासाठी पक्ष फोडले, घरे फोडली अशी टीका विरोधकांकडून केली जाते. यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिले आहे. पुण्याच्या जागेकडे सर्वांचे लक्ष आहे. गावांबरोबर शहरांचा विकास हा विचार मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदा मांडला. पुण्याची मेट्रो ही मोदींनी दिलेली सर्वात मोठी देन आहे. शाश्वत शहर होण्याच्या दृष्टीने पुण्याची वाटचाल सुरू आहे. हा मोदींच्या दूरदृष्टीचा परिणाम असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

नरेटिव्हने निवडणूक जिंकता येत नाही. गद्दार, खुद्दार यावर निवडणूक जिंकता येत नाही. विरोधकांकडे बोलण्यासाठी मुद्दे नाहीत, आम्ही विकासावर बोलतो. आम्ही 45 जागा जिंकणार अशी घोषणा देणाऱ्यांना कुठल्या आम्ही तीन जागा सोडल्या ते विचारतो.पण बारामती आम्ही 100 टक्के जिंकणार आहोत, असा विश्वास फडवणवीसांनी व्यक्त केला. 

'13 जागा आमच्यासाठी सोडल्या याबद्दल धन्यवाद'

संजय राऊत आणि राहुल गांधी एकाच बुद्धिमत्तेचे असल्याची टीका त्यांनी केली. भाजपसाठी निवडणूक कठीण झालीय हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी सेट केलेलं नरेटिव्ह. मात्र प्रत्यक्षात तसं अजिबात नाही. आम्ही चांगल्या जागा जिंकू. 35 जागा जिंकणार असं पवार म्हणाले. 13 जागा आमच्यासाठी सोडल्या याबद्दल त्यांचे धन्यवाद अशा मिश्किल टोला त्यांनी यावेळी लगावला. 

मला आणि गिरीश महाजनांना आत टाकण्याचा कट

पहिल्या टप्प्यात नागपूर माझे हेड क्वार्टर होतं. दुसऱ्या टप्प्यात संभाजीनगर होतं. आता पुणे आहे. यानंतर मुंबई असणार असल्याचे ते म्हणाले. मला आणि गिरीश महाजनांना आत टाकण्याचा संपूर्ण कट रचला गेला होता. एका पोलीस आयुक्तांना ते काम देण्यात आलं होतं. त्याचे मी व्हिडिओ सहित पुरावे दिले होते, असे ते म्हणाले. 

केजरीवालांनी असं काय चांगलं काम केलं?

केजरीवाल अंतरिम जामिनावर बाहेर आले आहेत. बाहेर आले म्हणून त्यांचं स्वागत सत्कार होताहेत. त्यांनी असं काय चांगलं काम केलं? असा प्रश्न फडणवीसांनी विचारला. मोदींची शरद पवारांना ऑफर ही बातमी चुकीची आहे. ती ऑफर नाही, तर तो सल्ला आहे. शरद पवार बारामती हरणार आहेत असे ते म्हणाले. 

उद्धव ठाकरेंना  मानसोपचार तज्ज्ञांची गरज 

उद्धव ठाकरे आणि पवार दोघेही डूबत्या नावेत बसायला निघाले. त्यांचे राजकीय मनसुबे पूर्णत्वाला न्यायचे असेल तर  त्यापेक्षा आमच्यासोबत या हा सल्ला मोदींनी दिला. उद्धव यांना मी गांभीर्याने घेत नाही. उद्धव यांना आता मदतीची आवश्यकता आहे. त्यांना कुठल्यातरी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घालून द्या असा त्यांच्या जवळच्या लोकांना फडणवीसांनी सल्ला दिलाय.

आम्ही घर फोडत नाहीत पण..

आम्ही घर फोडत नाही आणि पक्षही फोडत नाही. फक्त संधी मिळाली तर ती सोडत नाही. जे सोबत येवू इच्छितात त्यांना सोबत घेतो, असे ते यावेळी म्हणाले. 

मशिदीत मोठ मोठे स्क्रीन लावून कुणाला मतदान करा आणि करू नका सांगितलं जात आहे. हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडतंय.
शरद पवार आणि गांधींचा काय संबंध ? असा प्रश्न त्यांनी विचारला. 

वायकरांना त्याबद्दल विचारणार 

माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर ईडीचा दबाव होता, असे रवींद्र वायकरांनी म्हटले होते. यावरही ते म्हणाले. रवींद्र वायकर नेमकं असं का म्हणाले त्यांना मी विचारणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

दाभोलकर हत्या प्रकरण

दाभोलकर प्रकरणात 3 जण निर्दोष सुटले. या प्रकरणात वरच्या न्यायालयात जायचे किंवा नाही याचा निर्णय कायदा आणि न्याय विभाग घेईल, असेही त्यांनी सांगितले.