आजच्या काळात बरेचसे लोक प्रवास करताना गूगल मॅपचा वापर करणं सोयीचं मानतात. गूगल मॅपच्या वापरामुळे आपला प्रवास अगदी सोपा होऊन जातो.
परंतु, काही वेळा गूगल मॅप आपल्यासाठी अडचणींचं कारण ठरु शकतो.
गूगल मॅपमुळे बऱ्याचदा लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. नुकतंच, एक कुटूंब गूगल मॅपमुळे जंगलात फसल्याची माहिती समोर आली.
तसेच, यूपी मध्ये गूगल मॅपद्वारे दाखवल्या गेलेल्या चुकीच्या रस्त्यामुळे 3 जणांना आपला जीव गमवावा लागल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच समोर आली होती.
जर तुम्ही डोळे झाकून गूगल मॅपवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच सावध व्हा. प्रवास करताना पूर्णपणे गूगल मॅपवर अवलंबून न राहता 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
जर तुम्ही प्रवास करताना गूगल मॅपचा वापर करत आहात तर प्रवासादरम्यान तुम्ही ज्या वाहनाचा वापर करत आहात त्याचा मोड सुरू करायला अजिबात विसरु नका. जसे, कार मोड, बाईक मोड इ.
जरी तुम्ही गूगल मॅपचा वापर करत असाल तरी तिथल्या स्थानिक लोकांकडून त्या संबंधित ठिकाणाची माहिती करुन घ्या.
विशेषत: रात्रीच्या वेळेत जर तुम्ही प्रवास करत असाल तर अशा वेळी गूगल मॅपचा वापर बऱ्याच अडचणींना कारणीभूत ठरु शकतो.