मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात लोक प्रवासासाठी टॅक्सी किंवा रिक्षा या सार्वजनिक वाहनांचा वापर करतात. पण अनेकदा टॅक्सी चालकांकडून जवळचे भाडे असल्याने नाकारण्यात येतं

जवळचं किंवा मनाविरुद्ध भाडं असल्यावर टॅक्सी चालक सर्रासपणे प्रवाशांना नकार देत असल्याचा अनुभव जवळपास प्रत्येक मुंबईकराला रोज येतो. यामुळे अनेकदा प्रवाशांचे टॅक्सी चालकांसोबत वाद होतात.

पण आता ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी परवानाधारकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे या विरुद्ध तक्रार करायची असल्यास व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करता येणार आहे.

यासाठी 9152240303 क्रमांक आणि mh03autotaxicomplaint@gmail.com ईमेल आयडी प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) यांनी उपलब्ध करून दिला आहे.

या अंतर्गत 31 जुलै पर्यंत परिवहन कार्यालयात एकूण 154 तक्रारींची नोंद झाली आहे. तक्रारींमध्ये 45 तक्रारी ठोस कारणाशिवाय भाडे नाकारणे, सात तक्रारी या मीटरप्रमाणे देय असलेल्या भाड्यापेक्षा जादा भाडे आकारणे व दोन तक्रारी प्रवाशांशी गैरवर्तन करणे याबाबत प्राप्त झाल्या आहेत.

54 परवानाधारकांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. यापैकी 99 परवानाधारकांचे ठोस कारणांशिवाय भाडे नाकारणे या कारणासाठी परवाना 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे.

दोन परवानाधारकांचे प्रवाशांशी गैरवर्तन करणे, दोन परवानाधारकांचे मीटरप्रमाणे देय असलेल्या भाड्यापेक्षा जादा भाडे आकारणे या कारणासाठी परवाना 10 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे.

नागरिकांशी गैरवर्तन करू नये अन्यथा या कार्यालयाकडून या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जाईल असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.

परिवहन कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रवासी तक्रार मदत कक्षाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टॅक्सी चालकांच्या या मुजोरपणाला आळा घालण्यासाठीच आरटीओने ही भूमिका घेतली आहे.

VIEW ALL

Read Next Story