पठ्ठ्यानं गोल्ड मेडल जिंकलंय!
सध्या चीनमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी पहायला मिळत आहे. अशातच बीडच्या अविनाश साबळे याने मैदान मारलं आहे.
३००० मीटर स्टीपलचेसमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळालंय. आशियाई स्पर्धेतील यंदाचं पहिलं गोल्ड मेडल मराठमोळ्या अविनाश साबळेनं मिळवून दिलंय.
अविनाशनं 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये ८ मिनिटं १९ सेकंदात रेस पूर्ण करत आशियाई स्पर्धेतला रेकॉर्ड प्रस्थापित केलाय.
मूळचा बीडचा असलेल्या अविनाश साबळे यानं काही महिन्यांपूर्वी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये रौप्य पदक मिळवलं होतं. त्यानंतर आता त्याने भन्नाट कामगिरी केलीये.
दरम्यान अविनाशच्या या पदकानंतर पदतालिकेत भारतानं चौथ्या स्थानी झेप घेतलीय. तर याच स्पर्धेत तो 5000 मीटर स्टीपलचेसमध्येही सहभागी होणार आहे.
सुवर्णपदक जिंकून मी आनंदी आहे. जेव्हा मी स्क्रीन पाहिली आणि मला चांगली आघाडी मिळाली होती, तेव्हा मी सावकाश होऊन पदक सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला, असं अविनाश साबळे याने विजयानंतर म्हटलं आहे.