30 ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 5 सामने खेळवण्यात आले आहेत. यंदा पाकिस्तानकडे एशिया कपचं यजमानपद आहे.
पाकिस्तानकडे यजमानपद असलं तरी केवळ चार सामने पाकिस्तानात होणार आहेत. यातले दोन सामने पार पडले असून दोन सामने बाकी आहेत.
यादरम्यान भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्यासह चार अधिकारी पाकिस्तानात दाखल झाले आहेत. पीसीबीचे अध्यक्ष झाका अशरफ यांनी त्यांचं स्वागत केलं.
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे आज वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात दाखल झाले असून त्यांचा दोन दिवसांचा दौरा असणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या आमंत्रणावरुन रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला पाकिस्तानमध्ये पोहोचले असून लाहोरमध्ये होणारा श्रीलंका-अफगाणिस्तानच्या सामन्यासाठी ते उपस्थिती लावणार आहेत.
पाकिस्तान मीडियाने दिलेल्या माहितीनुसार पीसीबी आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये एशिया कप आणि वन डे वर्ल्ड कप संदर्भात चर्चा होईल. डीनर कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
एकदिवसीय वर्ल्ड कप येत्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार आहे. यासंदर्भातही चर्चा करण्यात येणार आहे.