मारुती सुझुकीने नुकतंच आपली 8 सीटर कार Invicto ला अधिकृतपणे लाँच केलं आहे. ही कार टोयोटा इनोव्हा हायक्रॉसवर आधारित आहे.
कंपनीने कारच्या लूक आणि फिचर्समध्ये काही बदल केले आहेत. या MPV ची सुरुवातीची किंमत 24 लाख 79 हजार ठेवण्यात आली आहे. टॉप मॉडेलसाठी 28 लाख 42 हजार (Ex Showroom) मोजावे लागणार आहेत.
Maruti Invicto मध्ये काही खास फिचर्स देण्यात आले आहेत, जे मारुती सुझुकीच्या आतापर्यंतच्या कोणत्याही कारमध्ये देण्यात आलेले नाहीत. जाणून घ्या हे खास फिचर्स
ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल हे फिचर कंपनीने पहिल्यांदा आपल्या लक्झरी सेडान Kizashi मध्ये दिलं होतं. पण हे फक्त पुढील सीटवरील प्रवाशासाठी होतं. Invicto मध्ये मागे बसणाऱ्या प्रवाशांनाही हे फिचर देण्यात आलं आहे.
मारुती सुझुकीची ही पहिला कार आहे, ज्यामध्ये 10.1 इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. याला फ्रीस्टँडिंग लेआऊट देण्यात आलं आहे, जे अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कार प्लेला सपोर्ट करतं.
ही मारुतीची पहिली कार आहे, ज्यामध्ये 2.0 लीटर क्षमतेचं हायब्रीड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 172bhp ची पॉवर आणि 188 Nm चा टॉर्क जनरेट करतं. हायब्रीड असल्याने यामध्ये इलेक्ट्रिक मोटरही देण्यात आली आहे.
कंपनीने या कारमध्ये फ्रंट पार्किंग सेन्सर देत आहे. पण तुम्ही अॅक्सेसरीज म्हणून हे फिचर मारुतीच्या कोणत्याही कारमध्ये मिळवू शकता.
मारुती सुझुकीने या कारच्या माध्यमातून पहिल्यांदा पॉवर्ड टेलगेट म्हणजेच डिक्की दिली आहे. म्हणजेच तुम्हाला डिक्की उघडण्यासाठी फक्त एक बटण दाबावं लागणार आहे.