'संगीत देवबाभळी'च्या अखेरच्या प्रयोगावेळी व्यासपीठावरच दाटला कलाकारांचा कंठ
प्राजक्त देशमुख यांचं लेखन, दिग्दर्शन असणाऱ्या या दोनपात्री नाटकामध्ये शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी या दोघींनी प्रेक्षकांच्या नजरा खिळवल्या.
पांडुरंगाच्या भक्तित तल्लिन असणाऱ्या तुकोबारायांची भार्या आवली आणि पांडुरंगाची अर्धांगिनी लखुबाई, अर्थात रखुमाई या दोघींमधला सुरेल संवाद या नाटकाच्या निमित्तानं प्रेक्षकांनी पाहिला.
मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये या नाटकाचा अखेरचा 500 वा प्रयोग पार पडला. यावेळी नाटकाच शेवटची 'जखम भरली बयेsss' हे शब्द कानी पडले आणि पार्श्वसंगीतासह सांगड घालणाऱ्या त्या दृश्यानं प्रेक्षकांच्याही अंगावर काटा उभा राहिला.
जवळपास मागच्या सहा वर्षांहून अधिक काळापासून हे नाटक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रसिकांपर्यंत पोहोचलं आणि आवली, लखुबाईच्या सोबतीनं तुकोबा आणि साक्षात पांडुरंगाचंही अस्तित्वं अनेकांनाच जाणवलं.
प्रपंचातला प्रसंग आणि त्याला भक्तिची जोड, उत्तम संवाद आणि तितकंच उत्तम संगीत, व्यासपीठावरील आणि व्यासपीठामागील कलाकारांची प्रचंड मेहनत असं सर्वकाही या नाटकामुळं रसिकांना पाहता आणि अनुभवता आलं.
अशा या नाटकाच्या अखेरच्या प्रयोगाच्या वेळी प्रत्येकाचच अंत:करण जड झालं होतं. व्यासपीठावर प्राजक्त देशमुखनं थरथरत्या आवाजातच मनोगत व्यक्त केलं आणि तिथं असणाऱ्या कलाकारंच्या डोळ्यातून आसवं वाहू लागली.
असंख्य प्रेक्षक आणि कलाजगतातील काही नामवंत चेहऱ्यांनी 'संगीत देवबाभळी'च्या अखेरच्या प्रयोगाला हजेरी लावली होती. 'इंद्रायणीर्पणमस्तू...' असं लिहित प्राजक्त देशमुख यांनी या कालाकृतीला पूर्णविराम दिला आणि एका अध्यायावर पडदा पडला. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)