पावसाळा सुरु झाल्यानंतर घरातील विशेषतः खाण्या-पिण्याच्या पदार्थांची जास्त काळजी घ्यावी लागते. पावसाच्या पाण्यामुळं ते सडतात किंवा त्यात आळ्या पडतात. असंच पावसाळ्यात लसूण आणि कांदा, बटाट्यांना कोंब फुटतात, अशा वेळी काय करावे, जाणून घ्या.
पावसाळ्यात डाळी, लसूण, बटाटे, कांदे, मसाले नरम पडतात किंवा सडतात. काही वेळा कांद्यांना व लसणांना अंकुर फुटतात, त्यामुळंच ते कसे स्टोअर करावे हे जाणून घेऊया.
कांदे नेहमी कोरड्या खुल्या जागेत ठेवावेत. किचनमध्ये अडगळीच्या जागी कांदा चुकूनही ठेवू नका. कांदा सुकलेला असेल तर जास्त काळ टिकतो. त्यामुळं बाजारातून कांदा विकत घेताना सुकलेला कांदा घ्या. कांदा कधीही बटाट्यासोबत ठेवू नका
लसूण बंद जागी ठेवू नका. लसूण सोलून एका एअरटाइट डब्यात बंद करुन फ्रिजमध्ये ठेवा. किंवा झिपलॉक पिशवीत ठेवून फ्रीजमध्ये ठेवल्यास तीन ते चार आठवडे आरामात टिकू शकतात.
लसूण घेताना कधीच ओला लसूण आणू नका. कारण पावसाळ्यात लसूणाला आतून बुरशी लागते. त्यामुळं कोरड्या जागीच लसूण ठेवा
लसूण आणल्यानंतर सोलून तो तेलात तळून घेतला तरी जास्त दिवस टिकतो. भाजीत तुम्ही हाच लसूण वापरु शकता.
बटाटे आणल्यानंतर त्यावरील माती लगेचच काढू नका. असे केल्याने तो लवकर खराब होण्याची शक्यता आहे. जेव्हा गरज असेल तेव्हाच बटाटा धुवा. कारण पाणी लागल्यामुळं बटाटा कुजण्याची शक्यता असते.