महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना मागील 24 तासांपासून वेग आला असून, कैक मोठ्या अपडेट दरम्यानच्या काळात समोर आल्या आहेत.
मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार हे नाव अद्यापही गुलदस्त्यात असतानाच राजभवनावर राज्यपालांची वेळ घेत तिथं मात्र नेत्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.
या सर्वच घडामोडींमध्ये राज्यात सत्तास्थापनेनंतर नेमकं मंत्रिमंडळ कसं असेल, यासंदर्भातील माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समोर आली आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार सत्तास्थापनेदरम्यान भाजपकडून महाराष्ट्रात गुजरात पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे.
थोडक्यात निवडून आलेल्या आमदारांपैकी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. जातिगत समीकरणं आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा भाजपचा उद्देश महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेदरम्यान केंद्रस्थानी असेल असं म्हटलं जात आहे.
परिणामी एकूण मंत्र्यांपैकी बहुतांश मंत्रीपदांवर युवा चेहऱ्यांना भाजप संधी देणार आणि हे युवा चेहरे कोण असणार याचीच उत्सुकता आता सर्वत्र पाहायला मिळत आहे.