गांधी हत्या हे तर त्यांचं इच्छा मरण
www.24taas.com, नवी दिल्ली
राष्ट्रपिता महात्मा गांधी हत्या झाली नसून अशा प्रकारे मृत्यू यावा, अशी त्यांनीच इच्छा व्यक्त केली होती, असा दावा सुप्रसिद्ध गांधीवादी आणि गांधी कथेसाठी चर्चित असलेल्या नारायणभाई देसाई यांनी केला आहे. महात्मा गांधी यांचे जीवन एक दुखांत नाटक होते आणि त्यांनी आपल्या मृत्यूची घोषणा सव्वा वर्षापूर्वीच केली होती. त्यामुळे त्याची हत्या झाली नाही तर ही त्यांची इच्छा मृत्यू होती असा अजब दावा नारायणभाईंनी केला आहे.
नवी दिल्लीतील गांधी स्मृती आणि दर्शन समितीतर्फे आयोजित गांधी कथामध्ये महात्मा गांधीचे स्वीय सचिव महादेवभाई यांचे पूत्र नारायणभाई देसाई यांनी हा दावा केल आहे. गांधींची हत्या ही कट्टरतेने झाली होती, परंतु याची घोषणा त्यांनी नौआखली दंगली दरम्यानच केली होती, असे नारायणभाईंनी सांगितले.
१९४६च्या ऑक्टोबर-नोव्हेबर महिन्यात नौआखली दंगल उसळली होती. त्यात बापूंनी आपल्या सहकारी डॉक्टर सुशीला यांना सांगितले होते की, मला कोणत्याही आजाराने किंवा फोडं येऊन मरण आलं तर घराच्या छतावर जाऊन तुम्ही मोठ्याने ओरडून सांगा की हा माणूस ढोंगी होता. त्याची ईश्वरावर कोणतीही आस्था नव्हती. परंतु मला प्रार्थनेला जात असताना कोणी गोळी झाडून मारले आणि मारणाऱ्याच्या डोळ्यात कोणत्याही प्रकारची करुणा नसेल तर तेव्हा हा माणून ईश्वर भक्त होता असे सांगण्यास स्वतः गांधीजींनी लावले होते. त्यामुळे ही त्यांची हत्या नसून इच्छा मरण होते, असेही नारायणभाईंनी सांगितले.
या घटनेनंतर महात्मा गांधी यांनी अनेक वेळा सांगितले होते, की माझे मरण प्रार्थनेला जात असताना कोणी गोळी झाडून होणार आहे. आपल्या मृत्यूबद्दल बोलताना गांधीजी नेहमी फोडांचाही उल्लेख करत होते. कारण त्यांच्या वडिलांचा मृत्यू भगंदरने झाला होता.
गांधीजींच्या मृत्यूनंतर या गोष्टीला लॉर्ड माऊंटबॅटन यांनीही दुजोरा दिला होता. त्यांनी सांगितले की, गांधी मला म्हणाले होते, जेव्हा माझ्या मुखात ईश्वराचे नाम आणि हृदयात ईश्वराचा वास असेल तेव्हाच मला मरण येणार आहे.
विशेष म्हणजे नौआखलीमध्ये १९४६मध्ये केलेली घोषणा ३० जानेवारी १९४८मध्ये सत्य झाली. या दिवशी नथ्थूराम गोडसे याने प्रार्थनेला जात असताना गांधीजींची गोळी झाडून हत्या केली.
गांधी हत्या हे तर त्यांचं इच्छा मरण