Ashadhi Ekadashi : आषाढी वारीच्या धर्तीवर पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, बातमी पाहूनच घराबाहेर पडा
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवत असतानाच पुणे आणि नजीकच्या भागात काही महत्त्वाचे वाहतूक बदल करण्यात येतात. पाहा यंदाच्या वर्षाचे बदल...
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन थोपलेली असतानाच आता राज्याच्या विविध भागांमधून संतमंडळींच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवण्यास सुरुवात केली आहे. हजारोंच्या संख्येनं वारकरी या पालखी सोहळ्यांमध्ये सहभागी होत पायवारी करत पंढरपूरच्या दिशेनं रवाना होत आहेत. सध्या काही संतांच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवलेलं असतानाच संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्यांचा प्रस्थान सोहळा नुकताच पार पडला.
सदरील दोन्ही पालखी सोहळ्यांना होणारी गर्दी आणि त्याचे प्रवासमार्गांवर होणारे परिणाम पाहता पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नागरिकांना वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल झाले असून, त्यांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे- सासवड- लोणंद मार्गे पुणे ग्रामीण भागातून पंढरपूरच्या दिशेनं निघेल. तर, संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातून निघून सोलापूरच्या दिशेनं रवाना होईल. या मार्गात पालखी बारामतीतून पुढे अकलूजमार्गे पंढरपुरात येईल. परिणामी दोन्ही पालख्यांच्या अनुशंगानं पुण्यातील वाहतुकीचे नियम 14 जून ते 24 जूनपर्यंत बदलण्यात येतील. ज्यामुळं नागरिकांना पर्यायी मार्गांची वाट धरावी लागणार आहे.
माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी पुण्यातील वाहतुकीत करण्यात आलेले बदल खालीलप्रमाणे
- पुणे ते सासवड (सासवड मुक्कामी)- पुणे ते सासवड (दिवे घाट- बोपदेव घाट मार्गे) वाहतुक 14 जून रोजी दुपारी 2 वाजल्यापासून 16 जून दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद असेल. यारम्यान वाहतूक खादीमशिन चौक, कात्रजमार्गे वळवण्यात येईल. तर, सासवडहून पुण्याकडे येणारी वाहतूक गराडे- खेड शिवापूर मार्गे वळवण्यात येईल.
- सासवड ते जेजुरी (जेजुरी, वाल्हे मुक्कामी)- 16 जून दुपारी 2 वाजल्यापासून ते 17 जून दुपारी 12 वाजेपर्यंत पुणे ते सासवड- जेजुरी- वाल्हे- निरा मार्गे प्रवास करणाऱ्यांनी झेंडेवाडीहून जाणारा निरा ते पुणे मार्ग वापरावा.
हेसुद्धा वाचा : ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यात असणाऱ्या अश्वांबाबत ही माहिती तुम्हाला माहिती आहे का?
- वाल्हे ते लोणंद (लोणंद मुक्कामी)- पुणे ते सासवड- जेजुरी- वाल्हे- निरा आणि निरा ते पुणे प्रवास करणाऱ्या वाहनांनी सासवड- जेजुरी- मोरगाव या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
- लोणंदपासून फलटणमार्गे पुढचा प्रवास.... - 16 ते 18 जूनदरम्यान फलटण- लोणंद ते पुणे आणि पुणे ते फलटण- लोणंद मार्गावरील प्रवास शिरवळ येथून वळवण्यात येईल.
तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी वाहतुकीत केलेले बदल
- लोणीकाळभोर ते यवत (यवत मुक्काम)- 15 जूनला रात्र उलटून 2 AM पसून रात्री 12 वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांना वाघोली- पारगाव, चौफुला रस्त्यावर वळवण्यात येईल.
- यवत ते वरवंड (वरवंड मुक्काम)- 16 जून रोजी पहाटे 2 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत पुण्याहून सोलापूरकडे जाणारी वाहनं थेऊर फाटा- मार्गे दौंडच्या दिशेनं वळवली जातील. तर, सोलापूरहून येणारी वाहनं त्याच रस्त्यानं परतीचा प्रवासही करतील.
- वरवंड ते उंडवडी- येथे पालखी उंडवडीला मुक्कामी असून, 17 जून रोजी पुण्याहून सोलापूरला जाणारी वाहतूक चौफुला- पारगांव मार्गे कुरकुंभवरून पुढे जाईल. तर, परतीची वाहतूक कुरकुंभ- दौंड- काष्टी- न्हावरे- पारगांव- चौफुला- वाघोलीवाटे पुण्यात येईल.
- उंडवडी ते बारामती (बारामती मुक्काम)- 18 जूनला पहाटे 2 ते रात्री 12 पर्यंत बारामती ते पाटस आणि दौंड रस्ते बंद असतील. ही वाहतूक भिगवनमार्गे बारामतीला जाईल.
- बारामती ते सणसर- सणसर येथे पालखी मुक्कामी राहणार असून, 19 जून रोजी पहाटे 2 ते रात्री 12 वाजेपर्यंत इंदापुरहून येणारी वाहतूक कळसमार्गे बारामतीत येईल.
पुढे पालखी अंथुर्णे, इंदापूर, सराटी येथे मुक्कामी असतानासुद्धा वाहतुकीत पालखीच्या वेळांना अनुसरून काही बदल करण्यात आले आहेत. पुणे वाहतूक पोलिसांच्या शाखेकडून सदर बदलांनी नागरिकांना वेळोवेळी माहिती देण्यात येईल.