पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याने आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विठूरायला भेटायची आस आणि मुखी  विठ्ठल नामाचा जप करत, विठ्ठल भक्तीत मंत्रमुग्ध झालेले वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघतात. महाराष्ट्रातीलच काय भारतातील अनेकांना वाटतं की एकदा तरी वारी करत पंढरपूरला जावं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चला पंढरीसी जाऊं ।  रखमादेवीवरा पाहूं ॥ डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥  संता महंता होतील भेटी । आनंदे नाचों वाळवंटी ॥ तें तीर्थांचे माहेर । सर्व सुखाचें भांडार ॥


या ओवी प्रमाणे प्रत्येकाचीच वारी अनुभवण्याची  इच्छा असते. स्वाभाविकपणे मला देखील एकदा आषाढी वारीत जायची इच्छा होती. ती संधी झी २४ तासमध्ये काम करताना झी 24 तासचे मुख्य संपादक निलेश खरे सरांनी मला दिली. ऑफिसमध्ये काम करताना आचानक सर म्हणाले पोपट उद्या तुला पंढरपूरला जायचं आहे. वारीसाठी... मी देखील कशाचा विचार न करता हो जातो सर म्हणत तयारी दाखवली. आणि 27 जूनला मंगळवारी पंढरपूरला रवाना झालो.


घरात वारीची परंपरा  


माझ्या घरी आई-वडील माळकरी आहेत.. वडील रामभाऊ पिटेकर यांनी आषाढी वारीला विविध दिंड्यांतून पंढरपूरला पायी वारी केलीय. ते देखील 8 ते 10 वर्षं सतत.. घरात वारकरी पंरपरा असल्यानं वारीचं महत्त्व मला आधीपासूनच माहिती होतं. मी लहान असताना वडिलांनी मला तीन वेळा पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घडवलंय. त्यानंतर अनेक वर्षं कधीच विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात आलं नव्हतं. मात्र झी २४ तासमध्ये काम करताना ही संधी तब्बल 20 ते 22 वर्षांनंतर मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. 


पंढरपुरात दाखल 


27 जूनला आम्ही मुंबईतून पंढरपुरात दाखल झालो. पंढरपुरात दाखल होत असताना अनेक भागांतून दिड्या दाखल होत होत्या. विठ्ठल नामाचा गजर करत सर्व वारकरी भक्तीभावाने पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरपूरच्या दिशेनं पुढे सरकत होते. यात लहान मुलं, वयोवृद्ध, तरुण, दिव्यांगही मोठ्या प्रमाणात होते. या प्रत्येकाच्या मुखी  विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल हाच नामघोष होता. विठू माऊलीचा गजर करत लाडक्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी पुढे सरकत होते. आणि आम्हीही विठू माऊलीचं कव्हेरज करण्यासाठी पुढे सरकत होतो.


वारक-यांची मोठी गर्दी 


पंढरपुरात दाखल झाल्यानंतर पंढरपुरातील असा एकही कोपरा किंवा भाग नसेल जिथे वारकरी नसतील.. पंढरपूरच्या प्रत्येक भागात वारकरी मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. हे वारकरी एक…एक…दोन, दोन महिन्यांपासून पायी पंढरपुरात येत होते. भक्तीभावाने पंढरपुरात दाखल होत असताना त्यांच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता. वारक-यांची मोठी गर्दी असूनही कमालीची शिस्त पाळताना ते दिसत होते. चालताना, बसताना, जेवताना वारकरी रस्ता सोडून रस्त्याखाली रिकाम्या जागेत बसत असल्यानं, रस्त्यावरुन गाडी चालवणा-या वाहनांना कुठलाच त्रास होत नव्हता. वारीत लाखो वारकरी दाखल झाल्यानंतरही कुठलीही वाईट घटना दिसून आली नाही. हे शक्य झालं ते वारक-यांनी पाळलेल्या स्वयंशिस्तीमुळे. 


पंढरपूर आणि स्वच्छता 


लाखो वारकरी दाखल झाल्यानंतरही पंढरपुरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता दिसून आली. एवढ्या मोठ्या संख्येनं वारकरी, व्यापारी, आणि इतर अनेक लोकं आल्यानं स्वच्छतेचा मोठा प्रश्न असेल असं वाटलं होतं. मात्र पंढरपुरात सर्वत्र स्वच्छता दिसत होती. चंद्रभागेत तर स्नान करण्यासाठी लाखो वारकरी दाखल होऊनही कुठेच अस्वच्छता दिसली नाही. कारण सरकारकडून BVG या ग्रुपला स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली होती. ती जबाबदारी BVG ग्रुपनं 600 कर्मचा-यांच्या मदतीने चोख पार पडली. त्यामुळे पंढरपूरमध्ये उत्तमरित्या स्वच्छता दिसून आली. 


महाआरोग्य शिबिराचं आयोजन 


पंढरपुरात दाखल झालेल्या वारक-यांची काळजी घेण्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सांवत यांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं कव्हरेज पहिल्या दिवशी मी केलं. या महाआरोग्य शिबिरात ज्यापद्धतीने वारक-यांची सेवा आणि आरोग्य तपासणी केली जात होती, त्यासाठी खरचं मंत्री तानांजी सावंत यांच्या नियोजनाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण पंढरीत लाखो भाविक, वारकरी दाखल झाल्यानं त्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणे वाटतं तेवढं सोप नक्कीच नव्हतं. विशेष म्हणजे आलेला प्रत्येक वारकरी या महाआरोग्य शिबिरमध्ये येऊन आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेत होता. काही आजार असेल तर तो तिथेच आपली तपासणी करुन घेतानाही मी पाहिलं. हे आरोग्य शिबिर तब्बल एक एकरावर मंडप टाकून उभारण्यात आलं होतं. 


पोलीस प्रशासन 


वारी दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याचं काम असल्यानं साहजिकच पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण होता. पोलीस प्रशासनानंही वारीत चोख बंदोबस्त ठेवत ही वारी यशस्वी करुन दाखवली. वारक-यांची घरातील व्यक्तीसारखी विचारपूस करत पोलीस त्यांना मार्गदर्शन करत होते. एरवी कठोर वाटणारे पोलीस पंढरपुरात वारीततलेच होऊन गेले होते. यामुळे वारक-यांचा प्रवास सुखकर होत होता. संपूर्ण वारीत पोलीस प्रशासनाचं योगदान मोठं असल्यानं पोलीस प्रशासन कौतुकास पात्र आहे. 


रात्रभर कव्हरेज करताना


वारीत कव्हरेज करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. रात्रभर बुलेटिन LIVE असल्याने मला रात्रभर जागरण करुन LIVE द्यायचं होतं. दोन दिवस प्रवास आणि झोप नसल्याने कसं LIVE करता येणार हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. मात्र पंढरपुरातील भक्तीमय वातावरण आणि वारक-यांचा उत्साह यामुळे कुठेही वारीत फिरताना थकवा जाणवला नाही. 24 तास पंढरपुरात फिरतानाही शरिरात एक वेगळीच ऊर्जा होती. त्यामुळे कव्हरेजसाठी पंढरपुरात दिवस रात्र फिरताना अनेक गोष्टी समजून घेता आल्या. 


पांडुरंगाचं दर्शन आणि वारकरी 


आषाढी वारीत लाखो भाविक भक्ती भावाने दाखल झाले होते. लाखो वारकरी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी कित्येक मैल पायी प्रवास करुन पंढरपुरात दाखल झाले होते. एवढा प्रवास करुनही अनेक जण कळसाचं आणि मंदिराचं बाहेरुनच दर्शन घेऊन घरी जात होते. तर असंख्य जण मात्र सुमारे 24 तास रांगेत उभं राहून पांडुरंग चरणी नतमस्तक होत होते. पंढरपुरात विविध ठिकाणांहून तब्बल पाच किलोमीटर लांबपर्यंत विठ्ठल दर्शन घेण्यासाठी रांगांची सोय प्रशासनाने केली होती. ज्यांना रांगेत उभं राहून दर्शन घेणं शक्य नाही ते मंदिराबाहेरून  कळसाचं दर्शन घेऊन आपल्या घराकडे निघत होते. आम्हीही तीन दिवस कव्हरेज केल्यावर आषाढी वारी संपल्यानंतर विठ्ठल, रुक्मिणी मातेचं दर्शन भक्तीभावाने घेतलं. आणि  विठ्ठलाला म्हंटलं की


जातो माघारी पंढरीनाथा
तुझे दर्शन झाले आता || 


तुझ्या नादाने पाहिली मी
ही तुझीच रे पंढरी
धन्य झालो आह्मी जन्माचे
नाम घेऊ तुझे आवडीचे ||


दीपवली तुझी पंढरी
चालू झाली भक्तांची वारी
तुका ह्मणे भक्ती करता तुझी
जाती पापे जन्माची पळोनी ||