अल्फा मराठी ही झी नेटवर्कची प्रादेशिक वाहिनी. त्या वेळची पहिली उपग्रह वाहिनी जी infotainment म्हणजे माहिती व मनोरंजन या दोन्हींच्या गरजा पुरवणारी होती. ही वाहिनी 15 ऑगस्ट 1999 मध्ये सुरु झाली. झी समुहाचे मालक सुभाषचंद्र यांनी प्रादेशिक भाषेत पहिलं न्यूज चॅनेल आणण्याचं धाडस दाखवलं. मुंबईतल्या मरोळ इंडस्ट्रीयल इस्टेटमधल्या एका इमारतीच्या छोट्याशा जागेत अल्फा मराठीची सुरुवात झाली. त्यावेळी देवदास मटाले हे अल्फा मराठीचे संपादक होते. संपादकी विभागात काही मोजकी माणसं आणि रिपोर्टर अशी साधारण त्यावेळी चॅनेलची टीम होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात  सहा जणांचा रिजनल ब्युरो, मुंबईत हिंदी-मराठी असं दोन्ही मिळून काम करणारे पाच रिपोर्टर आणि तीन व्हिडिओ एडिटर एवढाच काय तो अल्फा मराठी बातम्यांचा संसार. त्या वेळी अल्फाचे अँकरही कॉन्ट्रॅक्टवर असायचे. पहिलीच प्रादेशिक वाहिनी असल्यानं अल्फा मराठीवर अनेक वेगवेगळ्या विषयांवरचे कार्यक्रम चालायचे. बातम्यांच्या वेळा ठरलेल्या. सकाळी सात, संध्याकाळी सात आणि रात्री नऊ. सगळ्या ब्युरोच्या टेप यायच्या कुरिअरने. म्हणजे आज संध्याकाळी नागपूरला एखादी घटना घडली तर ती बातमी दुसऱ्या दिवशी नऊच्या बातम्यांमध्ये दिसायची. त्यातल्या त्यात पुणे नाशिकमध्ये घडणाऱ्या घटनाच लवकर दिसायच्या कारण त्यांच्या टेप थेट टॅक्सी स्टॅण्डवर यायच्या. काही टेप एसटीने परळ एसटी डेपोला यायच्या. या सगळ्या टेप त्या वेळी हाय बॅण्डच्या किंवा बीटा म्हणजे वहीच्या आकाराच्या असत.


म्हणजे आतासारखं त्यावेळी तंत्रज्ञान प्रगत झालं नव्हतं.  बातम्या जरी संध्याकाळच्या सातच्या असल्या तरी त्या अर्धा ते पाऊण तास आधी रेकॉर्ड व्हायच्या कारण बातम्यांची टेप त्या वेळी व्हीएसएनएलला (विदेश संचार निगम लिमिटेड, जे आता भारत संचार निगम, बीएसएनएल झालंय) जाऊन अपलिंक व्हायची म्हणजे सिंगापूरला पाठवली जायची. सिंगापूरहून बातम्या ऑनएअर जायच्या. त्यासाठी झी नेटवर्कचा एक माणूस सिंगापूरमध्ये अपॉईंट केला होत. एक रनर ही रेकॉर्डेड टेप लोअर अंधेरीच्या ऑफिसातून चर्चगेटला व्हीएसएनलपर्यंत घेऊन जायचा. दिलेल्या वेळेतच ती टेप अपलिंक करावी लागायची. व्हीएसएनलला पोहोचायला एक सेकंद जरी उशीर झाला तर चॅनेलला एकेका सेकंदला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागायचा.


आजच्या सारखं त्यावेळी व्हिडिओ एडिट करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान नव्हतं. त्यावेळी कट-टू-कट नावाची एक मशीन असायचं. शुटिंगसाठी डिव्ही आणि त्यानंतर मिनी डिव्ही वापरल्या जायच्या. रिपोर्टरने एखादी बातमी शुट करून आणली की व्हिज्युअल्स पाहून त्याची स्क्रिप्ट लिहिली जायची. त्यानंतर स्क्रिप्ट वाचून व्हॉईटओव्हर दिला जायचा आणि नंतर कट-टू-कट मशीनवर त्या स्टोरीचं एडिटिंग केलं जायचं. म्हणजे एक स्टोरी एडिट करायला त्याकाळी जवळपास दोन ते तीन तास सहज जायचे. राष्ट्रीय वाहिनी असल्यानं राष्ट्रीय घडामोडींनाही बातम्यांमध्ये तेवढंच स्थान होतं. हे माध्यमच मुळी ऑडिओव्हिज्युअल - आवाज आणि दृश्यं दोन्हीची अनुभूती देणारं - असल्यानं प्रत्येक दृश्य निवडून बातमी व्हिडिओ एडिटरसोबत बसून एडिट केली जायची.


मुंबईचे रिपोर्टर स्वतःच्या बातमीला पीटूसी करायचे. पीटूसी म्हणजे piece to camera म्हणजे रिपोर्टरने स्वतः कॅमेऱ्यासमोर येऊन प्रेक्षकांशी साधलेला संवाद. याआधी भारतात काही ठरावीक पत्रकारांचे चेहरेच सर्वसामान्यांना ज्ञात होते, पण भारतात खासगी वाहिन्या आल्यानंतर ही परिस्थिती बदलली. रिपोर्टरही आपल्या बातमीनंतर स्वतः कॅमेऱ्यासमोर येऊन टिप्पणी करू लागला. अर्थात हे काही विशेष बातम्यांसाठीच केलं जायचं.


त्यावेळी साहजिकच लाईव्ह बुलेटिन होत नसल्याने अँकर येऊन टेलिप्रॉम्पटरवर सर्व स्क्रिप्ट एकाचवेळी वाचून जायच्या. बहुतांश अँकर या कॉन्ट्रॅक्टरवर असायच्या. म्हणजे प्रत्येक बुलेटिनचे त्यांना पैसे मिळायचे. अँकर वाचून गेल्यानंतर प्रोडक्शन टिम अँकरने वाचलेली स्टोरी आणि एडिट झालेली स्टोरी यांची जुळवाजूळव करुन अर्धा तासाच्या बुलेटिनचं फायनल बुलेटिन तयार करायचे. त्यानंतर ती फायनल झालेली कॅसेट व्हिसीएनलला अपलिंकसाठी जायची. 


टेलिप्रॉम्प्टरचीही एक वेगळीच मजा होती. त्यावेळी आजच्या सारखं ऑटोमॅटिक टेलिप्रॉम्पटर नव्हते. कॉम्प्युटरवर वर्ड फाईलवर मोठ मोठ्या अक्षरात स्क्रिप्ट टाईप केली जायची. त्यानंतर एक सरळ आरसा आणि त्यावर एक उलटा आरसा अशी रचना केलेल्या टेलिप्रॉम्पटरमधून कागद सरकवले जायचे आणि ती आरशात दिसणार अक्षरं अँकरकडून वाचली जायची.


सन 2000 मध्ये मरोळहून अल्फा मराठीचं कार्यालय मुंबईतल्या गिरणगाव असलेल्या नाम जोशी मार्गावर शिफ्ट झालं. मूळची गिरणगावातली न्यू प्रकाश सिनेमाची ती बिल्डिंग. हे सिनेमाचं थिएटर आहे याच्या खाणाखुणा या इमारतीत जागोजागी दिसायच्या. या थिएटरमध्येच थोडेफार बदल करून स्टुडिओ तयार करण्यात आला होता. पहिल्या मजल्यावर झी न्यूजच्या हिंदी ब्युरोचं, दुसऱ्या मजल्यावर पीसीआर, तर चौथ्या मजल्यावर झी मराठीची न्यूजरूम.


2004 मध्ये झी न्यूज लिमिटेड कंपनी झाली आणि अल्फा मराठीचं झी मराठी असं नामकरण झालं. त्यानंतर बुलेटिनच्या संख्येतही वाढ झाली. अर्धा तासांच्या तीन बुलेटिनसह प्रत्येक तासाला पाच-पाच मिनिटांचं छोटं बुलेटिन सुरु करण्यात आलं. तोपर्यंत तंत्रज्ञानही बरंच प्रगत झालं होतं. कट-टू-कट मशीनची जागा नॉन लिनिअर मशीनने घेतली. राज्यातील मेट्रो शहरांमध्ये 2 एमबी लाईन टाकण्यात आल्या. म्हणजे ज्या कॅसेट टॅक्सीने किंवा एसटीने येत होत्या. त्याऐवजी आता व्हिज्युअल्स 2 एबी लाईनच्या माधम्यातून थेट येऊ लागली. outside broadcast van ने क्रांती घडवली. या व्हॅनच्या माध्यमातून त्या ठिकाणची दृष्य टिव्हीवर लाईव्ह दिसू लागली. बिटा, मिनी डिव्हीची जागा मायक्रो चिपने घेतली.


झी मराठीवर 'जागर' हा त्यावेळी कार्यक्रम प्रचंड गाजला. लोकांच्या प्रश्नांशी संबंधित विषयांवर आठवडाभर दररोज बातमी दाखवून आठवड्याच्या शेवटी म्हणजे रविवारी त्या विभागाशी संबंधित मंत्र्याला स्टुडिओमध्ये बोलावून त्या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जायचा. शहर किंवा ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, आरोग्य व्यवस्था अशा प्रश्नांवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाश टाकला जायचा.


या दरम्यान अनेक हिंदी वृत्तवाहिन्या चोवीस तास सुरु झाल्या होत्या. पण 24 वृत्त देणारी एकही प्रादेशिक वाहिनी नव्हती. 2007 मध्ये आणखी एक धा़डसी निर्णय घेण्यात आला. झी मराठी ही 24 तास बातम्या देणारी पहिली मराठी वाहिनी बनली.  झी 24 तास असं या वाहिनीला नाव देण्यात आलं. अर्थात चोवीस तास न्यूज असल्याने चॅनेलचा पसाराही वाढला, आऊटपूट, इनपूट, प्रोडक्शन, रिपोर्टर्स, व्हिडिओ एडिटर्स, कॅमेरामन, ग्राफिक्स असे अनेक विभाग झाले. माणसं वाढली. नवनवीन तंत्रज्ञान आलं. आज गेली 17 वर्ष झी 24 तास ही वाहिनी राज्यातील तसंच देशातील प्रेक्षकांपर्यंत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या पोहोचवतंय. म्हणूनच प्रेक्षकांची झी 24 तासला पहिली पसंती मिळतेय. 


काळाची पावलं ओळखून झी 24 तास बातम्यांची वेबसाईट आणि युट्यूब चॅनेलही सुरु झालं. याचे युजर्सही लाखोंच्या घरात आहेत. झी 24 तास वेबसाईटच्या माध्यमातून टेक्स्ट कंटेन्टमधली बातमी सविस्तर वाचकांपर्यंत पोहोचवली जाते. तर युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांना लाईव्ह बातमी पाहिला मिळते.