कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड : वर्षभराहून अधिक काळ पिंपरी चिंचवडचे सम्राट म्हणून वावरणारे राजे लक्ष्मण अर्थात शंकर चंद्ररंग महलात आपल्या जुन्या आणि निष्ठावान मावळ्याना घेऊन बसले होते...! किती तरी दिवसांनी त्यांनी त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांना बोलावले होते....गेल्या वर्षभरात या सहकाऱ्यांना या शंकराकडे जाणे ही अवघड होते...पण आज मात्र चक्र उलटे फिरले होते....खुद्द शंकरानेच या जुन्या मावळ्यांना बोलावले होते.... शंकर काहीसा चिंताग्रस्त असला तरी कसलंस समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते....! सम्राट शंकर काही बोलत नसले तरी मावळ्यांमध्ये थोडीशी चर्चा सुरु झाली...! तेवढ्यात एका मावळ्याने दुसऱ्याला विचारले अरे सर्वशक्तिमान, महाचाणक्य, महायोद्धा, नंदी कुठे दिसत नाही....! मावळ्यांची ही चुळबुळ शंकरापर्यंत पोहचली आणि शंकराने सांगितलं... नंदी, कोण नंदी...? कसला नंदी....? आणि कुणाचा नंदी....? मावळ्यांनी शंकराच्या तोंडून हे वाक्य ऐकले आणि एकच जल्लोष केला....! गेली वर्ष भर आपल्यात आणि शंकरामध्ये दुरावा करणाऱ्या नंदीला अखेर बाजूला केले हे ऐकून मावळ्यांना आकाश ठेंगणे झाले...!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शंकराने नंदीला बाजूला केल्याचं वृत्त नगरीत वाऱ्यासारखे पसरले....! तिकडे महापालिका मुख्यालयात सर्वांनी आनंदाने पेढे वाटले.... तिसऱ्या मजल्याने तर अक्षरशः मोकळा श्वास घेतला. कायम दहशतीत असणारे मुख्यालयातल्या सेवकांना तर चेहऱ्यावरचा आनंद ही लपवणं अवघड होऊ लागलं....! सवाई अर्थमंत्री असताना अगदी काही दिवसांपूर्वी या सर्वशक्तिमान नंदीचा मुख्यालयातला काय तो वावर. माझा शब्द म्हणजे प्रमाण असा नंदीचा बाणा....! शंकरापेक्षा मुख्यालयात नंदीचा अधिकार ! मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यापासून अगदी चौथ्या मजल्यापर्यंतच्या कोणत्याही दालनात या नंदीचा मुक्त संचार....! पण माशी शिंकली आणि सम्राट लक्ष्मण अर्थात शंकराने तिसरा डोळा उघडला आणि नंदीच्या अस्तित्वालाच धक्का दिला ! सवाई अर्थमंत्री असताना घेतलेल्या निर्णयाचा हळू हळू "कचरा" झाला हे ही नंदीला समजू लागले !  


ज्या मुख्यालयात राजा सारखं वागलो, तिथं आता कुठल्या तोंडाने जायचे या प्रश्नाने नंदी हवाल दिलं झाला. शंकराने फाटकारल्याचे वृत्त सगळ्यांना समजलंय आणि आता आपल्याला मुख्यालयातले सेवक आधी सारखे घाबरतील का. तो थाट करता येईल का. या विचारांच्या काहुराने नंदी अधिकच उदास झाला....! गेल्या वर्षभरात सगळे मावळे अवती भोवती फिरत होते आता पुन्हा एकाच "सीमे"वर आपली "आशा" आहे हा विचार ही नंदीला स्वस्थ बसू देईना....या अस्वथतेत कोई लौटा दे मेरे बीते हुये दिन या किशोरच्या गाण्यांच्या ओळी आठवत नंदी गायब झाला. ! पालिका मुख्यालयात किती तरी दिवस झाले नंदीचे दर्शन होत नसल्याने नंदी गायब झालाय अशी चर्चा मुख्यालयात रंगू लागली.!


तिकडे नगरीतली जुनी मंडळी चावडीवर गप्पा मारत बसली होती.... त्यात एकाने विचारले नियती चा खेळ म्हणजे काय...दुसऱ्याने सांगितले नंदी....! दुसरा बोलू लागला.... सत्ता आज आहे तर उद्या नाही....! सत्ता आहे म्हणून किती त्या उड्या मारायच्या....दुसऱ्यांना कमी लेखायचे....कुणी चुका दाखवल्याचं की त्याला खंडणीखोर म्हणायचे... कुणाला भंपक म्हणून हिणवायचे...सर्व करून सवरून हरीशचंद्राचा आव आणायचा....पण नियती पाहते बाप्पाहो.......म्हणून उतू नका मातू नका.... असं त्या जाणत्या जुन्या मंडळीने सांगितले.....चावडीवर गप्पांचा एक फड रंगला असताना पिंपरी चिंचवड नगरीच्या राजकारणाचे आणखी एक वर्तुळ पूर्ण झाले....!


(ता.क. - हा एक काल्पनिक पण तरी ही शहरातल्या जनतेला, राजकारण्यांना बऱ्यापैकी कळणारा सोहळा आहे. हा वाचल्यावर काही जण अशांत होणार हे उघड आहे....त्या नंतर हा खंडणीखोर अशा बतावण्या करून वैयक्तिक चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न होणार, हे ही उघड आहे...पण तरी ही न घाबरता जे घडतंय, ते तुमच्या समोर मांडणे हेच आमचे काम....! )