कशाला जन्म घेतला होता हो महाराष्ट्रात?
पु.ल. जर आज आपल्यात असते तर...?
अविनाश चंदने, मुंबई : दासबोधाची इतकी पारायणं करून अव्यवहारी राहिलेले ‘हरी तात्या’ असोत की धोंडो भिकाजी जोशी हा वेव्हार न कळणारा 'असामी', परंतु वास्तव हेच होतं, की खुद्द पुलंना आयुष्यात व्यवहार जमलाच नाही. या पार्श्वभूमीवर पु.ल. जर आज आपल्यात असते तर...?
एकविसावे शतक उजाडायला अवघे साडेसहा महिने शिल्लक असतानाच पु. ल. देशपांडे यांनी १२ जून २००० रोजी विसाव्या शतकाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली, परंतु त्यांचा करिश्माच असा आहे, की ते शरीरानं आपल्यातून गेले असले तरी साहित्य, रंगभूमी आणि दातृत्वानं आजही सर्वांशी जोडले गेलेले आहेत. तरीही हुरहूर आहेच, आज पुल आपल्यात हवे होते याची... परंतु आजच्या या व्यवहारी जगात पुलंचा खरोखरच निभाव लागला असता का, असा प्रश्न उपस्थित होतो आणि वाटतं...
एक बरं झालं पु.ल. तुम्ही विसाव्या शतकातच गेलात ते, कारण आजच्या समाजसेवकांच्या गर्दीत तुम्ही साफ हरवून गेला असता. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना हजारो रुपयांच्या वह्या-पुस्तकं देण्याच्या दानशुरांच्या कार्यक्रमावर लाखो रुपये खर्च करणारे दानशूर तुम्हाला पाहावे लागले असते. स्वत:चा उदोउदो केल्याशिवाय इथे पानदेखील हलत नाही. तुम्हाला हे जमलं नसतं पु.ल., कारण तुम्ही समाजाला भरभरून हसवतानाच स्वत:चा खिसादेखील याच समाजासाठी रिता केलात. एवढंच नाही, तर काही संस्थांची भविष्यात आर्थिक व्यवस्था लावण्याची तजवीजदेखील केलीत. त्यामुळे हे कथित दातृत्वाचं असलं कर्तृत्व दाखवणं तुम्हाला जमलं नसतं पु.ल.!
पु.ल. बरं झालं तुम्ही एकविसाव्या शतकातील उगवता सूर्य पाहायला थांबला नाहीत ते, कारण आम्ही भाषिकवादानं वाजवलेला शंख तुमच्या कानांना मुळीच सहन झाला नसता. तुम्ही ४८ वर्षांपूर्वी म्हणजे १९७० साली बंगाली भाषा शिकण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये गेला होतात. तेव्हा तुम्ही वयाची पन्नाशी ओलांडली होती. तिथं तुम्ही गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनमध्ये मुक्काम केलात आणि बंगाली भाषा उत्तम अवगत केलीत. आज प्रांतिक अस्मितेनं डोकं इतकं वर काढलंय की आमचं इतर भाषांवरील प्रेम किती बेगडी आहे, हे तुम्हाला पाहावलं नसतं पु.ल.!
बरं झालं पु.ल. तुम्ही आज आमच्यात नाहीत ते, कारण तुमच्या काळात माणसं जेवढी दांभिक होती त्यातून कितीतरी दांभिक माणसं या एकविसाव्या शतकात आहेत. ‘सबकुछ’ तुम्ही असलेल्या ‘गुळाचा गणपती’ हा चित्रपट पुण्यात प्रदर्शित झाला तेव्हा तुम्हाला आमंत्रणपत्रिकादेखील नव्हती. हे कटूसत्य आज कदाचित लोकांच्या पचनी पडणार नाही, पण एक सांगू पु.ल., हा चित्रपट आजच्या शतकात काढला असता, तर कदाचित तुमचं नाव श्रेयनामावलीतूनदेखील वजा केलं असतं. एवढंच कशाला उलट ‘गुळाचा गणपती’ची कथा तुम्हीच चोरल्याचा आरोप करून तुमच्यावर कोर्टात दावादेखील ठोकायलादेखील कमी केलं नसतं.
पु.ल. तुम्ही आज आमच्यात नाही तेच बरं आहे, कारण नव्या शतकात तुमच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ आऊटडेडेट झाल्या असत्या आणि या पुस्तकाचे सिक्वेल काढण्याचे प्रसंग तुमच्यावर आले असते. ‘अपूर्वाई’च्या सिक्वेलसाठी खऱ्या भटकंतीऐवजी इंटरनेटसर्फिंग करण्याची वेळ तुमच्यावर आली असती. जे तुम्हाला कधी जमलं नसतं पु.लं.!
बरं झालं तुम्ही लवकर एक्झिट घेतलीत ते, कारण आजच्या युगात कुठल्याही राजकीय पक्षाच्या लेबलशिवाय तुम्हाला जगणं अशक्य झालं असतं. १९४२चा लढा असो किंवा १९७७मधील आणीबाणी! तुम्ही डोळ्यांसमोर एक ध्येय ठेवून राजकारणात सक्रिय झाला होता. कार्य संपल्यानंतर तुम्ही राजकारणापासून अलिप्त होऊन पुन्हा लेखनाकडे मोर्चा वळवला होता. आज ते तुम्हाला शक्य झालं नसतं. हे म्हणजे महाराष्ट्रात नुसते मराठी असून जमत नाही तर मुंबईकर, पुणेकर किंवा नागपूरकर असावं लागतं, तसंच महाराष्ट्रात कुठल्यातरी राजकीय पक्षाची पालखी उचलल्याशिवाय जगणं आज कठीण झालं असतं पु.ल. तुम्हाला!
आणखी एक बरं झालं पु.ल. तुम्ही चॅनेलची भाऊगर्दी होण्यापूर्वी निघून गेलात ते! वास्तविक, देशात दूरदर्शन सुरू झाल्यानंतर पहिला कार्यक्रम सादर करण्याचा मान तुम्हाला मिळाला होता. परंतु आजच्या शेकडो चॅनेलच्या गर्दीत तुम्हीच हरवून गेला असता. कदाचित दूरदर्शनवर पहिला कार्यक्रम सादर करणारा ‘मी पहिला आहे’ हे तुम्हाला भर पत्रकारपरिषदेत सांगण्याची वेळ आली असती.
कसंही असलं तरी पुन्हा पुन्हा एकच वाटतं पु.ल. तुम्ही आज हवे होतात! तुमच्या जाण्यानं आम्ही खूप काही गमावलंय हो! मनाला चटका लावल्यावर बेळगाव सोडताना रावसाहेबांनी तुम्हाला “कशाला आला होता हो बेळगावात?” असा प्रश्न विचारला होता. आज प्रत्येक मराठी माणूस हाच प्रश्न तुम्हाला विचारतो आहे, “जायचंच होतं तर कशाला जन्म घेतला होता हो महाराष्ट्रात?”