अमित इंगोले, झी मीडिया, मुंबई : साऊथमध्ये सुपरहिट ठरलेल्या मराठी सिनेमांचा मराठीत रिमेक करताना अजूनही निर्माते, दिग्दर्शक पूर्णपणे मराठी प्रेक्षकांच्या मानसिकतेचा विचार करताना अजिबात दिसत नाहीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधीही काही साऊथ सिनेमांचे रिमेक मराठीत आलेत आणि गेलेत. त्यातील काही बरे होते. आता ‘भिकारी’ हा सुद्धा साऊथमध्ये सुपरहिट ठरलेल्या ‘रोडसाईड रावडी’ या सिनेमाचा रिमेक आहे. या सिनेमातूनही तिच चूक बघायला मिळाली जी इतर साऊथच्या मराठी रिमेक सिनेमांमध्ये होती. केवळ लोकप्रिय चेहरा घेऊन आणि धमाकेदार प्रमोशन करून सिनेमातून मनोरंजन होत नाही, तर त्यासाठी कन्टेन्ट चांगला असणं तितकंच गरजेचं आहे. याकडेही दिग्दर्शक-निर्मात्यांनी लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. 


बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कोरिओग्राफर म्हणून काम करत असलेले प्रसिद्ध गणेश आचार्य यांनी  दिग्दर्शन केलंय. त्यामुळे अर्थातच दिग्दर्शनात असलेला नवखेपणा दिसणारच होता तो दिसला. त्यासोबतच ते कोरिओग्राफर असल्याने डान्सचा भडीमार असणार हेही अपेक्षित होतंच. तसेच हा सिनेमा हिंदी सिनेमासारखा दिसणार हेही होतंच. त्यानुसार सिनेमा चांगला चकाचक दिसला आहे. मात्र या सिनेमाच्या बेसिक कथेत आणि पटकथेतच गोंधळ झाल्याचे दिसते. त्यामुळे इतकं सगळं काही असूनही सिनेमा पैसा वसूल मनोरंजन करण्यात अपयशी ठरतो. 


कथा : 


ही कथा आहे सम्राटची(स्वप्नील जोशी) आणि त्याच्या आईची. सम्राट हा लंडनहून शिक्षण घेऊन भारतात आलाय. आता त्याला त्याच्या आईने मोठ्या मेहनतीने उभी केलेली मील चालवायची आहे. अचानक त्याच्या आईचा अपघात होतो आणि ती कोमात जाते. आपल्या आईला वाचवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतो. मात्र आई बरी होत नाही. अशात त्याला एक बाबा भेटतात आणि त्याला स्वत:चा शोध घेण्यासाठी भिकारी होण्यास सांगतात. त्याने त्याची आईही बरी होणार असे बाबा सांगतो. मग सम्राट सगळं सोडून भिकारी होतो. आता त्यानंतर काय होतं? त्याची आई बरी होते का ? तो स्वत:चा शोध घेतो का? भिकारी कसा होतो? हे सगळं या कथेत रंगवण्यात आलं आहे. 


पडलेले प्रश्न...


मुळात या कथेतच गोंधळ झाल्याचे दिसते. एकतर तो कुठला कोण बाबा सम्राटला भिकारी व्हायला सांगतो आणि तो लगेच तयार होतो. याचं लॉजिकच कळलं नाही. बरं आईच्या प्रेमापोटी मुलाने हे केलं असं मानलं तरी तो बाबा जेव्हा सम्राटला भिकारी व्हायला सांगतो, तेव्हा स्वत:चा शोध घेण्यासाठी तुला भिकारी व्हावं लागेल, असं बाबा सांगतो. बरं भिकारी झाल्यावर त्याची आई पूर्णपणे पडद्यावरून गायब होते. विषय भलतीकडे खेचला जातो. सम्राट प्रेमात काय पडतो, फायटिंग काय करतो. त्यात सम्राट भिकारी बनतो, तेव्हा एक भिका-यांचा एक ग्रुप जॉईन करतो. या ग्रुपमधील लोकांना साधा प्रश्नही पडत नाही की हा कोण? कुठून आला? वगैरे वगैरे...असो...


कसे आहे गणेश आचार्य यांचे दिग्दर्शन... 


तर गणेश आचार्य यांचा पहिलाच सिनेमा म्हणून प्रयत्न चांगला केला असे म्हणता येईल, पण ते पूर्णपणे यशस्वी ठरले नाहीत. साऊथ सिनेमा मराठीत करताना तो साऊथचा टच जर बाजूला ठेवता आला असता तर ठिक झाले असते. एक मसालेदार, एन्टरटेनिंग सिनेमा करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तो अपयशी ठरला असेच म्हणावे लागेल. कारण सुरूवातीपासूनच सिनेमा रटाळ वाटायला लागतो. अनेक सीन्समध्ये कुणीही कसंही येतं, कुणालाच काहीच प्रश्न पड्त नाहीत. पण सिनेमा बघताना आपल्याला मात्र प्रश्नच प्रश्न पडतात. त्याशिवाय यातील गुंडे तर फारच ८० च्या दशकातील सिनेमातील वाटतात. अनेक कॉमेडी सीन्स फुसक्या बार सारखे झाले आहेत. त्यावर हसू येणं कठीणच. 


कसा झाला अभिनय ..


स्वप्नील जोशी, ऋचा इनामदार, सयाजी शिंदे, गुरू ठाकूर यांनी कामेही चांगली केली आहेत. खासकरून स्वप्नील आधीच्या भूमिकांपेक्षा वेगळ्या भूमिकेत बघायला मिळतो. आता पटकथा आणि कथेतच जरा गडबड झाल्याने तो तरी काय करणार. 


एकंदर काय... 


या सिनेमातील गाणी चांगली झालीये. कारण त्यात डान्स परफॉर्मन्स बरा झाला आहेत. महेश लिमये यांनी केलेली सिनेमॅटोग्राफी सिनेमा सुंदर बनवते. बॅकग्राऊंड म्युझिक ठिकठाक झालंय. एडिटींगही ठिक आहे. एकंदर काय तर हा तुम्ही स्वप्नील जोशीचे फॅन असाल तरी तुम्ही बघालच. पण एक चांगला सिनेमा तुम्हाला बघायला मिळेल अशी अपेक्षा ठेवून जात असाल तर जरा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सिनेमा बघावा की नाही हे तुमचं तुम्ही ठरवाच. 


रेटींग : २ स्टार