दीपक भातुसे, प्रतिनिधी, मुंबई : मातोश्री, हॉटेल सोफीटल आणि आणि हॉटेल ब्लू सी या तीन ठिकाणी युतीसाठी जोरदार हालचाली सुरू होत्या. भाजपाचे अध्यक्ष अमित शाह मुंबईत दाखल झाल्यानंतर पहिले पोहचले ते हॉटेल सोफीटल इथे. भाजपाचे राज्यातील आणि केंद्रातील काही नेते तिथे हजर होते. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर अमित शहांचा ताफा संध्याकाळी उशीरा मातोश्रीवर दाखल झाला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल होते. तर मातोश्रीवर अमित शाह यांचे स्वागत करण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते संजय राऊत, मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, खासदार गजाजन कीर्तिकर, चंद्रकात खैरे उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


संजय राऊत अमित शहांच्या शेजारी



अमित शाह मातोश्रीवर येण्यापूर्वीच युतीची चर्चा पूर्ण झाली होती. ही चर्चा अंतिम झाल्यानेच अमित शहा मातोश्रीवर दाखल झाले. शिवसेनेचा स्वाभिमान जपणे हे त्यामागचे कारण होते. अमित शहा यांच्यासह भाजपाचे नेते मातोश्रीवर दाखल झाल्यानंतर तिथे औपचारिक चर्चा सुरू झाली. सातत्याने सामनामधून भाजपा, नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणारे संजय राऊत यावेळी चक्क अमित शाहंच्या शेजारी एका सोफ्यावर बसले होते.


शिवसेना-भाजपा नेते रंगले हास्यविनोदात


इकडे मातोश्रीवर ही चर्चा सुरू असताना हॉटेल ब्लू सी इथे दोन्ही पक्षांचे काही मंत्री, खासदार, आमदार आणि काही प्रवक्ते हजर होते. आतापर्यंत भांडणारे दोन्ही पक्षांचे हे नेते हास्यविनोद करत एकमेकांशी गप्पा मारत होते, जणू आपण कधी भांडलोच नव्हतो. विशेष म्हणजे युतीची अधिकृत घोषणा होण्याआधीचे हे दृश्य होते.


मातोश्रीवरील चर्चा संपवून दोन्ही पक्षांचे नेते युतीची घोषणा करण्यासाठी वरळी येथील हॉटेल ब्लू सी येथे पोहचले. मातोश्रीतून बाहेर पडताना अमित शाह, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे एकाच गाडीत बसले होते. गाडीच्या मागील सीटवर उद्धव ठाकरे हे अमित शहा आणि आदित्य यांच्यामध्ये बसले होते. हा सगळा ताफा मग वरळीला ब्लू सी हॉटेलवर पोहचला.


या ठिकाणी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी पत्रकार परिषदेतील घोषणेची वाट पाहत होते. पत्रकार परिषदेच्या व्यासपीठावर अमित शहा, देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे भाजपाचे नेते, तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी उपस्थित होते. व्यासपीठाच्या समोर उजव्या बाजूला खुर्च्यांच्या तीन रांगा होत्या, त्यावर भाजपाचे शिवसेनेचे मंत्री आणि नेते बसले होते.


पहिल्या रांगेत बसलेले किरीट सोमय्या गायब


पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी व्यासपीठासमोरील पहिल्या रांगेत भाजपाचे खासदर किरीट सोमय्याही बसले होते. मात्र उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांचे तिथे आगमन होण्यापूर्वी किरीट सोमय्या यांना आत बोलवण्यात आले. त्यानंतर किरीट सोमय्या तिथे दिसलेच नाहीत. सोमय्या यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावरून थेट मातोश्रीवर टीका केली होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते आणि सामान्य शिवसैनिकांमध्येही प्रचंड राग आहे. सोमय्या युतीची घोषणा होणा-या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या नजरेसमोर नको म्हणून त्यांना तिथून जायला सांगितल्याची चर्चा आहे. ईशान्य मुंबईतून सोमय्या यांना उमेदवारी देऊ नये, अशीही शिवसेनेची मागणी होती. तिथे सोमय्यांना उमेदवारी दिली तर शिवसेना त्यांचे काम करणार नाही, अशीही भूमिका शिवसेनेने घेतल्याचे समजते. त्यामुळे ईशान्य मुंबईतून यावेळी भाजपा दुसरा उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे.


संजय राऊत यांनी काढला पळ


शिवसेना खासदार आणि सामना दैनिकाचे कार्यकारी संपादक संजय राऊत मातोश्रीवरील चर्चेला हजर होते. पुढे ते उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्या ताफ्याबरोबर वरळीच्या हॉटेल ब्लू सी इथेही आले. पत्रकार परिषदेच्या व्यासपीठासमोर उजव्या बाजूला पहिल्य रांगेत ते बसले होते. मात्र पत्रकार परिषद संपण्याच्या काही मिनिटं आधी राऊत यांनी इथून अक्षरशः पळ काढला. सामनामधून जवळपास रोजच भाजपा नेत्यांच्या विरोधात लिखाण करणारे संजय राऊत या ठिकाणी पूर्ण वेळ का थांबले नाहीत?, याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे. पत्रकार परिषद संपल्यानंतर पत्रकारांनी राऊत यांना घेरून प्रश्नांची सरबत्ती केली असती, त्यामुळे त्यांनी पळ काढला असावा, अशी चर्चा पत्रकारांमध्ये रंगली होती.


पत्रकार परिषदेवर भाजपाचे वर्चस्व


हॉटेल ब्लू सी येथील पत्रकार परिषदेचे सर्व नियोजन युवा सेनेने केले होते. खरं तर आधी पत्रकार परिषद बीकेसी येथील एमसीए क्लबवर होणा होती. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार त्याचे नियोजन करत होते. मात्र शिवसेनेने हट्टाने ब्लू सी हॉटेलला पत्रकार परिषद घेण्याची मागणी केली. तिथली सगळी व्यवस्था युवा सेनेतर्फे करण्यात आली होती. संपूर्ण भाग भगवामय होता. अगदी पत्रकारांच्या बसण्यासाठी असलेल्या खुर्च्यांनाही भगवे कापड बांधण्यात आले होते.


या पत्रकार परिषदेची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत सविस्तर निवेदन करून केली. यात कोणत्या मुद्यांवर युती झाली?, लोकसभा-विधानसभेचं जागा वाटप कसं असेल?, सत्ता आल्यास जबाबदारीचे वाटप कसे असेल? याचे सविस्तर निवेदन आधी मराठी आणि मग हिंदी भाषेत मुख्यमंत्र्यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी सर्वच बाबी विस्ताराने सांगितल्याने उद्धव ठाकरेंना बोलायला काही शिल्लक नव्हतेच. त्यामुळे काही बाबींचा पुनरुच्चार करून उद्धव ठाकरेंनी थोडक्यात युती का केली?, याची माहिती दिली. त्यानंतर पुन्हा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सविस्तर बोलले. त्यामुळे या पत्रकार परिषदेत भाजपाचे वर्चस्व दिसून आले.


पत्रकारांच्या प्रश्नांना बगल



पत्रकार परिषदेत सर्व नेत्यांची निवेदने पार पडल्यानंतर, हे नेते थेट उठले. पत्रकारांनी प्रश्न विचारले मात्र त्यांना उत्तर न देताच पत्रकार परिषद गुंडाळण्यात आली. युतीबाबत अडचणीचे प्रश्न आले असते याचा अंदाज असल्याने प्रश्न न घेताच पत्रकार परिषद आटोपण्यात आली.


फोटोग्राफरांच्या आग्रहासाठी मिठी



पत्रकार परिषदेसाठी सर्व नेत्यांचे आगमन झाले, तेव्हा हे नेते व्यासपीठावर नुसते उभे होते. फोटोग्राफरनी आग्रह केल्यानंतर त्यांनी विजयाची खूण करत फोटोसाठी पोझ दिली. तर पत्रकार परिषद संपल्यानंतर हे सर्व नेते जायल निघाले, मात्र वृत्तपत्राचे फोटोग्राफर आणि वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरामन्सना अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो हवा होता. मग काय बळेबळेच या नेत्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि चर्चा सुरू झाली शिवसेना भाजपाच्या मिठीत की मुठीत?