ब्लॉग : अशी होती आमची `रणथंबोर` अभयारण्यातली सफारी
शेवटी जंगलचा राजाच तो, त्याला नजरेत कितीही साठवलं तरी पुन्हा पुन्हा त्याला पाहण्याची आस काही संपत नाही, हे मात्र खरंय
अनघा सावंत, लालबाग, मुंबई
पेपरमध्ये 'हिरवाई' पर्यटन संस्थेची 'रणथंबोर' अभयारण्यात पर्यटनाला येण्याची जाहिरात वाचली आणि पटकन कोणताही निर्णय न घेणारी मी एका क्षणाचाही विचार न करता या सफारीला जाण्याचा निर्णय घेतला. याअगोदर मी नेहेमीच माझ्या बहिणी आणि आई-पप्पा अशा कौटुंबिक ट्रिपलाच गेले होते... यावेळी मात्र आमच्यासोबत इतरही काही कुटुंब होती, पण ती पूर्णपणे अनोळखी... असं चटकन जाण्याचं ठरवण्याच्या मागे वाईल्ड लाईफचं आकर्षण होतं. कारण जिम कॉर्बेटची टूर केल्यापासून ते निर्माण झालं होतं. तोपर्यंत फक्त डिस्कव्हरी किंवा नॅशनल जिओग्राफिक चॅनलवरच काय ते वाईल्ड लाईफ पाहिलं होतं. नाही म्हणायला आमच्या लालबागच्या शेजारच्या भायखळ्याच्या राणीच्या बागेत जंगली जनावरांचे रिकामे पिंजरे, त्यात प्राणी आहेत अशी कल्पना करुन पाहिले होते. पण टीव्ही चॅनल काय आणि राणीचा बाग काय, जे पाहिलं ते आभासीच होतं. आता मात्र खरेखुरे प्राणी खऱ्याखुऱ्या जंगलात पाहायची संधी मिळत होती. मी जो काय या सहलीला जाण्याचा चटकन निर्णय घेतला, त्यामागे हीच प्रेरणा होती!
एकदा निर्णय घेतला आणि मग मात्र पटापट कामाला लागले. 'हिरवाई'शी संपर्क साधून रणथंबोर ट्रिपमधला आमचा सहभाग पक्का केला. सर्व पेपरवर्क केलं. टूरमध्ये काय करायचं आणि काय नाही, याची माहिती घेतली. ही काही माणसांच्या जंगलातली टूर नव्हती की जिथे नियम पाळले नाही तरी 'चलता है'... इथं चक्क जंगलच्या राजाच्या राज्यात जायचं होतं. त्याचे नियम काय आणि ते कसे पाळायचे, याची माहिती घेणं गरजेचं आहे. कारण या राज्यात शुल्लक नियम तोडण्याची शिक्षाही भयंकर असू शकत होती. त्यामुळे या नियमांची माहिती घेणं आणि त्यांची उजळणी गरजेची होती.
जंगलच्या नियमांबरोबरच, या सहलीत आमच्यासोबत असणाऱ्या सहप्रवाशांचीही माहिती घेतली. एकूण ४० जणं होतो आम्ही आणि आम्ही चौघं सोडून उर्वरीत ३६ जण आम्हाला पूर्णपणे अपरिचित. कोण कसं असेल, आपलं एकमेकांशी जमेल की नाही, ही एक सहजसुलभ शंका आणि नवीन मित्र-मैत्रिणी मिळण्याची उत्सुकता सोबत घेऊन आम्ही जंगल सफारीला निघालो.
उत्सुकता शिगेला
निघण्याचा दिवस उजाडला. ३१ मे ला मुंबई सेन्ट्रलला संध्याकाळी ६.५० च्या 'जयपूर एक्सप्रेस'मध्ये आम्ही स्थानापन्न झालो. गाडी वेळेवर सुटली. अर्ध्या तासाने हिरवाई संस्थेचे सर्वेसर्वा श्री. सौरभ येऊन भेटून गेले. या बोगीत आपलीच माणसं आहेत, असं त्यांनी सांगितल्यावर मी डब्यात उत्सुकतेने एक फेरी मारली. सहपर्यटकांच्या यादीतली मी वाचलेली नावं आणि डब्यात दिसणारे चेहेरे यावरून कोणाचं नाव काय असेल? याचा मनातल्या मनात खेळ करून झाला. तेही बहुतेक तसंच करत असावेत कारण त्यांच्याही नजरेत माझ्यासारखीच उत्सुकता दिसत होती. काही वेळानंतर अनोळखीपणा गळून पडला आणि आपण सारे एकाच समूहाचे भाग आहेत, याची जाणीव होऊन ओळख घट्ट होऊ लागली.
दुसऱ्या दिवशी सवाई माधोपुरला उतरल्यावर स्टेशनबाहेर आलो. आम्हाला घ्यायला दोन बस आलेल्या होत्या. डोक्यावर ऊन चांगलंच रणरणत होतं. चांगलेच भाजून निघत होतो. पण नशिब, स्टेशन ते हॉटेलचं अंतर फक्त १५-२० मिनिटांचचं होतं. हॉटेल 'टायगर मून' खूप छान होतं. थंडगार सरबत देऊन आमचे स्वागत केलं आणि प्रत्येकाला रूम्सच्या चाव्या दिल्या आणि सर्वांना थोडा आराम करुन आवराआवरी करायला सांगितली कारण लगेच जंगल सफारीला निघायचं होतं.
दुपारी ३ वाजताच पहिली सफारी होती. आम्हा ४० जणांना २०-२० च्या दोन गटांत विभागलं गेलं आणि दोन स्वतंत्र वाहनातून जंगलात रवाना केलं गेलं. पहिल्याच दिवशी दुपारच्या या पहिल्याच सफारीत आम्हाला उत्सुकता होती, ती वाघ दिसेल का याची... जंगलात वाघोबाला शोधणाऱ्या आमच्या नजरेला या राज्यातले मोर, लांडोर, हरणं, भेकरं, विविध पक्षी हे इतर प्रजानन मात्र मुबलक नजरेस पडत होते. अर्थात सिमेंटच्या जंगलात राहाणाऱ्या आणि कुत्रा-मांजर-गाय आणि कावळा यांव्यतिरिक्त इतर प्राणी-पक्षी न पाहिलेल्या आम्हाला त्याचंही अप्रुप वाटलंच... ही सफर छान झाली, मात्र व्याघ्रदर्शन न झाल्याने आमचा थोडासा हिरमोड झाला होता हे मात्र खरं.
...आणि तो क्षण आलाच!
दुसरा दिवशीची आमची सफर मात्र खास झाली. जंगलात थोडंसं फिरल्यावर, एका सुंदर तळ्याकाठी वाट बघत थोडा वेळ थांबलो. सकाळची वेळ असल्याने खूप प्रसन्न वाटत होतं. बराच वेळ वाट पाहून 'दुर्गेचं वाहन' काही नजरेस पडत नाही म्हटल्यावर आम्ही आमच्या वाहनात बसून परत मागे फिरायचा निर्णय घेतला. हिरमुसले होऊन थोड्याच अंतरावर जातो न जातो तोच तो क्षण आला... आमच्यापासून अगदी काही फुटावर तेजतर्रार लैला वाघीण आणि तिचा तेवढाच गोंडस छावा चिकू जणू काही आपल्या सगळ्या पोझ देण्यासाठीच आमची वाट पाहत होते की काय, असं वाटायला लागावं असे उभे होतं. त्याक्षणी तिथं फक्त आमचीच गाडी... जंगलची राणी आणि राजकुमार राऊंडला निघालेत हे पाहून अवघं जंगल स्तब्ध झालेलं. कमालीची शांतता... लैलाचं ते ऐटीत चालणं, तिच्यामागून आज्ञाधारक बालकाप्रमाणे चालणारा तिचा छावा, पाण्याच्या डबक्यात ऐटीत बसणं. १५-२० मिनिटांनंतर डबक्यातून उठून पुन्हा रस्त्यावर येणं. अगदी शांतपणे. व्वाsss! डोळ्याच पारणं फिटणं म्हणजे काय, ते त्या क्षणाला समजलं! अगदी अवर्णनीय दृश्यं... सगळं काही कायमचं मनात कोरून राहील असं.
नंतरच्या ३ आणि ४ जूनच्या सफारीत जंगलच्या राजाने कधी अगदी जवळून तर कधी लांबून असं भरभरून दर्शन दिलं. पण शेवटी जंगलचा राजाच तो, त्याला नजरेत कितीही साठवलं तरी पुन्हा पुन्हा त्याला पाहण्याची आस काही संपत नाही, हे मात्र खरंय. त्याचं दिसणं, त्याचं चालणं, त्याचे हावभाव, नजरेतील दरारा, संथ गतीने, दबक्या पावलाने चालण्याची ढब, त्याचं देखणं सौंदर्य सगळं काही मनाला भुरळ पाडणारं...
प्रत्येक सफारीला झोनमध्ये एन्ट्री केली की मोराचा म्यांव म्यांव आवाज, लांडोर-मोरांचे दर्शन, सुंदर सुंदर पक्षी, पक्ष्यांचे मधूर आवाज, गोड निरागस हरणं, सांबर, माकडं, आपल्या मिचमिच्या डोळ्यांच्या बाळाला पोटाशी घट्ट धरलेल्या माकडिणी या सगळ्यांनी मनसोक्त दर्शन दिलं... आणि पाऊस नसला तरीही पहिल्या पावसात चिंब भिजून निघावं असा सुंदर अनुभव आला.
शेवटचा दिवस... राजाची रुबाबदार स्वारी
सफारी की किल्ला असे दोन पर्याय आयोजकांनी दिले होते. पण योगायोगाने आमच्या बसमधील सगळ्यांनाच सफारीला जायचे होते... आणि एकमेकांची साथही सोडवत नव्हती कदाचित... कारण या चार दिवसात आम्ही म्हणजे एक फॅमिलीच झालो होतो. या सफारीला आधी एकदा येऊन गेलेला गाईडच आमच्याबरोबर होता. त्याने निघतानाच सांगितलं, चलो आज आपके लिये बंपर ड्रॉ खोलते है.
झोन ५ मध्ये एन्ट्री केली... आदल्या दिवशी वाघ न दिसल्याने आणि ही शेवटची सफारी असल्याने सगळ्यांची वाघ दिसावाचं ही खूप इच्छा होती. झोनमध्ये शिरल्यावर नेहमीप्रमाणे रस्त्यात हरणं, आपला सुंदर पिसारा फुलवलेले दोन दोन मोर, मोराचा नाच मनसोक्त पाहायला मिळाला. मोराचा पिसारा... अहाहा! कसलं सुंदर कलर कॉम्बिनेशन! शेवटी निसर्गाचं देणं ते!
आमच्या गाईड कॉलचा आवाज घेत घेत जात होता... आता काय सगळेच एक्स्पर्ट झालेले कॉलचा आवाज ओळखण्यात आणि... आणि अनपेक्षितपणे आमच्या बससमोरील जीपच्या समोर भर रस्त्यात मध्यभागी राजाची स्वारी रुबाबात चालत येत असलेली दिसली. कसलीच फिकीर नसल्यासारखी... घाबरायचं ते बाकीच्यांनी, मी नाही, हे सांगणारी त्याची ती देहबोली. वाह, क्या अंदाज है!
हळूहळू जीपच्या बाजूने तो आमच्या कॅन्टरसमोर आला. रस्ता अरुंद. वळवायला चान्स नाही. त्यामुळे तो जसा जसा पुढे येत होता तस तसे आम्ही मागे मागे जात होतो... आणि त्यालाही आजूबाजूला जंगलात न जाता रस्त्यातच चालायचं होतं. मागे जायचं तर तुम्ही जा... इथे माझं राज्य आहे. असंच जणू काही त्याला सांगायचं होतं... आणि आम्हाला काय, त्याला किती नजरेत साठवू आणि किती नको असं झालं होतं. त्यामुळे आम्हीही हळूहळू मागे जात होतो. फोटो, व्हिडिओ शूट, सगळे कॅमेरे त्याच्यावर रोखलेले. सेलेब्रिटी होता ना तो आमच्यासाठी... त्याचं झाडाजवळ जाणं, मार्किंग करणं, परत रस्त्यावर येणं, जवळ जवळ २० मिनिटं हे चाललं होतं. हळूहळू गाडीच्या बाजूने तो गेला. त्याचं पाठमोरं रूपही भरभरून पाहिलं आणि जंगलाच्या दिशेने तो निघून गेला. आमचं नशीब जोरदार होतं नक्कीचं... त्याशिवाय का स्वतःच समोर आला काहीही कॉल न देता. तो ही अगदी काही फुटांवर... आम्हाला निरोपच द्यायला जणू आलेला. अविस्मरणीय आनंदाचं मापच त्याने आमच्या पदरात घातलं.
परतीच्या मार्गाला लागलो. बंपर ड्रॉ फुटलाच होता. त्यात अजून एक लॉटरी लागावी तसा स्लॉथ बेअर दिसला. एका छोट्याश्या तळ्याकाठी भलंमोठं कासव दिसलं... दुधात साखर पडावी तसं झालं. नशीब जोरदार होतं ना आमचं... गाईडवर सगळेच खुश होते. कारण त्याचा शब्द 'बंपर ड्रॉ' शब्दशः खरा ठरला होता. प्रत्येकाने गाईडचे मनापासून आभार मानले आणि त्याला निरोप दिला.
या सगळ्याच्या जोडीला 'मछली' या वाघिणीवरची भावुक करणारी शॉर्ट फिल्म, चविष्ट आणि रुचकर जेवण तसेच पारंपरिक राजस्थानी गाण्यांचा कार्यक्रम, ज्याच्यावर आम्हीही छान ठेका धरला व नृत्य केलं, अशा सर्वच गोष्टींचा मनमुराद आनंद लुटला. पहिल्या दिवसापासून हॉटेल ते जंगल प्रवास आम्ही खूप एन्जॉय केलं. खूप जुनी ओळख असावी असं आमचं बॉण्डिंग झालेलं.
तरुणांनाही लाजवेल असा उत्साह असलेले, धडाडीचे, प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारे केणी काका, हसरे, काही न काही माहिती देणारे परब काका, शांत स्वभावाचे कुलकर्णी काका आणि रिसबुड काका, सगळं काही छान एन्जॉय करणाऱ्या सावंत काकी... या वयात किती छान एन्जॉय करतायत ही मंडळी आणि तीही जंगल सफारी... ग्रेट! शब्दकोशाचं भांडार असलेली आणि प्रत्येक पक्षाची सगळी माहिती असणारी आणि ते ज्ञान आम्हालाही देणारी बोलकी आणि हेल्पफुल सुप्रिया आणि अथर्व, जंगलातील प्रत्येक गोष्टीचं छान निरीक्षण करणारी सारिका, बोलक्या स्वभावाने आनंदी वातावरण ठेवणारे मि. कर्णिक, खेळकर स्वभावाचे मि. शिंगटे, आम्हाला पुढे बसायला देऊन स्वतः मागे बसणारे समजूतदार शांत स्वभावाचे मिलिंद कुलकर्णी, फोटोग्राफी एन्जॉय करणारे निहाल आणि कॅनेट डिसूझा, मिश्किल, हसऱ्या स्वभावाचे डॉ. कुलकर्णी यांनी तर प्रत्येक सफारीत जान आणली. डॉक्टरांची गोड मुलगी सोनू शांतपणे सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करत होती. मिसेस स्वाती कुलकर्णीचा विनोदी स्वभाव वातावरणात छान भर टाकत होता.
टेंबे काका म्हणजे तर काय ऊर्जेचा स्रोतचं. खूप काही शिकावं त्यांच्याकडून असे. ऊर्जा दीदी आमच्या अन्वितची आवडती दीदीचं झाली आणि दुर्वाची छान मैत्रीण... प्राजक्ता आणि श्रीदीप खूप गोड आणि प्रेमळ कपल. दुर्वा आणि अन्वितची सगळ्यांशी छान गट्टी जमली. खूप एन्जॉय केलं दोघांनी आणि अर्थातच आम्हीही... ५ जून ला दुपारी २ वाजता परतीच्या मार्गाला लागलो ते या सुंदर अविस्मरणीय आठवणी बरोबर घेऊन आणि एकमेकांशी टच मध्ये राहण्याचा शब्द देऊनचं...
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत)