अल्पमुदतीतील कमी पाण्याची भात शेती
नॅशनल राइस रीसर्च इन्स्टिट्यूट गेली कित्येक वर्षं भात पिकावर सातत्याने नावीन्यपूर्ण संशोधन करत आहे. महाराष्ट्रासाठी देखील या संस्थेचं मोठं योगदान आहे. महाराष्ट्रासाठी या संस्थेने आतापर्यंत एकूण 13 जाती विकसित केल्या आहेत.
मिताली मठकर, झी मीडिया : तांदूळ हा भारतीयांच्या आहारातील एक प्रमुख अन्नघटक. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आणि पोटाला आधार देणारा. ओदिशातील कटक येथील एनआरआरआय, म्हणजेच नॅशनल राइस रीसर्च इन्स्टिट्यूट (NRRI) गेली कित्येक वर्षं भात पिकावर सातत्याने नावीन्यपूर्ण संशोधन करत आहे. भारतातील सर्वंच प्रांतातील पीकपद्धती आणि प्रांतीय हवामान रचनेनुसार या केंद्रिय तांदूळ संशोधन संस्थेनं आतापर्यंत भाताचे जवळपास 179 वाण विकसित केले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि भारतातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल हा मुख्य उद्देश ठेवून विद्यमान संचालक ए. के. नायक यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची वाटचाल सुरू आहे. भारतीय शेतकऱ्यांना तांदळाचं (Rice) अदिकाधिक उत्पन्न कशा पद्धतीनं घेता येईल आणि त्यातही महाराष्ट्रासाठी संस्थेचं काय योगदान आहे, या संदर्भात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुशांतकुमार दास (प्रिन्सिपल सायंटीस्ट, क्रॉप डेव्हलपमेंट डिपार्टमेन्ट) यांच्याशी साधलेला संवाद.
भाताच्या वेगवेगळ्या जाती अस्तित्वात असताना नवनवीन जातींची आवश्यकता का भासते?
सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समसया जाणून घेतो. वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या हवामानात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधतो. त्यावेळी शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न असतो की यातून किती उत्पादन येईल. अशा वेळी सगळ्यात मोठी समस्या असते ती पीक आल्यावर होणारा कीटक आणि किडीचा प्रादुर्भाव. त्यामुळे आम्ही जेव्हा एखादं वाण विकसित करतो तेव्हा या रोगांचा संसर्ग पिकाला होणार नाही, हा यामागचा मुख्य हेतू असतो. जेणेकरून किटकनाशकांचा कमीतकमी वापर होईल. तर दुसरा हेतू असतो, वातावरणातील बदलाचा या वाणावर कमीतकमी परिणाम कसा होईल ते पाहणं. याचप्रमाणे विकसित केलेलं वाण खाण्यासाठी अधिकाधिक चविष्ट-रुचकर कसं होईल याकडेही आम्ही लक्ष पुरवतो. तसंच भाताची लांबी-जाडी याकडेही लक्ष दिलं जातं.
भातपिकासाठी पाण्याची खूप आवश्यकता असते. त्यावर उपाय म्हणून कुठलं वाणं विकसित करण्यात आलं आहे?
भातपीक लागवडीसाठी पाणी जास्त प्रमाणात लागतं. साधारणपणे एक किलो बियाण्यांच्या पिकासाठी पाच हजार लिटर पाण्याची गरज असते. यात आम्ही अशा काही जाती विकसित केल्या आहेत, ज्यांच तीन ते साडेतीन हजार लिटर पाण्यामध्येही पीक घेतलं जाईल. या वाणांना एरोबिक राइस व्हरायटी असं आम्ही म्हणतो. या वाणासाठी खर्चही कमी येतो. कारण या वाणाची लावणी पुन्हा वेगळी करावी लागत नाही. अशा पद्धतीच्या सीआर धन 200 ते 211 अशा अकरा जाती आम्ही विकसित केल्या आहेत. हे वाण सतत पाण्यात राहण्याची गरज नाही. आवश्यकतेनुसार शेतकरी पिकाला पाणी देऊ शकतो. यामध्ये काही भरपूर पीक देणाऱ्या, तर काही कमी कालावधीत येणाऱ्या जातीही आहेत. या वाणांमुळे उत्पादनात साधारणपणे 10 टक्क्यांनी घट होत असली, तरी 110 ते 120 दिवसांत या वाणांचं उत्पादन मिळत असल्यामुळे शेतकऱ्याला फायदाच होतो. यातील सीआरधन-211 हे वाण महाराष्ट्रासाठी विकसित करण्यात आलं आहे. हे वाण साडेचार ते साडेपाच टन उत्पादन देतं.
महाराष्ट्रासाठी वाण विकसित करताना कोणत्या बाबींचा विचार केला गेला?
महाराष्ट्रासाठी एकूण 13 जाती विकसित केल्या आहेत. त्यात एरोबिक राइस व्हरायटी, इरिगेशन व्हरायटी, ज्याध्ये 130 ते 135 दिवसांत उत्पादन मिळू शकतं. त्याचप्रमाणे अधिक उत्पादन देणाऱ्या काही जातीही आहेत, उदहरणार्थ- सीआर धन-322, जे अलीकडेच विकसित करण्यात आलेलं आहे. देशात सगळ्यात लोकप्रिय असलेल्या सुवर्णा वाणाचं उत्पादन महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. मात्र सर्वसाधारण वाणापासून होणाऱ्या भाताचा दाणा आकाराने लांब असतो. परिणामी मिलमध्ये त्याचा तुकडा पडतो. परंतु सीआर धन-322 या वाणापासून होणारा भात आकाराने लहान असल्यामुळे त्याचा राइस मिलमध्ये तुकडा पडत नाही आणि अंतिमतः शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो.
जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांना तुम्ही हाय यिल्डिंग म्हणजेच जास्त उत्पादन देणाऱ्या जाती किंवा न्यू जनरेशन राइस असं म्हणत आहात, तर न्यू जनरेसन राइस म्हणजे नेमकं काय?
भरपूर उत्पादन देणाऱ्या चार-पाच जाती आम्ही विकसित केल्या आहेत, ज्या 130 ते 140 दिवसांत उत्पादन देतात. या जातींना आम्ही न्यू जनरेशन राइस असं नाव दिलं आहे. कारण जर तुम्ही पिकाची नीट खबरदारी घेतली, निगा राखली तर जिथे 5 ते 6 टन धान्य मिळतं तिथे तुम्ही दहा टन धान्य पिकवू शकता. यातील सर्वाधिक लोकप्रिय वाण आहे- सीआर धन 314. सर्वसाधारण भाताच्या लोंबीत शंभर-दीडशे दाणे असतात, परंतु या वाणाच्या लोंबीत 250 ते 300 दाणे असतात. हे वाण उंचीला अधिक असल्यामुळे त्याच्या पातीही मोठ्या असतात. साहजिकच तुम्हाला चाराही मोठ्या प्रमाणावर मिळतो.