कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड : या वयात साहेबांना यातना देण्यात त्यांना काय मिळते..? त्यांनी मनात आणले असते तर त्यांच्या उमेदीच्या काळात एक ही विरोधक ठेवला नसता. सत्तेचा एवढा गैरवापर करायचे त्यांनी ठरवले असते, तर कोणी राहिले असते का..? सहज एका राष्ट्रवादीच्या पवार भक्ताची भेट झाल्यानंतर सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कमालीच्या रागानं तो पक्ष सोडणाऱ्यांवर शिव्यांचा मारा करत होता....! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी म्हणालो निसर्गाचे चक्र समजा... तो म्हणाला हो चक्र तर आहेच, पण साहेबांनी काय केले नाही, किती जणांसाठी, किती जणांना नगरसेवक, महापौर, आमदार केले. किती जणांचे तर अस्तित्व आहे ते पवारांमुळे...! आणि तेच आज जेंव्हा साहेबाना सर्वाधिक गरज आहे तेंव्हा सोडून गेले....! 


विरोधकांचे काम आहे पक्ष फोडण्याचे, पण ज्यांनी पवारांच्या आशीर्वादाने संस्थाने उभारली त्यांना पक्ष सोडताना कसे काय वाटले नाही...! या वयात त्यांना संपवण्याचा हा डाव आहे...! पण विरोधकांना माहित नाही... शेर बुढा हुआ, तो क्या हुआ शेर है...! 


मी - राजकारण असेच असते....इथे भावनांना महत्व नसते, संधी मिळताच संपवणे हे राजकारण आहे...!  आज तुमच्या साहेबांचे दिवस वाईट चाललेत...त्याला जबाबदार कोण हे त्यांना कळत असेल, ते काही तरी विचार करत असतीलच ना....! 


शेवटी काही बोलता येत नव्हते, म्हणून तो पुन्हा म्हणाला, 'साहेब साहेब आहेत, शेर बुढा हुआ तो क्या हुआ शेर आहे....! '


पवारांना आज त्यांचे संस्थानिक सोडून जात असताना, त्यांच्या एका निस्सीम भक्तांचे हे विचार...! आता त्याचा हा भाबडा आशावाद की खरंच पवार सध्याच्या या अडचणीच्या काळावर मात करत परत फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतील, याचा विचार अनेक राजकीय पंडित सध्या करत आहेत..! 


यापूर्वी ही शरद पवारांना अनेक अडचणी आल्या त्यावर त्यांनी मात केली....! पण आता मात्र पवारांच्या समोर अडचणी प्रचंड आहेत...! 


सर्वात महत्वाचे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सारखा राजकीय डावपेचात त्यांच्या पुढचा विचार करणारा विरोधक असल्यामुळे आणि त्यातच सत्तेचा सारीपाट फडणवीसांच्या बाजूने असल्याने पवारांना पुन्हा आपले राजकीय वजन वाढवण्यात मोठ्या अडचणीत आहेत...! 


शरद पवार हे आज ही महाराष्ट्रातले सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वमान्य नेते आहेत यात शंका नाही, पण ज्या पद्धतीने त्यांनी पक्षाची बांधणी केली, मोठे मोठे संस्थानिक पक्षात घेतले, ज्यांची सत्ता हीच निष्ठा असते, ते केव्हा तरी सोडणार? हे पवारांनी वेळीच ओळखणे गरजेचे होते, ते त्यानी ओळखले नाही...! 


आता ते त्यातून मार्ग कसे काढतात, हे त्यांनाच माहित पण सध्या तरी घर आणि घराचे वासे फिरले आहेत हे मात्र नक्की...! पण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक भक्तांना शरद पवार या एका नावावर विश्वास आहे...! 


शेर बुढा हुआ तो क्या हुआ, शेर.. शेर है, ही त्यांची भावना....विधानसभा निवडणुकीनंतर ती कायम राहते का हे लवकरच समजणार आहे....!