महिला राज(कारण)
आपण फार पूर्वीपासून बघत आलोय की प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपली मुलं डॉक्टर व्हावी , इंजिनियर व्हावी किंव्हा मग CA आणि वकील .....पण मी कोणालाच असं आपल्या मुलांना सांगताना पाहिलं नाही की तू मोठा राजकारणी हो , नेता हो.
साधना गायकर, ठाणे विभाग उपाध्यक्ष (भा.ज.पा.)
कल्याण. आपण फार पूर्वीपासून बघत आलोय की प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपली मुलं डॉक्टर व्हावी , इंजिनियर व्हावी किंव्हा मग CA आणि वकील .....पण मी कोणालाच असं आपल्या मुलांना सांगताना पाहिलं नाही की तू मोठा राजकारणी हो , नेता हो.
स्त्री आणि पुरुष समानता फक्त बोलण्या पुरती
मुळात राजकारण हे पण एक उत्तम क्षेत्र आहे हेच लोक मानायला तयार नाहीत ..याला कारणही तसंच आहे .पिढ्यान पिढ्या तेच तेच लोक राज्य करत आलेत व आपल्या मुलांना , नातेवाइकांना ही फार सहजपणे आपली जागा पुढे चालवायला देत आहे.मग त्या मधे लायकी , शिक्षण , अनुभव या गोष्टी तितक्या महत्वाच्या नाहीत . त्यामुळे सर्व सामन्यांच्या पचनी न पडणारे असं हे क्षेत्र आहे .आणि त्यात जर एखादी बाई यात पडणार असेल तर मग आणखीनच कठीण .कारण आपल्या समाजात स्त्री आणि पुरुष समानता फक्त बोलण्या पुरती आहे.'स्त्री शक्ती' वगैरे फक्त लेखनाचे विषय म्हणूनच अधिक छान वाटतात .पण प्रत्यक्ष स्त्री पुढे गेलेली अजूनही पुरुषांना पहावत नाही.
देशकार्य करणाऱ्या अनेक रणरागिणी
भारतावरच्या परकीय आक्रमण काळात आणि त्या नंतरही काही स्त्रिया राजकारणात होत्या.रझिया सुलतान , चाँद बीबी , राणी पद्मिनी , झाँसीची राणी अशा अनेक राण्यांचे दाखले इतिहासात आहेत.या शिवाय स्वातंत्र्य संग्रामात देशकार्य करणाऱ्या अनेक रणरागिणी ही होत्या .पण त्या नंतर स्त्रियांच स्थान दुय्यमच राहिलं.त्या कायम उपेक्षितच राहिल्या.चूल आणि मूल इतकीच ओळख सर्व सामान्य बाई ची राहिली. या बाबतीत माळी समाजाचे दैवत श्री.ज्योतिबा फुले यांना मानलं पाहिजे .स्त्री खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे पुढे आली .शिक्षण असो नाहीतर जुन्या वाईट चालीरिती .ज्योतिबा आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई यांचा मोलाचा वाटा आहे स्त्रीला सशक्त बनवण्यात आणि मग हळुहळु एकेक स्त्री विविध क्षेत्रात पुन्हा पुढे येऊ लागली .
चांगलं किती वाईट किती हा भाग बाजूला ठेवा
आणि अशीच एक महान आणि कणखर स्त्री आपल्या भारत देशाला पंतप्रधान म्हणून लाभली ती म्हणजे स्व.इंदिरा गांधीजी .पहिली आणि आजपर्यंत ची एकमेव महिला प्रधान मंत्री .मला कॉंग्रेस , भा ज पा या भानगडीत पडायचं नाहीये .एक स्त्री म्हणून पाहतीये मी .फारच सशक्तपणे 15 वर्ष राजकारणात आपला ठसा उमटवला .चांगलं किती वाईट किती हा भाग बाजूला ठेवा .कारण म्हणतात ना ' everything is fair in love and war and even politics'.
इंदिरा जी नंतर अनेक सशक्त महिला आल्या राजकारणा मधे जसे की सुषमा स्वराज , सुमित्राताई महाजन , वसुंधरा राजे , शीला दीक्षित , ममता बेनर्जी , दलित नेत्या मायावती , इत्यादी ...दक्षिण मध्ये जयललिता यांचं ही वर्चस्व नाकारता येणार नाही. यातल्या काही महिलांना तर मुख्यमंत्री पद भुषवता आलं जसे की राबडी देवी , शीला दीक्षित , उमाभारती, वसुंधरा राजे आणि ममता बेनर्जी. सौ.प्रतिभा पाटील यांना तर देशातल्या पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला .(मग कोणी कितपत काम केलं या वादात मला पडायचं नाही .)
पण शेवटी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच स्त्रिया खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्या .बाकीच्या अजूनही आपल्या अस्तित्वासाठी धडपडतायेत. आणि याचं कारण म्हणजे आपली पुरुष प्रधान संस्कृती .बाई पुढे गेलेली पुरुषांना खपत नाही. male ego दुखावला जातो .त्यामुळे जिथे गरज असेल तिथेच आणि तेवढेच बाईला पुढे आणण्यात येते .ही गोष्ट का विसरतात लोक की बाई ही कर्तुत्व , मेहनत , हुशारी , चिकाटी , कामाची जिद्द या बाबतीत पुरुषा पेक्षा नक्कीच दोन पावलं पुढे असते .तिला नेहमीच ग्रुहीत धरले जाते.
अर्थात याला अपवाद ही आहे .सगळेच पुरुष असे संकुचित स्वभावाचे नसतात.आपले पंडित नेहरू नाही का एकुलत्या एक मुलीला देशाची पंतप्रधान होऊ शकेल इतकं सक्षम केलं .आता आपण थोडं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे वळू. सरकार ने महिलांसाठी 50% जागा राखीव ठेवल्या आहेत .किती महिला नगरसेवक या पदासाठी सक्षम आहेत हा प्रश्न थोडा विचार करण्या सारखा आहे .राखीव आहे किंव्हा नवऱ्याने सांगितलं म्हणून निवडणुकीला उभं रहायचं .knowledge शून्य , अनुभव शून्य , काम करण्याची इच्छा शून्य .आज हेच चित्र जागो जागी दिसतंय .
एकदा निवडून आलो की पुढील पाच वर्ष आपल्याला कोणी हलवू शकणार नाही हे सत्य माहीत असल्यामुळे काम करायचं नाही , त्यामुळे विकास आणि प्रगती यांचा पत्ता नसतो आणि मग सरकार किंव्हा विरोधी पक्षाला दोष देत बसायचं .असं जनतेला फसवणे कितपत योग्य आहे ? निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी जर शैक्षणिक अट ठेवली तर बऱ्याच अंशी योग्य लोकप्रतिनिधी निवडण्यास जनतेला मदत होईल आणि मग अच्छे दिन खरंच येतील .
कोणत्याही पक्षाची बाजू न घेता एक गोष्ट मात्र आपल्या सगळ्यांना मान्य कराविच लागेल की मोदी सरकार मधे केंद्रीय मंत्रीमंडळात बरीच महत्वाची खाती महिलांना दिली गेली आहेत .या आधी इतक्या मोठया प्रमाणात महिला- राज कधीच नव्हते. भारतातलं संरक्षण खातं , परराष्ट्र , वस्त्रौद्योग , खाद्य , जल संसाधन व स्वच्छता आणि अर्थात महिला- बाल कल्याण ...सगळं महिलांच्या हाती लागलंय. मला अत्यंत कौतुकाने हे सांगावसं वाटतंय की हुशार , अनुभवी , सु-शिक्षित , सुसंस्कृत महिला यासाठी निवडल्या गेल्या जे त्यांचे काम अगदी चोखपणे करत आहेत .स्त्रियांना ते निसर्गतः वरदान लाभलेलं आहे.
" Multi tasking job" ......
पण या महिला यशस्वी होण्या मागचं एक महत्वाचं कारण हे की त्यांच्या घरच्यांनी केलेले सहकार्य आणि टाकलेला विश्वास .....राजकारणात एखादया स्त्रीला पुढे येणं इतकं सोपं नाहीये .पावलो पावली तुमचे पाय खेचणारे , कामांत अडथळे आणणारे , पूर्णपणे तुम्हाला हतबल करणारे इथे खूप सापडतील .पण या सगळ्यातून जे न घाबरता , कोणाला न जुमानता आपल्या कर्तुत्व , ईमानदारी व मेहनतीने एक एक पाऊल पुढे टाकत आपला राजकीय प्रवास सुरू ठेवतात ते नक्कीच खूप यशस्वी होतात.स्त्री असो व पुरुष जिद्द नाही सोडली पाहिजे.
आज या लेखाच्या माध्यमातून मला इतकंच सांगायचं की प्रत्येक व्यक्तीला नगरसेवक , आमदार , खासदार किंव्हा मंत्री काही होता येणार नाही पण आपल्याला या समाजाचं काहीतरी देणं लागतंय ही भावना कायम ठेवून थोडी का होईना पण समाज कार्याची इच्छा जरूर बाळगा व शक्य तेवढं माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न नक्की करा.........