Rishabh Pant : ऋषभ पंत- कधी पेंटर, कधी लोहार
ऋषभ पंतने (Rishabh Pant) स्विंग आणि पिचवर पडून अनपेक्षित सिम मूव्हमेंट दाखवणाऱ्या टिपिकल इंग्लिश खेळपट्टीवर 360 अंशाची बॅटिंग दाखवली.
रवि पत्की : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीचा पहिला दिवस ऋषभ पंत (Rishabh Pant) खिशात घालून घेऊन गेला. स्विंग आणि पिचवर पडून अनपेक्षित सिम मूव्हमेंट दाखवणाऱ्या टिपिकल इंग्लिश खेळपट्टीवर पंतने 360 अंशाची बॅटिंग दाखवली. (eng vs ind 5th test ravi patki blog on team india vice captain rishaba pant century)
ऋषभमध्ये एकाचवेळेस लॉइड मधला लोहार आणि कालीचरण मधला पेंटर दिसत होता. असे वाटत होते की लॉइड कालीचरणची पार्टनरशिप चालू आहे. लॉईडसारखा हातोडा चेंडूला बदडत होता तर कालीचरणचा पेंटिंग ब्रश कव्हर ड्राइव्हच्या रेखीव पेंटिंग खाली लफ्फेदार सही करत होता. षटकार मारताना तो T20चा बादशाह वाटत होता.
तर क्रिकेट पाठयपुस्तकाला खुश करेल असे drives खेळताना तो कसोटी सामन्याचा DNA पेशींमध्ये घेऊन आल्यासारखा दिसत होता. त्याने भक्षाची कत्तल केली आणि कुरवाळलेही.पॉईंटच्या शेजारून खेळलेल्या स्लाइस शॉटमध्ये त्याने प्राविण्य मिळवलेले दिसते. उंचावरून मारलेल्या सर्व फटक्यांनी आरामात सीमारेषा ओलांडली.
त्याची मानसिकताचा आक्रमणाची आहे.त्यामुळे तो चेंडूचा सामना करताना जेव्हा उभा रहातो तेव्हा येणाऱ्या चेंडूवर आपली विकेट जाऊ द्यायची नाही असा विचार न करता मी येणारा चेंडू कसा आणि कुठे बदडू शकतो याचे विचारचक्र त्याच्या मनात गरागरा फिरत असते.
अँडरसन,पॉटस, ब्रॉड,स्टोक्स,लीच सगळ्यांनाच त्याने लॉंड्रीत नेले. खेळताना आपण कसे दिसतो याच्याशी त्याला काही देणेघेणे नाही मग शॉट मारताना विकेटच्या मध्यभागी balace जाऊन पडला तरी त्याला त्याची फिकीर नाही. त्याला धावांशी मतलब आहे कलात्मकतेशी नाही.
जडेजानेसुद्धा अफलातून बॅटिंग केली. फुटवर्ककडे लक्ष दिल्याने स्विंग बोथट करत त्याने उत्कृष्ट drives मारले. फुल लेंथ चेंडूंचा मस्त समाचार घेतला.