अण्णासाहेब चवरे, झी मीडिया, मुंबई: 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ति. स्व. बाप्पा गणरायास, साष्टांग दंडवत.


बाप्पा गणराया, खरं म्हणजे हे वाचताना अनेक लोक नाकं मुरडण्याची शक्यता आहे. काही लोक ‘टीका’ करण्याची शक्यता आहे. यात जास्तीत जास्त गणेश मंडळांचे तरूण कार्यकर्ते असतील. तसेच अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि गणेशोत्सवास बाजारू रुपात साजरे करणारे भक्तसुद्धा असतील. काय करू गणराया. हे केवळ तुलाच सांगू शकतो. कारण तूच सकळ विद्येची देवता. तुलाच माझ्या मनातला अंतर्विचार कळण्याची शक्यता अधिक.


तू, विसर्जीत झालास. ( विसर्जीत झालास की तुला विसर्जीत केलं गेल? ) असो. दहा दिवस तू सोबत होतास. तेव्हा तुझ्या सोबत आणि तुझ्या आजुबाजूला घडत असलेल्या घटना घडामोडी पहाताना विचार करण्यास उसंतच मिळत नव्हती. मात्र आता तू गेलास आणि विचार करायला भरपूर वेळ मिळाला. बाप्पा अनंतापासून अनंतापर्यंतचा तुझा प्रवास. या तुझ्या प्रवासात आमच्या पूर्वजांनी आमच्याच फायद्यासाठी तुझ्या नावानं उत्सव सुरू केला. जो आज जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचलाय. परंतु, त्यावेळी त्या आमच्या पूर्वजांचा उद्देश होता तो प्रामुख्याने सर्वांनी आनंदाने एकत्र येवून आपली ताकद जास्तीत जास्त समाजहितासाठी वापरात यावी हा. म्हणूनच तुझ्या येण्याने सर्व लहान थोर भोळेभाबडे(!) भक्तगण आनंदीत होतात. आजकाल या आनंदाचा अतिरेकी अट्टाहास चालला आहे. इतका की, बाप्पा, तुझ्या तुझ्या आगमनाची चाहूल लागताच हृदय धडधडू लागते. तुझी प्रतिष्ठापना करण्यासाठी गणेशमंडळाचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने वर्गणीचे जे आकडे मागतात ते देताना महिन्याभराचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडते.


पूर्वी तू मातीपासून बनलेला असायचास, तुझं असणं हे पूर्णतः नैसर्गिक असायचं. आता काळ बदलला. बदलत्या काळासोबत तुझं आगमन आणि साजरा होणारा उत्सव. या सर्वांचच रुप बदलत गेलं. तू सर्वश्रेष्ठ असूनही तुझ्या आरतीला आम्हांस सेलिब्रेटी बोलवावे लागतात. (आरतीस येणारे भक्त तुझी आरती विसरुन सेलिब्रेटींसाठीच टाळ्या वाजवतात.) तुझ्या मंडळाचे अध्यक्ष हे राजकीय पक्षांचे अथवा कुठल्यातरी उद्योगपतींचे हस्तक असतात. ते आपापल्या भक्तांना (कार्यकर्त्यांना) तुझ्या नावाखाली आपल्या नेत्यांचा जनसंपर्क जोपासण्याचे काम इमानइतबारे करतात. त्यासाठी संबंधितांना देणगीच्या रुपात आर्थिक रसदपुरवठा केला जातो. हे सारे कमी पडते की काय? म्हणून देखाव्यांचा थाट मांडला जातो. या देखाव्यांच्या मार्फत भक्तांना समाजप्रबोधनाचे काही द्यावे, यापेक्षा मंडळाच्या विचारांना जे पटेल तेच द्यावे हे तत्व लागू केले जाते. असे असतानाही हे देखावे पाहण्यासाठी अनेक हौसे - नवसे गर्दी करतात. त्यात ज्यांना ज्यांना जे जे पहावेसे वाटते ते ते पाहून घेतात.


....आणि एकदाचा शेवटचा दिवस येतो. तुझ्या विसर्जनाची तयारी होते. ढोल, ताशे, झांज, लेझिम आणि डॉल्बी यांच्या अतिप्रचंड आवाजात अनेक लहान - थोर शरीरं आपल्या शरीराला झटके द्यायला लागतात. (याला ते डान्स म्हणतात.) पहाणारेही ‘आज मी ब्रम्ह पाहिले’च्या थाटात झुंडीने एकत्र येवून पाहतात. या झुंडीतील लोक संख्येने इतके असतात की दुनियेतील कोणतेही संख्यामापक याला लावता येत नाही. तरीही या झुंडीतील उत्साह कायम असतो. यामध्ये नव्याने जन्मास आलेल्या जीवाला घेऊन आई-बापही सामील असतात. तसेच तरुण, तरुणी, वृद्ध आणि अनेक बायाबापड्याही असतात. असो.


... तर बाप्पा शेवटच्या दिवशी पुढच्या वर्षी लवकर या म्हणत तुम्हाला निरोप दिला जातो. भक्ताकडून कशाचीही अपेक्षा न करता नि:स्वार्थी भावनेने सोबत करणार्‍या बाप्पा, तुम्हीच मला सांगा, तुम्हाला हे पटते का? सर्वसामान्यपणे विचार करताना बाप्पा, खरंच आमचा गोंधळ होतो हो. बाप्पा मनातल्या भक्ताशिवाय देखाव्यांचा दिखाऊपणा दाखविल्या जाणार्‍या या भक्तीचा उपयोग काय? आता मला सांगा बाप्पा, स्वार्थापोटीच नाही का? 
कळावे


तुझाच गणेशभक्त