मीरा मालेगावकर, नागरी व्यवस्थापन तज्ज्ञ, क्वालालंपूर :  येत्या ४० वर्षात जगातील मोठ्या शहरांची लोकसंख्या दुप्पट होणार आहे. त्यामुळे ही खूप चिंतेची बाब आहे. ही मानवासाठी आणि आपल्या ग्रहासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे शहर आणि खेड्यांचा समन्वय साधणे गरजेचे आहे,  खेड्यामध्ये डिजीटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास घडविण्याची गरज असल्याची शिफारस इंग्लंडचे राजकुमार सन्माननीय प्रिन्स चार्लस यांनी क्वालालंपूर येथील जागतिक नागरी मंच ९ च्या जागतिक परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते. 


नवीन नागरी धोरणाची रुपरेखा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'जागतिक नागरी मंचाची' नववी परिषद ७ ते १३ फेब्रुवारी दरम्यान मलेशियाच्या क्वालालंपूर येथे संपंन्न होत आहे. या अअनिवार्य (non-legislative) परिषदेचे आयोजन मलेशिया सरकार, क्वालालंपूर शहर आणि संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ‘जागतिक नागरी मंच’ सचिवालय यांनी केले आहे. वेगाने वाढणारी शहरे आणि नागरीकरणाचे समाज, अर्थकारण व पर्यावरणावर होणारे परिणाम हा एकविसाव्यां शतकातील ज्वलंत विषय आहे. 'जागतिक नागरी मंच ही द्विवार्षिक परिषद ह्या विषयावर सांगोपांग चर्चा करण्याचे संयुक्त राष्ट्राचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या नवव्या परिषदेचा मुख्य उद्देश 'सर्वसमावेशक शहरे, २०३०' या 'नवीन नागरी धोरणाची’ अंमलबजावणी करण्यासाठी रूपरेखा ठरवणे हा आहे.


 



जगातील २५ हजार जणांचा सहभाग


जगभरातील नगरशास्त्र, समाज, अर्थकारण व पर्यावरण आदी विषयातील तज्ञ, संयुक्त राष्ट्रांच्या विविध शाखा, जागतिक बॅंक, आशियन डेव्हलपमेंट बॅंक आदी आंतरराष्ट्रीय संस्था, अनेक देशांचे प्रशासकीय अधिकारी, नगर/महानगरांचे पुढारी आणि प्रतिनिधी, बिगर शासकिय संस्था (NGOs), नामांकित विद्यापीठं आणि महत्त्वाचे म्हणजे जगभरातील सामान्य नागरीक असे २५००० लोक या परिषदेत सहभागी झाले आहेत. भारतातूनही अनेक नामांकित संस्था व व्यक्ती या परिषदेत सहभागी झाले आहेत.



क्वालालंपूरला सोहळा...


क्वालालंपूर शहर या परिषदेची यजमानपद भूषवत आहे. शहरभर वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रम योजलेले आहेत. परिषदेचा मुख्यसोहळा आणि प्रदर्शन, क्वालालंपूरच्या प्रसिद्ध पेट्रोनाज इमारतीतील आंतरराष्ट्रीय अधिवेशन संकुलात (KLCC) होत आहे. 


 



 


पहिला दिवस नागरी सभांचा...


परिषदेची सुरवात ७ फेब्रुवारीला, मलेशियाचे नागरी समाधान व आवासमंत्री (Minister of Urban Wellbeing and Housing) श्री तन श्री नोह उमर व युनो-हॅबीटॅटच्या कार्यकारी संचालक श्रीमती मेमुना मोहम्मद शरिफ यांच्या उपस्थितित, संयुक्त राष्ट्राच्या झेंडा उभारणी सोहळ्याने झाली. श्रीमती मेमुना मोहम्मद शरिफ या क्वालालंपूरच्या माजी महापौर असून, युनो-हॅबीटॅटच्या कार्यकारी संचालक म्हणून त्यांच्या नियुक्तीनंतरची ही पहिलीच जबाबदारी. परिषदेचा पहिला दिवस नागरिक-सभांचा होता. मुले, तरुण, महिला व उद्योग यांच्या सभांमधे नगररचना, व्यवस्थापन आणि धोरण याबाबत या सर्वांची मते आणि सहभाग यांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.



भारतीयांचे कब्बड्डी नृत्य....


परिषदेचे औपचारिक उद्घाटन, दुसर्‍या दिवशी, ८ फेब्रुवारी, २०१८ ला, मलेशियाचे पंतप्रधान माननीय श्री नजिब रझ्झाक व युनो-हॅबीटॅटच्या कार्यकारी संचालक श्रीमती मेमुना मोहम्मद शरिफ यांच्या हस्ते संपन्न झाले. खचाखच भरलेल्या सभागृहात दुपारी ३.३० वाजता उद्घाटन सोहळ्याची दिमाखदार सुरवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली. मलाय लोकांनी मोठ्या उत्साहात मलेशियाचे विविध नृत्याविष्कार व्यासपीठावर सादर केले, त्यात तिथल्या भारतीय वंशाच्या नागरिकांनी कब्बड्डी नृत्य सादर करून मोठी रंगत आणली.



प्रिन्स चार्ल्स यांनी केली 'स्मार्ट खेड्यांची' शिफारस 


 उद्घाटनाआधी इतर आंतरराष्ट्रीय पाहुण्यांची छोटेखानी भाषणे झालीत.  इंग्लंडचे राजकुमार सन्माननीय चार्लस यांनी व्हिडीओ प्रक्षेपणाद्वारे श्रोत्यांना संबोधित केले. गंमत म्हणजे, या नागरीकीकरणाबद्दलच्या परिषदेत सन्माननीय चार्लस यांनी स्मार्ट खेड्यांची वकालत केली. यानंतर प्रदर्शनाचेही औपचारिक उद्घाटन पंतप्रधान माननीय श्री नजिब रझ्झाक यांनी केले. तत्पूर्वी, सकाळपासून वेगवेगळ्या दालनात अनेक नागरी विषयांवर संवाद, सभा, संबोधने आणि उच्च स्तरीय बैठका इत्यादी सत्रं भरगच्चं उपस्थितीत पार पडली. 


 



भारतीय पॅव्हिलियनचे उद्घाटन


प्रदर्शनात भारताचाही पॅव्हिलियन असून त्याचे उद्घाटन सकाळी ९.०० वाजता गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी केले. भारताबद्दल अभिमानास्पद बाब म्हणजे, श्री पुरी यांची २०१९ पर्यंत क्वालालंपूर येथील युनो-हॅबीटॅटच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यांनी सकाळी (९ ते ११) परवडणाऱ्या घरांचे नवीन मॉडेल बाबत नेटवर्किंग सत्र संचालित केले.


 


(लेख मीरा मालेगावकर नागरी व्यवस्थापक तज्ज्ञ आहेत. क्वालालुंपूर, मलेशिया. ७ ते १३ फेब्रुवारी, २०१८ दरम्यान होणार आंतरराष्ट्रीय परिषदेत या सहभागी झाल्या आहेत. झी २४ तासच्या वाचकांसाठी या परिषदेचा वृत्तांत ब्लॉगच्या स्वरूपात लिहणार आहेत.)