कैलास पुरी, झी मिडिया, पिंपरी चिंचवड : खरे तर परिवर्तन निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे आज कुणी सर्वशक्तिमान असेल तर उद्या तो तेवढाच ताकतवान राहिल हे सांगता येत नाही. राजकीय पक्षांचेही तसेच आहे. पिंपरी चिंचवड मध्ये काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात इतर पक्षांना साधे उमेदवार मिळत नव्हते. पण आज परिस्थिती नेमकी उलटी झालीय...! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंडखोरी नको म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शेवटपर्यंत उमेदवारी जाहीर करत नव्हते, पण आज राष्ट्रवादीला उमेदवार शोधावे लागत आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वाधिक नाचक्की झाली ती भोसरी विधानसभा मतदार संघात. गेले कित्येक दिवस काही जण या मतदारसंघात इच्छूक असल्याचे सांगत होते. पण तिकीट मिळण्यापूर्वीच आमदार महेश लांडगे यांनी प्रचारात आघाडी घेतली. त्यांना मिळणार प्रतिसाद, गर्दी पाहून म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची भोसरीमध्ये झालेली दयनीय अवस्था म्हणा, राष्ट्रवादीकडून या मतदार संघात एक ही उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छूक राहिला नाही. त्यामुळे या मतदार संघात राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवारच नाही. 


कधी काळी या मतदारसंघात अजित पवार यांचा शब्द प्रमाण मानला जायचा. प्रत्येकजण आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून अजित पवारांकडे ठाण मांडून बसायचा. 


पक्षाचा ए बी फॉर्म मिळणे म्हणजे आयुष्य सार्थक लागल्याची भावना कार्यकर्त्यांत असायची. त्याच्या नेमकी उलट परिस्थिती आज झाली. शहराध्यक्ष ए बी फॉर्म घेऊन भोसरी मध्ये जात होते. अगदी विलास लांडे, दत्ता साने यांनी पक्षाचा उमेदवारी अर्ज भरण्यास नकार दिला. 


पक्षाच्या झालेल्या या नाचक्की नंतर राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना पाठिंबा जाहीर केला खरा, परंतू तोपर्यंत महेश लांडगे समर्थकांनी जे मायलेज घ्यायचे ते घेतले. सोशल मिडियावर महेश लांडगे यांच्या विजयाचे, विरोधकांची खिल्ली उडवणारे मेम्स, व्हिडिओ व्हायरल झाले. 


राज्यात 287 मतदार संघात आघाडीकडे उमेदवार पण भोसरीत नाही असे मेसेज शहरभरात फिरू लागले. त्याचा अर्थातच महेश लांडगे यांना प्रचंड फायदा झाला. एकूणच काय तर राष्ट्रवादीचे शहरातील बलवान ते कमकुवत असे एक वर्तुळ पूर्ण झाले. कालाय तस्मै नमः...!