प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई :  माधुरी दीक्षित मराठी सिनेमा कधी करणार ? मराठमोळ्या माधुरीला मराठी सिनेमाचं एवढं वावडं का ? बॉलिवूड गाजविणारी धकधक गर्ल मराठी सिनेमा का करत नाही ? असे एक ना अनेक प्रश्न गेली वर्षानुवर्ष विचारले जात आहेत. अखेर माधुरीला मराठी सिनेमाचा मुहूर्त मिळालाय. 'बकेट लिस्ट' या तेजस देऊस्कर दिग्दर्शित मराठी सिनेमात माधुरी दीक्षित काम करतेय. 


पुण्यात पावर बाईकचा थरार... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माधुरीने पुण्यात बाईक रायडिंगचा मनसोक्त आनंद लुटला. या धकधक गर्लला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली. पुण्यातील प्रभात रोड, तळजाई डोंगर आदी ठिकाणी माधुरीचं शुटिंग झालं. पुण्याविषयी अनेक आठवणी माधुरीने शेअर केल्या. लहानपणी भावडांसोबत पुण्यातील पेठांमध्ये मनसोक्त फिरणं असो किंवा आताचा बाईक रायडिंगचा अनुभव असो. पुण्याशी असलेलं जिव्हाळ्याचं नात आता तिने आणखी घट्ट केलंय. पुणं हे बाईकस्वारांसाठी प्रसिद्ध. तोच धागा पकडून सिनेमात बाईकचा फंडा वापरण्यात आलाय.
 शुटिंगदरम्यान बाईक चालवायची तीही पॉवर बाईक हे आणखीनच चॅलेजिंग होतं. त्यात ही वजनदार बाईक त्यामुळे तो तोल सांभाळणं आणखीनच कठीण. मात्र शुटिंगपूर्वी माधुरीने या बाईकचं खास प्रशिक्षण घेतलं. प्रचंड होमवर्क करणारी माधुरी त्यामुळे पहिल्या दिवशी सेटवर एकदम प्रिपेर्ड होती. 
 


माधुरीला डिरेक्ट करताना...  


 मुळात माधुरीला ‘डिरेक्ट’ करणं हा सगळाच अनुभव खूपच एक्साईटिंग असल्याचं दिग्दर्शक तेजस देऊस्कर म्हणतो. तेजाब, राम लखन, हम आपके है कौन, बेटा, दिल अशा अनेक एकापेक्षा एक सुपरहिट फिल्म्स देऊन बॉलिवूड गाजवणारी टॉपची हिरोईन. अनेकांच्या दिल की धडकन. माधुरी दीक्षितला डिरेक्ट करतानाचा अनुभव तोही पहिला मराठी सिनेमा. तो कसा आहे, हे सांगताना दिग्दर्शक तेजस देऊस्कर सांगतो, “माधुरी म्हणजे एक दिलखुलास व्यक्तीमत्व. शुटिंगदरम्यान मी तसा नवखा. मात्र कोणताही बडेजाव किंवा सेलिब्रिटी नखरे तिने दाखवले नाही. उन्हातान्हात बारा-बारा तासांहून अधिक काळ शूटिंग करताना असो किंवा अनेकदा रिटेकचा विषय असो. माधुरीचा उत्साह कायम असतो. एक दिलखुलास अभिनेत्री म्हणून माधुरीवर फिदा असणारे लाखो-करोडो चाहते आहेत. मीही त्यातलाच एक आहे. त्यामुळे काम करताना तिच्या सेलिब्रिटी स्टेटसचं दडपण असं येत नाही.’’



 


माधुरीच्या पहिल्या ऑटोग्राफची ‘धकधक’


 अलिबाग, पुणे, मलेशिया आणि आता मुंबई असं शुटिंग या सिनेमाचं सुरू आहे. खरंतर एका मराठमोळ्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली माधुरी फिल्म इंडस्ट्रीत टॉपची हिरोईन होईल असं तिलाही खुद्द वाटलं नव्हतं. परवाच तिने बोलताना एक किस्सा सांगितला. हा किस्सा आहे तिच्या पहिल्यावहिल्या ऑटोग्राफचा. तेजाबच्या शुटिंगनंतर माधुरी तिच्या बहिणीकडे अमेरिकेत सुटीसाठी गेली होती. ‘’अमेरिकेत असताना काही मित्रमैत्रिणींचे फोन यायला सुरूवात झाली. ‘तुम्हारी पिक्चर हिट हो गई’...अशा आशयाचे ते फोन कॉल्स होते. त्यावेळी पिक्चर हिट झाला म्हणजे नेमकं काय झालं हेही फारसं कळत नव्हतं. अखेर अमेरिकेत काही दिवस राहून भारतात पुन्हा परतले. मुंबईच्या एअरपोर्टवर बाहेर पडताच दोन मुलं धावत धावत  आली आणि त्यांनी ऑटोग्राफ मागितला. हा आपल्या जीवनातला पहिलावहिला ऑटोग्राफ. आपल्याला कोणीतरी ऑटोग्राफ मागतंय याचंच खूप अप्रूप वाटलं. ऑटोग्राफवर इंग्रजीतून Madhuri अशी सही केली आणि सुरुवातीचा ‘एम’ पाहून त्यातल्या एका मुलाने दुस-याला पटकन म्हटलं...’मैने कहा था ना ए मोहिनी हैं’...त्यांचं त्यावेळी ते बोलणं ऐकूण खूप खळखळून हसले.’’



कसा आहे माधुरीचा स्वभाव... 


 एखादी गोष्ट सांगताना या धकधक गर्लचा खळाळता उत्साह असतो तो असा. एरवी बरेचदा तिला आपण कार्यक्रमांमध्ये गातानाही पाहतो. तिच्या नृत्यावर फिदा असणारे लाखो चाहते आजही तिच्या गाण्यांवर ताल धरतात. गायन आणि नृत्य ही आवड तिने आपल्या करिअरच्या टप्प्यात खास जपलीये. शेवटी कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर कष्ट हे करावेच लागतात. माधुरीलाही ते चुकलेले नाही. मात्र या कष्टांव्यतिरिक्त तुमचा स्वतःचा एक स्वभाव असतो. माधुरीचा स्वभाव कसा असं सांगायचं म्हटलं तर तिनेच परवा बोलताना म्हटलं, की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, तुम्ही आधी माणूस म्हणून चांगले असणं महत्वाचं आहे. हीच माणुसकी तुमच्या यशअपयशातही तितकीच मोलाची ठरते, तुम्हाला स्थिर ठेवते.



आता उत्सुकता 'बकेट लिस्ट'ची...


लग्नानंतर माधुरीने फिल्म इंडस्ट्रीत सेकंड इनिंग सुरू केली. खरंतर बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्रीचा मराठीजनांना अभिमान आहेच. रुखरुख होती ती मराठी सिनेमा कधी करणार याची. माधुरीला आता हा मुहूर्त सापडलाय. आता उत्सुकता आहे, ती या धकधक गर्लच्या बकेट लिस्टमध्ये काय-काय मिळणारे याची.