क्रिकेट बदललं पण नेहरा तसाच राहिला
तब्बल १८ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर आशिष नेहरानं क्रिकेटला अलविदा केला आहे.
श्रेयस देशपांडे, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : तब्बल १८ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर आशिष नेहरानं क्रिकेटला अलविदा केला आहे. एवढा काळ क्रिकेट खेळणारे बहुतेक खेळाडू तरुणांचे ‘हिरो’ होतात पण नेहरा मात्र ‘आयडल’ होण्याऐवजी जोकचाच विषय जास्त झाला. क्रिकेटमध्ये डावखुऱ्यांची बॉलिंग बघण्याचं सुख काही वेगळंच असतं. पण नेहरा मात्र डावखुरा असूनही कायम वेगळाच राहिला.
९० च्या दशकातला खेळाडू
१९९९ मध्ये नेहरानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. नेहराच्या निवृत्तीनंतर आता ९०च्या दशकातले दोनच बॉलर्स क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. यातला श्रीलंकेचा रंगना हेराथ अजूनही क्रिकेट खेळतोय तर हरभजन सिंगचं भारतीय टीममध्ये पुनरागमन करणं आता कठीण दिसतंय. तर बॅट्समनच्या यादीमध्ये क्रिस गेल आणि शोएब मलिक अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहेत.
विकेटऐवजी कमबॅक आणि शस्त्रक्रिया जास्त
रंगना हेराथ आणि हरभजन सिंग या स्पिनर्सनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खोऱ्यानं विकेट काढल्या पण नेहराचा विकेटच्या कॉलमऐवजी कमबॅक आणि शस्त्रक्रियांचा कॉलमच वाढत गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेहरानं १७ टेस्टमध्ये ४४ विकेट घेतल्या, तर १२० वनडेमध्ये त्याला १५७ विकेट घेण्यात यश आलं. २७ टी-२०मध्ये नेहरानं ३४ विकेट घेतल्या.
आठ कर्णधारांबरोबर खेळण्याचा रेकॉर्ड
१८ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये नेहरा आठ कर्णधारांबरोबर खेळला. अजहरच्या नेतृत्वात पहिली मॅच खेळलेला नेहरा विराट कोहलीच्या नेतृत्वात शेवटची मॅच खेळला. यादरम्यान नेहरा सौरव गांगुली, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, एम.एस. धोनी आणि इंझमाम उल हकच्या नेतृत्वातही खेळला.
संक्रमणाचा साक्षीदार
१९९९ ते २०१७ या काळामध्ये भारतीय क्रिकेटमध्ये अनेक स्थित्यंतरं आली. याकाळामध्ये भारतीय क्रिकेटनं अनेक चढ-उतार पाहिले. मॅच फिक्सिंगप्रकरण ते २०११चा विश्वचषक जिंकण्याचा क्षण. नेहरा भारतीय क्रिकेटमधल्या संक्रमणाच्या काळाचा साक्षीदार होता. २००३च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये नेहरानं टाकलेला भेदक स्पेल कायमच क्रिकेट रसिकांच्या लक्षात राहील.
पुन्हा दुखापतीनं दगा दिला
२००३ साली वर्ल्डकप जिंकण्याच्या हुकलेल्या संधीचं भारतानं ८ वर्षांनी सोनं केलं. पण पुन्हा एकदा नेहराला दुखापतीनं दगा दिला. २०११ सालच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सेमी फायनलमध्ये नेहराच्या हाताला दुखापत झाली आणि श्रीलंकेविरुद्धच्या फायनलला नेहरा मुकला.
न बदललेला नेहरा
क्रिकेटच काय पण समोरचं जग बदलत असताना शेवटची मॅच खेळेपर्यंत नेहरा आहे तसाच राहिला. 'रोज झपाट्यानं बदलणाऱ्या या जगामध्ये एखादी तरी न बदलणारी गोष्ट रुचीपालट म्हणून ठेवली पाहिजे', असं पु.ल.देशपांडे 'पोस्ट'मध्ये म्हणाले होते. नेहराकडे बघून त्याचीच आठवण होईल. १८ वर्षांमध्ये नेहरानं ना कुठली फॅशन केली, ना कुठला टॅटू काढला ना कुठली हेअर स्टाइल केली. एवढच काय तर पहिल्या मॅचपासून ते शेवटच्या मॅचपर्यंत नेहराचं हसणंही अगदी तसंच राहिलं. नोकियाचा ११०० वापरणाऱ्या आशिष नेहरानं आत्ताकुठे आयफोन घेतला.
'थँक्यू नेहराजी'
सोशल नेटवर्किंगला सुरुवात व्हायच्या आधी मस्करीचा विषय असलेला नेहरा सोशल नेटवर्किंगचा जमाना आल्यावरही ट्रोलिंगचाच विषय झाला. टीम इंडियाच्या या ‘शापित गंधर्वा’नं शेवटच्या मॅचवेळी मात्र बाजी पलटवली आणि क्रिकेट रसिकांना 'थँक्यू नेहराजी' म्हणायला भाग पाडलं. हाऊसफुल फिरोजशहा कोटला मैदानातल्या आणि टीव्हीवरच्या कोट्यवधी क्रिकेट रसिकांना झालेल्या दु:खानं इतके वर्षांच्या ट्रोलिंगवरही मात केली. नेहराजींसाठी कारकिर्दीतल्या आकड्यांपेक्षाही शेवटच्या मॅचमध्ये रसिकांनी दिलेली ही प्रेमाची पावती नक्कीच ५०० विकेटपेक्षा जास्त असेल.