पूनम नार्वेकर, झी मीडिया, मुंबई : जगभरातील चित्रपटप्रेमींचे लक्ष लागलेला 91 वा 'ऑस्कर पुरस्कार सोहळा' सोमवारी अमेरिकेतील लॉस एंजिलसमधील डॉल्बी थिएटरमध्ये रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे साडे पाच वाजल्यापासून पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात होईल. यावर्षीचा सोहळा अनेक वादांमुळे जास्त चर्चेत आहे. पुरस्कार सोहळ्याला अवघे काही तास उरले असतानाही सूत्रसंचालक कोण असेल याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 


काय आहे सूत्रसंचालकाचा वाद ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 'द एकेडमी ऑफ मोशन आर्टस सायन्स'कडून अमेरिकन कृष्णवर्णीय अभिनेता केविन हार्ट याचे नाव सूत्रसंचालक म्हणून डिसेंबरमध्ये जाहीर कऱण्यात आले होते . मात्र केविन यांच्या नावाची घोषणा होताच समलैंगिक सबंधांबाबत त्यांनी यापुर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचे व्हिडिओ सोशल मिडियावरुन वायरल झाले. केविन यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत माफी मागण्याची विनंती एकेडमी मोशनकडून करण्यात आली मात्र केविन यांनी माफी मागण्यास नकार दिल्याने त्यांना ऑस्करच्या सूत्रसंचालकाच्या पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉन्सनसह अनेक नावांची चर्चा होती मात्र याबाबत अधिकृत घोषणा अद्यापही करण्यात आलेली नाही. पुरस्कार प्रदान करणारेच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असतील असं सध्याचं चित्र आहे.


पुरस्कार श्रेणींचा वाद 


दरम्यान सूत्रसंचालकाबाबत वाद सुरु असतानाच एक नवीन वाद 'एकेडमी मोशन'ने ओढवून घेतला. 24 पुरस्कार विभागांपैकी 4 विभागांमधील पुरस्कार हे लाईव्ह न दाखवता ब्रेकदरम्यान आटोपण्याचा निर्णय 'एकेडमी' आणि 'एबीसी न्यूज'ला चांगलाच महागात पडला. या निर्णयावर खुद्द ब्रॅड पिट, जॉर्ज क्लूनी सह अनेक दिग्गजांनी खूलं पत्र लिहून त्यांची नाराजी व्यक्त केल्यानंतर हा निर्णय मागे घ्यावा लागला. सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग,हेअर स्टाईल आणि मेकअप या चार पुरस्कार श्रेणींबाबत हा वाद होता.


ऑस्कर आणि टीआरपी 


गेले अनेक वर्षे विशेषत: 2014 पासून ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची लोकप्रियता कमालीची घसरत चाललेली असून सोहळा रटाळ होऊ नये यासाठी खरं तर हा निर्णय घेण्यात आल्याचे एबीसी न्यूजकडून सांगण्यात आले. गेल्या 90 वर्षांच्या इतिहासात गेल्या वर्षीच्या 2018 ऑस्कर सोहळ्याला सर्वात कमी रेटिंग होते तर 1998 मधील म्हणजेच टायटॅनिक चित्रपट ज्यावर्षी सर्वाधिक नॉमिनेशन्स मिळवून ऑस्करच्या शर्यतीत होता तो 70 वा ऑस्कर सोहळा आजपर्यंतचा सर्वाधिक लोकांनी पाहिलेला सोहळा ठरलाय.


भारताचं आव्हान संपुष्टात 


यावर्षी 10-10 नॉमिनेशन्स मिळवून रोमा आणि द फेवरिट हे चित्रपट ऑस्करच्या जोरदार शर्यतीत आहेत. भारताकडून परदेशी भाषा विभागात पाठवण्यात आलेला आसामी चित्रपट व्हिलेज रॉकस्टार हा यापुर्वीच ऑस्करच्या शर्यतीतून बाद झालाय.


( लेखिका या 'झी 24 तास'च्या Deputy Executive Proucer आहेत )