कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : हजारो रुग्ण ऑक्सिजन बेडवर कोरोनाचा मुकाबला करत पडलेले...! त्यांचे प्राण फक्त आणि फक्त ऑक्सिजन वर अवलंबून...! काही काळ जरी पुरवठा कमी झाला तर अनेकजनांचे प्राण जाणार अशी गंभीर परिस्तिथी....! याच परिस्थितीत भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचा परिस्तिथी समोर हतबल झाल्याचा व्हिडिओ..! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरातील ऑक्सिजन काही काळ पुरेल एवढाच शिल्लक...! ही असहायता फक्त पिंपरी चिंचवड नाही तर अनेक लहान मोठी शहरे सध्या अनुभतायेत...! पण पिंपरी चिंचवड शहराने एक रात्र एवढी भयानक अनुभवली की त्याची कल्पना न केलेली बरी...! अर्थात ही भयानकता अनुभवली ती महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, काही राजकीय मंडळी आणि मिडियातील काही मंडळींनी...! 


परिस्तिथीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्या दिवशी विभागीय आयुक्त, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि उपायुक्त स्मिता झगडे यांनी पहाटे पर्यंत किल्ला लढवत शहराला एका भयंकर मोठ्या संकटातून वाचवले. रात्रीच स्मिता झगडे यांनी चाकण गाठले....ऑक्सिजन प्लांटवरून गाड्या दुसरीकडे जाणार नाहीत याची व्यवस्था केली...! त्यासाठी काही काळ वाद ही सुरू झाला...! पण त्यावर तोडगा काढत पहाटेपर्यंत ऑक्सिजन टँकर शहरात दाखल करण्याची व्यवस्था झगडे आणि पदाधिकाऱ्यांनी केली...!  



पण मुळात अशी परिस्थिती येणार याची कल्पना महापालिकेच्या कोणत्याच पदाधिकाऱ्याला नव्हती का...? ऑक्सिजन पुरवठा करणारे पुरवठा थांबवतील याची कल्पना नव्हती का...? असे अनेक।प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतायत आणि त्याची उत्तर तुम्हाला आम्हाला हवालदिल करणारी आहेत..! काही काळ गेल्यानंतर त्याची उत्तर आपोआप समोर येतीलच आणि या भयानक काळात प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्यास मागे पुढे न पाहणारे ते कोण होते याचे उत्तर मिळेलच...! 


हजारो कोटींची उलाढाल असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पायाभूत सुविधा इतर शहरांच्या तुलनेत केंव्हाही चांगल्या आहेत...! तरी ही आज कोरोना पुढे शहर हतबल होताना दिसत आहे. रुग्णालयासमोर लागलेल्या रांगा, कोमेजून गेलेले नातेवाईकांचे चेहरे, हताश यंत्रणा हे चित्र कुणाला ही नको आहे..या अशा विदारक परिस्तिथी मध्ये अनेक डॉक्टर्स धैर्याने रुग्णांना सेवा पुरवण्याचे काम करत आहेत..! डॉक्टर्स नर्स आरोग्य सेवक या सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत...! पिंपरी चिंचवड नाही तर सर्वच शहरात अनेक जण कोरोना चे संकट परतवून लावण्यास शर्तीचे प्रयत्न करत आहेत...! त्याच धैर्याने तुम्ही आम्ही लढणे गरजेचे आहे....!


या महिन्यात लॉकडाऊन, संचारबंदी लागू झाल्यापासून किती तरी नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरतानाचे दृश्य नित्याचे झाले आहे. लॉकडाऊन किती योग्य किती अयोग्य यावर मते मतांतरे असू शकतात परंतू याचा अर्थ सरकारने घालून दिलेले नियम पाळायचे नाहीत असे कुठे ही नाही....परिस्तिथी अत्यंत भयंकर आहे...! 


शुभेच्छांपेक्षा सोशल मिडियावर आजकाल श्रद्धांजलीचे संदेश अधिक येत आहेत. अनेक मोठी नावाजली लोकं कोरोना हिरावून घेत आहे. या भयानक परिस्तिथी तुम्ही आम्ही विनाकारण रस्त्यावर फिरणे किती योग्य याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे..! 


तुमच्या या बेजबाबदार वागण्याने तुमचा जीव तर धोक्यात घालत आहातच. पण कुटुंबालाही कोरोना संकटात ढकलत आहात..! असाच बेजबाबदारपणा राहिला तर एखाद्या कोरोना सेंटर मधले बेड तुमची वाट पाहत आहे हे लक्षात ठेवा...! कदाचित तेंव्हा तुम्हाला ऑक्सिजन हवा असेल पण वेळ मात्र निघून गेलेली असेल...!