आणि पिंपरी चिंचवडचे स्वप्न पूर्ण झाले...
नेहमीप्रमाणे गणपत झोपेतून उठला.....एरवी हाताने नाकातला शेमबुड पुसत रडणाऱ्या पोराच्या आवाजाने गणपत उठायचा पण आज मात्र घरात निरव शांतता पसरली होती...!
कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : नेहमीप्रमाणे गणपत झोपेतून उठला.....एरवी हाताने नाकातला शेमबुड पुसत रडणाऱ्या पोराच्या आवाजाने गणपत उठायचा पण आज मात्र घरात निरव शांतता पसरली होती...! डोळे चोळत तो उठला आणि बाहेर आला... बाहेर येऊन बघतो तर पोराने नवे कपडे घातलेले...! नाकाला शेंबडाची धार सोडा, नजर लागावं एवढं पोरगं स्वच्छ...! अंगणात रांगोळी....! वातावरण कसं प्रसन्न...! घरावर कमळ रुपी गुडी... फक्त त्याच्याच घरावर नाही तरी सर्वांच्याच... रांगोळ्या ही...! गणपतला काही सुचेना...बायकोला त्याने विचारले बायको हसली आणि म्हणाली चन्द्ररंग महालात जा कळेल... त्याला काही सुचेना...शेवटी त्याने ही नवी कपडे घातले आणि बाहेर पडला तडक चंद्ररंग महालाकडे....!
नेमका आनंदोत्सव कसला या विचारात गणपतने चंद्ररंग महल गाठला...! महलातले ते वातावरण अभूतपूर्व...! सर्वत्र धूप अगरबत्तीचा सुगंध....गुलाबांच्या पाकळ्यांच्या पायघड्या...!राजांचे पाठीराखे उत्साहात महलात बागडत होते..! लक्ष्मण राजांचं तर काय वर्णन करावे... डोळे दीपवून टाकतील अशी वस्त्र....! चेहऱ्यावर आज पर्यंत कधी नव्हती एवढी प्रसन्नतेची झलक... आणि पुढे पुष्पगुच्छ घेऊन शुभेच्छा देण्यासाठी नगरवासियांची भली मोठी रांग...! कोणाला विचारावे असा विचार करत गणपत महालाच्या कोपऱ्यात उभा राहून या भारावलेल्या प्रसन्न वातावरणाचा गणपत साक्षीदार होत होता...! इथं काही कळणार नाही म्हणून शेवटी गणपतने नगरीतल्या दुसऱ्या म्हणजेच राम म्हणजेच महेश राजांच्या महालाकडे कूच केली....!
तिथं ही त्याला तोच उत्साह पाहायला मिळाला...! रामाचा चाणक्य अर्थात व्हाट्सअप बाबा अर्थात कार्तिकचा मुक्त आणि जग जिंकल्याचा तो वावर...! रामाची ही अवस्था लक्ष्मणा पेक्षा वेगळी नव्हती..... किती तरी दिवस पाहिलेले स्वप्न वास्तवात उतरल्याचे भाव रामाच्या अर्थात महेशच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते... इथं ही नगरवासियांच्या शुभेच्छा देण्यासाठी रांगाच रांगा...! तिथ ही गणपतला काही कळेना...दोन्ही राजांच्या महालात हा उत्सव कसला... शहरात रांगोळ्या, कमळरूपी गुढ्या कसल्या, या विचाराने गणपत आणखीच कासावीस झाला... शेवटचा पर्याय म्हणून गणपतने दरबारी कार्यरत असणाऱ्या राजांचा अमर महल गाठला...!
अमर महालात ही तेच....वेणूच्या चेहऱ्यावर ही जग जिंकल्याचे भाव... अमर राजे ही आनंदात... त्यांचा चेहरा ही काय वर्णावा... रामदासाला धोबीही पछाड दिल्या सारखा....! तिथं ही पायघड्या, धूप अगरबत्यांचा सुहास... मन प्रसन्न करणार मधुर संगीत आणि याच वातावरणात शुभेच्छा स्वीकारणारा राजा अमर....! आता मात्र गणपत ची भीड चेपली... त्याने धाडस करून वेणू ला विचारलं शहरात हा आनंदोत्सव कसला...? वेणू ने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली तुला माहीत नाही... अरे वेड्या राजे लक्ष्मण आणि राजे राम अर्थात महेशाला देवेंद्रांनी राज्याच्या अष्टप्रधान मंडळात स्थान दिलय... किती तरी दिवसाचे स्वप्न पूर्ण झालंय....! एवढंच नाही तर राजे अमर यांना तर थेट दिल्लीच्या अष्टप्रधान मंडळात स्थान मिळालंय.... अरे वेड्या, पिंपरी चिंचवड चे स्वप्न पूर्ण झालंय....! वेणूचे शब्द कानात पडताच गणपत चे डोळे चमकले....! काही वेळातच दोन्ही डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले....! तो स्वतः भीषणदास मिठाई वाल्याकडे गेला आणि मोतीचुर चे लाडू, कंदी पेढे, बर्फी घेऊन आला आणि सर्वत्र वाटू लागला...!
पिंपरी चिंचवड नगरीचे स्वप्न पूर्ण झाल्याच्या आनंदात असताना त्याला पोराच्या रडण्याचा आवाज आला, गणपत ने डोळे उघडले आणि त्याला नाकाचा शेमबूड पुसत पोरगं आलेले दिसले...! क्षणभर त्याला काही सुचले नाही, तो पर्यंत बायको शेजारचीला शिव्या देत आली, काय झाले हे विचारायच्या आधीच बायकोने एप्रिल फुल झाल्याचे सांगितले आणि गणपत ने कपाळाला हात लावला...! साला 1 एप्रिलला पडलेल्या स्वप्नाने ही आपल्याला एप्रिल फुल केले असे म्हणत त्याने जगदंब जगदंब केले...!
( मंत्री मंडळात समावेश होणार या पुन्हा उठलेल्या वावडेवर आधारीत...! सर्व नेत्यांना संधी मिळाल्याने चमच्या लोकांनी समाधान मानावे...अर्थात अशा चमच्यांकडून प्रमाणिकतेचे सर्टिफिकेट घेणे म्हणजे दरोडेखोरांकडून चांगल्या चारित्र्याचा दाखला घेण्यासारखे आहे हे ही तितकेच खरे...!)